"सहज सुचलं म्हणून.... वंदे मातरम् ची सहाही कडवी पाठ व्हायला विशेष वेळ लागणार नाही.
"सहज सुचलं म्हणून....
वंदे मातरम् ची सहाही कडवी पाठ व्हायला विशेष वेळ लागणार नाही.
सध्या वंदे मातरमची दोन कडवी म्हणावी की सहा यावर राजकीय पक्षांचा वाद सुरू आहे. त्याच विषयावर चर्चा करताना एक पत्रकार मित्र म्हणाला "अविनाश खरोखरी सहा कडवी लोकांना पाठ होणार आहेत का?" त्यावर मी उत्तरलो "लहानपणापासून जर नियमित सहा कडवी कानावर पडली तर पाठांतर होणे अशक्य नाही. आपल्याला लहानपणी जनगणमन हे गीत कुठे येत होते? पण रोज म्हणून ते पाठ झालेच ना?" यावर माझा मित्र काहीसा बॅक फुटवर गेला होता.
खरोखरीच जर एखादे गीत, एखादे स्तोत्र, किंवा एखादा मंत्र नियमित कानावर पडत राहिला किंवा रोज म्हणत राहीलो तर पाठ होत नाही का? आता साधं उदाहरण घेऊ या. आपण शाळेत जातो. तिथे जी दररोजची प्रार्थना असते ती पहिल्या दिवशी आपल्याला नीट म्हणता देखील येत नाही. मात्र एक आठ ते पंधरा दिवसात दररोज कानावर पडल्याने आणि इतरांबरोबर म्हटल्याने ती पूर्ण पाठ होऊन जाते. मग एकट्याने सुद्धा आपण म्हणू शकतोच ना.
पाठांतराचे असेच आहे. आपण पुस्तकातले गद्य दहादा वाचले तरी बरेचदा पाठ होत नाही. मात्र तालासुरात गायलेले कानावर पडले तर ते नक्कीच पाठ होते.
मला आठवते लहानपणी माझे वडील दररोज अंघोळ झाल्यानंतर मंग पुस्तक मोठ्याने गणपती अथर्वशीर्ष म्हणत असत. ते ऐकून हळूहळू मलाही ते पाठ होऊ लागले. एकदा कुणीतरी असेच म्हटले तर मी ते अथर्वशीर्ष संपूर्ण पाठ म्हणू शकलो. त्या वयात क्षणभर मलाही आश्चर्य वाटले होते.
जी बाब गणपती अथर्वशीर्षाची, तीच बाब इतर स्तोत्र आणि प्रार्थनांनाही लागू पडते. लहानपणी दररोज संध्याकाळी आपण शुभम करोती म्हणतो. नंतर घरातले आई-वडील किंवा मग घरात असलेच तर आजी आजोबा मुलांना कधी रामरक्षा, कधी मारुती स्तोत्र, कधी गीतेचा अध्याय हे सर्व शिकवतात. एक आठ पंधरा दिवसात ते त्या मुलांना निश्चित पाठ होऊन जाते. कित्येकदा मुलांना शिकवले नाही आणि घरात इतर कोणीतरी म्हणत असले तरी ते कानावर पडून हळूहळू पाठ होऊ लागते. गणपतीच्या दहा दिवसात दररोज सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती नंतर धूप आरती आणि मंत्रपुष्पांजली कानावर पडली आणि सर्वांसोबत म्हटली की पुढल्या वर्षी आपण स्वतंत्रपणे पूर्ण आरती म्हणू शकतोच ना.
आता तालासुरात गायलेली सिनेमाची गाणी, आता ते प्रमाण जरा कमी झाले आहे, पण आमच्या लहानपणी इतकेच काय पण कॉलेजच्या दिवसात सुद्धा कोणताही कार्यक्रम असला की लाऊड स्पीकरवर ही सिनेमाची गाणी मोठमोठ्याने लावली जायची. त्या काळात घरोघरी टीव्ही नव्हते पण रेडिओ मात्र निश्चित होते. विविध भारती आणि रेडिओ सिलोन वर ही ट्रेडिंग गाणी अक्षरशः दिवसातून एकदा तरी वाजवली जायचीच. ती कानावर पडून पडून ती अक्षरशः चार आठ दिवसात तोंड पाठ झालेली असायची. मग ती तोंड पाठ झालेली गाणी म्हटली, की ऐकणारे घरचे आई-वडील म्हणायचे "अभ्यासाचं पाठ होय नाही, कविता पाठ होत नाही, पण सिनेमाची गाणी कशी पाठ होतात? असे टोमणे ऐकत ऐकतच त्या काळात पाठांतर होत असे. त्यामुळेच त्या काळातली सिनेमाची गाणी, लहानपणी शिकवलेली स्तोत्र, गीतेचे अध्याय, गणपती अथर्वशीर्ष, श्री सूक्त, देवाच्या सर्व आरत्या हे आमच्या पिढीतल्या अनेकांना आजही विचारल्यास घडाघडा म्हणता येते. सतत कानावर पडल्याने किंवा सातत्याने काही दिवस म्हटल्याने कसे पाठांतर होते त्याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
मग वंदे मातरम ची सहा कडवी आम्हाला का पाठ होणार नाहीत? पूर्वी घराघरात सकाळी सहा वाजता रेडिओ सुरू व्हायचे. त्यावेळी रेडिओवर सुरुवातीलाच वंदे मातरम ची पहिली दोन कडवी वाजवली जायची. ती ऐकून अनेकांना ती दोन कडवी पाठ झाली आहेत.
इथे आणखी एक बाब नमूद करावीशी वाटते वंदे मातरमच्या सहाही कडव्यातील पूर्ण शब्द जसेच्या तसे घेत एका चित्रपटात वंदे मातरम हे संपूर्ण गीत गाईले गेले होते. आज अजूनही ते गीत सिनेमा गीत बऱ्याच जणांना पाठ आहे. मला आठवते भारत विकास परिषद नामक संस्थेच्या एका शाखेचा मी अध्यक्ष होतो. त्यांच्या वतीने राष्ट्रीय समूह गान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध शाळांमधून विद्यार्थ्यांच्या चमु तिथे आल्या होत्या. या संस्थेत कार्यक्रमाच्या सुरुवातीला वंदे मातरम गाऊन सुरुवात केली जायची अशी पद्धत होती. त्या कार्यक्रमाच्या दिवशी वंदे मातरम गाणारी गायिकाच आली नव्हती. मग काय करायचे हा विचार करत असतानाच एका शाळेच्या चमूने हे संपूर्ण गीत गाईले आणि आमची वेळ मारून नेली होती. हा पाठांतराचाच परिणाम होता ना.
याच पद्धतीने आता पुढली चार कडवी देखील सातत्याने वाजवली गेली, तर काही दिवसात ती सुद्धा सगळ्यांना हळूहळू पाठ होऊन जातील आणि कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सर्वजण सामूहिक वंदे मातरम चे गाणे निश्चित गाऊ शकतील यात कोणालाही शंका नसावी.
इथे कदाचित ज्येष्ठांना थोडा त्रास होऊ शकेल. मात्र शाळांमध्ये लहानपणापासूनच मुलांना वंदे मातरम ची सही कडवी गायला शिकवले गेले तर त्यांना हे संपूर्ण गीत पाठवायला फारसा वेळ लागणार नाही. सरकारने सहाही कडवे गायली जावेत असा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला चार-पाच वर्षे थोडा त्रास जाईल. मात्र पुढल्या काही वर्षात जसे रवींद्रनाथ टागोर यांचे जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता हे गीत प्रत्येकाला झोपेतून उठवून तरी म्हणायला सांगितले तरी म्हणता येते, तसेच वंदे मातरम या गीताची सहाही कडवी या देशातील प्रत्येक नागरिकाला सहज म्हणता येतील असा मला तरी आज विश्वास वाटतो.
काही राजकीय पक्ष त्यांचा विशिष्ट अजेंडा राबवण्यासाठी आज या गीताला विरोध करतील. मात्र सामान्य माणूस हे गीत पुढल्या काही दिवसात सहज आत्मसात करेल आणि भविष्यात या देशात संपूर्ण वंदे मातरम सहाही कडवी अभिमानाने गायली जातील हे निश्चित. मात्र त्यासाठी प्रत्येकाची जबर इच्छाशक्ती असावी
ते गरजेचे आहे, इतकेच इथे सहज सुचलं म्हणून सांगावसं वाटतं...
✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment