कालचक्र राहुल गांधींनी तरुणाईला असे बालिश सल्ले देऊ नये..
कालचक्र
राहुल गांधींनी तरुणाईला असे बालिश सल्ले देऊ नये..
सध्या जंतर-मंतरच्या जेन झी च्या आंदोलनानंतर देशात सर्वांचीच तरुणाईशी संवाद साधण्याची धडपड सुरू आहे. त्यात राजकीय पक्ष आघाडीवर आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचालक मोहन भागवत यांनी सुरुवातीला तरुणाईशी संवाद साधला. आता भारतीय जनता पक्षाने तर त्यासाठी टीमच तयार केली आहे. काल काँग्रेसी नेते राहुल गांधी यांनी पुण्यात तरुणींशी संवाद साधला. त्यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
राहुल गांधींनी पुण्यातील त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांच्या कॉलेजमधील मुलींना बोलावून त्यांच्याशी संवाद साधला असा आरोप विरोधी पक्ष भाजप करतो आहे. मात्र वृत्तवाहिन्यांवर तिथे उपस्थित मुलींचे जे बाईट्स दाखवले, त्यात कोणी मुली मराठवाड्यातून तर कोणी विदर्भातून आल्या असे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे नेमके खरे काय हे हळूहळू सत्य बाहेर येईल.
अर्थात ठराविक महाविद्यालयांमधील मुलींशी जरी संवाद साधला असेल, तरी त्यातून जायचा तो संदेश जाणार आहेच. फक्त याला अधिक व्यापक स्वरूप देता आले असते तर ते उचित झाले असते. दुसरे असे की जेन झी मध्ये फक्त मुलीच आहेत असे नाही, तर तरुणही आहेत. पुण्यात तरुणांशी देखील त्यांनी संवाद साधला असता तर ते अधिक योग्य ठरले असते.
काल राहुल गांधींनी महिला मुलींना मनुस्मृतीची विचारधारा उखडून टाकत रूढ चौकट तोडा असे आवाहन केले आहे. मुळात प्रश्न असा येतो की भारतात खरोखरी मनुस्मृतीची विचारधारा आज अस्तित्वात आहे काय? मनुस्मृति मध्ये महिलांना दुय्यम स्थान द्यावे असे नमूद असल्याचा दावा केला जातो. वस्तूतः मी स्वतः मनुस्मृती वाचलेली नाही. त्यामुळे खरोखरी तो दावा आहे किंवा नाही यावर मी बोलू शकणार नाही. मात्र मनुस्मृतिनुसार महिलांना भारतात दुय्यम स्थान दिले असते तर महाराष्ट्रात जिजाऊंनी शिवबा घडवला नसता आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी राणी लक्ष्मीबाईंनी तटावरून घोडा देखील फेकला नसता. भारतीय संस्कृतीत महिलांना दुय्यम स्थान दिले जाते हा एकूणच भारतीय समाज व्यवस्थेला बदनाम करण्यासाठी केला गेलेला अपप्रचार म्हणता येईल. निसर्गाने ज्यावेळी स्त्री आणि पुरुष निर्माण केले त्यावेळेसच दोघांनाही विशिष्ट कार्य करण्यासाठीच त्यांची निर्मिती केली होती. त्यात स्त्रीला वंशवृद्धीसाठी जननक्षम बनवले होते. मात्र पुरुषी संबंधांशिवाय जनन प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नव्हती अशी तरतूद निसर्गानेच केलेली आहे. त्यानुसार स्त्री ही तुलनेने नाजूक तर पुरुष हा तुलनेत बळकट असा निर्माण केलेला आहे. दोघांचीही क्षमता ओळखूनच समाजव्यवस्थेने त्यांच्याकडे कामे सोपवली आहेत.
त्यामुळेच फक्त भारतीय समाज व्यवस्थेतच नाही, तर जगभरात प्रत्येकच ठिकाणी स्त्री आणि पुरुषांनी करावयाची कामे निश्चित केलेली आहेत. त्यानुसारच जगाचा कारभार चालतो आणि त्याचबरोबर जगभरात जसे महिलांना पुढे येण्यासाठी प्रयत्न होत आहेत, तसेच भारतातही झालेले आहेत. रुढीच्या आणि परंपरांच्या चौकटी मोडल्या गेल्या नसत्या तर राहुल गांधींच्या आजी इंदिरा गांधी या देशावर १५ वर्षे राज्य करू शकल्या नसत्या. फक्त इंदिरा गांधीच नाही, तर आज देशभरात अनेक महिला स्वकर्तृत्वावर सर्वोच्च पदी पोहोचलेल्या आहेत. आज तरुणाईत देखील बघितले तर तरुणांच्याच बरोबरीने तरुणी सुद्धा खांद्याला खांदा लावून शिक्षण घेत आहेत आणि करिअर करून आपले वर्चस्व सिद्ध करत आहेत. आज अंतराळात सुद्धा भारतीय महिला पोहोचल्या आहेत. इतर क्षेत्रात देखील त्यांनी आपले वर्चस्व दाखवून दिलेले आहे.
तरीही राहुल गांधी मुलींना रुढी आणि परंपरांच्या चौकटीत तोडा असा सल्ला देतात, हा एकविसाव्या शतकातला मोठा विनोद मानावा लागेल. आज रुढी आणि चौकटी तोडून महिला सर्व क्षेत्रात पुढे आल्या. तरीही निसर्गाने त्यांच्यावर जी जबाबदारी टाकली आहे, ती पूर्ण करण्यासाठी त्यांना पुढे यावेच लागणार आहे. त्याशिवाय समाजवृद्धी होणार नाही. आज महिला निसर्गाने सोपवलेली जननप्रक्रियेची जबाबदारी पार पाडून देखील सर्वच क्षेत्र क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध करत आहेत. तरीही त्यांना तुम्ही चौकटी तोडा हा सल्ला देणे कुठेतरी बालिशपणाचे लक्षण वाटते.
राहुल गांधींसह काँग्रेसी विचारसरणीचे नेते आणि देशातील एकूणच डाव्या विचारसरणीचे नेते आणी विचारवंत या देशात मनुस्मृतीवर आधारित समाजव्यवस्था असल्याचा आरोप करतात. त्यांच्यापैकी किती जणांनी खरोखरी मनुस्मृति काय ते वाचले आहे काय, हा देखील प्रश्न पडतो. दुसरे असे की मनुस्मृती लिहिली गेली ती सुमारे २००० वर्षांपूर्वी. त्यावेळीची सामाजिक स्थिती आणि लक्षात घेत त्याने काही मुद्दे मांडले असतीलही, मात्र आज कालानुरूप त्यात बदल झालेले आहेत, हे वास्तव देखील नाकारता येणार नाही. त्यामुळेच उठसूठ मनुस्मृतीचे नाव घेऊन ओरड करण्यापेक्षा वास्तवावर आधारित असा सल्ला राहुल गांधींनी तरुणाईला द्यायला हवा.
आज तरुणाई ही तंत्रज्ञानयुक्त जगात लहानाची मोठी झाली आहे. त्यांच्यापाशी ज्ञानाचे भांडार एका क्लिकवर उपलब्ध होते. त्यामुळे राहुल गांधींनी तरुणाईला असे बालिशपणाचे सल्ले देऊ नये तेच इतकेच सुचवावेसे वाटते.
✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment