कालचक्र . नुसते प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा उत्तरे देखील शोधायला हवीत..
कालचक्र .
नुसते प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा उत्तरे देखील शोधायला हवीत..
याला कारण असे आहे की अगदी लहानातल्या लहान प्रश्नापासून तर अगदी मोठ्या प्रश्नापर्यंत प्रत्येक प्रश्नांची सोडवणूक ही सरकारनेच करावी असा जनसामान्यांचा आग्रह असतो, आणि ती सोडवणूक झाली नाही की गल्लीतल्या नगरसेवकापासून तर केंद्रातल्या पंतप्रधानापर्यंत सर्वांनाच सामान्य माणूस आपल्याच घरी बसून धारेवर धरत असतो. कधी कधी त्याच्या संतापाचा स्फोट होतो. मग संघटितरित्या हा जनासामान्य आपला रोष व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर देखील येतो. मात्र त्यामुळे प्रश्न सुटत नाहीत तर ते अधिकच गुंतागुंतीचे बनलेले आपण बघत असतो.
बरेचदा अशा प्रकारात "आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी" असा प्रकार देखील झालेला आपण बघत असतो. आता नुकत्याच झालेल्या नीट परीक्षा पेपर फूट प्रकरणात तरुणाई रस्त्यावर आली आणि त्यात शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला गेला. मात्र शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हे काही या समस्येचे उत्तर नाही. मुळात पेपरफुट का होते? त्याला जबाबदार कोण आहे? आणि ही पेपर फुट कशी थांबवता येईल? याचा समाजाने विचार करायचा ठरवला तर अनेकदा शेवटी दोष आपल्यावरच येत असतो. प्रत्येक कुटुंबात असलेल्या प्रत्येक मुलाने डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावे याच आई-बाबांच्या हट्टापायी बरेचदा अशा पेपरफुटी चे प्रकार होतात किंवा मग पेपर लिहून झाल्यावर परीक्षकाला गाठून मार्क वाढवून देण्याचे देखील प्रकार घडत असतात. मुलाला डॉक्टर करायचे म्हणून त्याला महागड्या कोचिंग क्लास मध्ये घातले जाते. या कोचिंग क्लास मध्ये जर गंभीरपणे शिकवले गेले तर त्या मुलाचा विकास निश्चित होईल. मात्र अनेकदा हे कोचिंग क्लासेस संचालकच अशाप्रकारे शिक्षण मंडळातून बेकायदेशीर रित्या पेपर फोडून बाहेर आणत असतात. इथे शिक्षण मंडळातले पेपर फोडणारे अधिकारी आणि कर्मचारी, त्याचबरोबर असे पेपर फोडून बाहेर आणणारे कोचिंग क्लास संचालक, आणि काही वेळा याला उत्तेजन देणारे धनदांडगे मायबाप हे खरे जबाबदार असतात. त्याला शिक्षण मंत्री गृहमंत्री किंवा पंतप्रधान कसे जबाबदार राहणार हा देखील मुद्दा उपस्थित होतो.
देशात गेल्या सुमारे ७०-७५ वर्षात स्वयंचलित दुचाकी आणि चार चाकी वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यासाठी आम्हाला पृथ्वीच्या गर्भातूनच पेट्रोल किंवा डिझेल काढावे लागते. हे पेट्रोल किंवा डिझेल संपूर्ण जगभरात सर्वत्र भूगर्भात आहे असे नाही, तर काहीच देशांमध्ये ते आहे. त्यामुळे आपल्याला परदेशातून ते विकत घ्यावे लागते. भूगर्भातील इंधन एक दिवस संपणार हे निश्चित आहे. मग त्यामुळे त्याच्यावर काही पर्याय शोधणे गरजेचे असते. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा पर्याय शोधला. मला आठवते २००० साली नितीन गडकरी महाराष्ट्राच्या विधान परिषदेत विरोधी पक्षनेते असताना सर्वप्रथम त्यांनी हा पर्याय उघड केला होता. विशेष म्हणजे महाराष्ट्रात असलेल्या साखर कारखान्यांमध्ये उसाचे गाळप झाल्यावर निघणाऱ्या मळीतून इथेनॉल करता येते. एरवी ही मळी वायाच जात असते. त्यातून इथेनॉल उत्पादन झाले तर शेतकऱ्यांना फायदा होईल असा गडकरींचा दावा होता. केंद्र सरकारला तो पटला आणि त्यानुसार इंधनात इथेनॉल मिसळणे सुरू झाले. मात्र आता सर्वच विरोधक त्यावर ओरड करत आहेत. त्यांच्या मते या इथेनॉलमुळे वाहने खराब होतात. जर एखादा नेता इंधनात इथेनॉल मिसळायला सांगू शकतो, तर दुसऱ्या नेत्याने त्या इथेनॉलमुळे होणारे दुष्परिणाम कसे टाळता येतील हे शोधून हा पर्याय फुल प्रूफ कसा करता येईल हे बघायला हवे. त्यासाठी मग तरुणाईतील संशोधकांची मदत घेऊन प्रयोग करायला हवेत. मात्र तसे न करता सनदी अधिकारी असलेले विद्वान अरविंद केजरीवाल हे पंतप्रधानांच्या घरावर मोर्चा घेऊन जाण्याचे राजकारण फक्त करतात. त्या ऐवजी त्यांनी आपली विद्वत्ता असे संशोधन करण्यात खर्ची घातली तर फक्त देशाचाच नाही तर संपूर्ण मानव जातीचा फायदा होऊ शकतो. पण आम्हाला फक्त प्रश्न उपस्थित करण्यातच धन्यता वाटते.
नीट परीक्षा आणि इथेनॉल हे सध्या गाजत असलेले दोन प्रमुख मुद्दे झाले, पण इतर देखील असे अनेक मुद्दे आहेत, ज्याचे आम्ही प्रश्न उपस्थित करतो आणि इतरांवर खास करून सरकारवर दोष ढकलून मोकळे होतो. मला आठवते सुमारे ४०-४५ वर्षांपूर्वी केंद्रात वसंतराव साठे हे मंत्री होते. ते इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या अतिशय जवळचे होते. ते वर्धेतून खासदार म्हणून निवडून यायचे. मात्र वर्धा शहरातल्या नाल्या जरी तुंबल्या तरी तिथले नागरिक साठे काहीही काम करत नाहीत म्हणून बोंबाबोंब करायचे. मुळात केंद्रात मंत्री असलेल्या एका नेत्याने तुमच्या गल्लीत नाली तुंबली हे बघायला येणे तुम्हाला अपेक्षित आहे का? तुम्ही तिथल्या तिथे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना गाठा, स्थानिक नगरसेवकाला पकडा, नाहीच झाले तर मुख्याधिकाऱ्याचा गळा धरा, कुठेतरी तर तुमचे काम होईलच, पण आम्हाला तसे काहीही करायचं नसते. "असेल माझा हरी, तर देईल पलंगावरी_" या भूमिकेतून आम्ही जगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळेच स्वतः फक्त प्रश्न उपस्थित करायचे, उत्तरे कधीच शोधायचु नाहीत, आणि सरकारला दोषी ठरवून मोकळे व्हायचे हीच आमची मानसिकता तयार झालेली असते. त्यामुळेच आज देशासमोर प्रचंड समस्या निर्माण होत आहेत. महामार्गावर अपघात होतात म्हणून आम्ही ओरडतो. मात्र आमच्यातलेच अर्धे लोक महामार्गावर चक्क रॉंग साईड वाहने चालवतात. अनेकदा आमच्याच वाहनांना धड ब्रेक नसतात. मग अपघात झाला तर आम्ही प्रशासनाच्याच नावाने ओरडतो. मात्र वाहने चांगल्या स्थितीत ठेवून वाहतुकीचे नियम पाळूनच चालवायला हवीत हे आम्ही कधीच मनावर घेत नाही.
खरी समस्या हीच आहे. आम्ही फक्त प्रश्न उपस्थित करण्यात धन्यता मानतो. उत्तरे कधीच शोधत नाही. जर आम्ही उत्तरे शोधली, तर अनेकदा ती उत्तरे आम्हाला आमच्याच पाशी सापडतील आणि आम्हीच त्या प्रश्नाचे निराकरण करू शकू. मात्र आम्ही ते कधीच करत नाही. फक्त दुसऱ्यांना दोष देण्यातच धन्यता मानतो.
हीच परिस्थिती बदलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणाईला आवाहन केले आहे. हे देशातल्या तरुणाईनेच नव्हे तर प्रत्येक सामान्य माणसाने मनावर घ्यायला हवे, आणि फक्त प्रश्न उपस्थित करून थांबू नये तर उत्तरे देखील शोधावीत. ती आजची गरज आहे. जर आम्ही हे करू शकलो तर पुढल्या काही वर्षात भारत विश्व गुरु बनायला उशीर लागणार नाही.
✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment