कालचक्र वंदे मातरम गीताला विरोध अनाठायीच....
कालचक्र
वंदे मातरम गीताला विरोध अनाठायीच....

वंदे मातरम या गीताच्या रचनेला यंदा १५० वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने या गीताला देखील संपूर्ण राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला जावा म्हणूनच केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने कायद्यात दुरुस्ती केली, आणि यंदा स्वातंत्र्य दिनाचा मुख्य कार्यक्रम असलेल्या पंतप्रधानांच्या लाल किल्ल्यावरील भाषणाचे वेळी "जनगणमन" या राष्ट्रगीतासोबत "वंदे मातरम" या गीताची पूर्ण सहा कडवी गायली गेली. त्याचे देशात स्वागत देखील झाले आहे.
मात्र त्याचवेळी वंदे मातरम ची पूर्ण सहा कडवी गाण्यासाठी काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. त्यामुळेच काँग्रेस मुख्यालयात झालेल्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात वंदे मातरमची पहिली दोन कडवी गायली गेल्यानंतर तिसरे कडवे जेव्हा सुरू झाले तेव्हा सोनिया गांधी अस्वस्थ झाल्या, आणि त्यांनी इशारा करून ते कडवे थांबवायला लावले अशी बातमी आहे. यावरून देशात नवीन वाद सुरू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि सध्या राहुल गांधींच्या टारगेटवर असलेले भाजप नेते अमित शहा यांनी सोनिया गांधींनी देशाची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
"वंदे मातरम" हे प्रख्यात बंगाली साहित्यिक बकीमचंद्र चटोपाध्याय यांनी रचलेले गीत आहे. हे गीत त्यांच्या आनंद मठ या कादंबरीत आलेले आहे. त्यानंतर एका चित्रपटात गायले गेल्यावर हे गीत सर्वमान्य झाले. नंतर स्वातंत्र्यलढ्यात देखील हे गीत गायले जाऊ लागले. काँग्रेस पक्षाने देखील आपल्या सभांमध्ये आणि बैठकींमध्ये हे गीत गाण्यास सुरुवात केली होती. अनेक क्रांतिकारकांनी वंदे मातरमचा नारा देत फाशीची शिक्षा स्वीकारली होती.
मात्र नंतरच्या काळात काँग्रेसमध्ये असलेल्या मुस्लिम नेत्यांनी याला विरोध केला. त्यांच्या मते या गीतातील तिसऱ्या कडव्यापासून हिंदू देवदेवतांची स्तुती करण्यात आलेली आहे. आपण धार्मिक भावनेतून काम करत असताना हिंदू धार्मिक भावनांचे प्रतीक या गीतात नको असा त्यांचा आक्षेप होता. हा आक्षेप त्यावेळी काँग्रेसमधल्या मुस्लिम धार्जिण्या हिंदूंनी देखील मान्य केला आणि फक्त पहिली दोन कडवीच गायली जाऊ लागली. नंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा पंडित नेहरूंनी रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या जनगणमन या गीतालाच राष्ट्रगीताचा दर्जा दिला आणि वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत निश्चित करत त्यात पहिली दोन कडवीच गायली जाऊ लागली.
मात्र या देशातील हिंदुत्ववाद्यांना हे मान्य नव्हते. त्यामुळेच संघ विचारांच्या संघटनांमध्ये, हिंदुत्ववादी आणि सावरकरवादी मंडळींच्या संघटनांमध्ये आणि त्यांच्या कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम या गीताचे संपूर्ण सहा कडव्यांचे गायन केले जाऊ लागले. अर्थात ते त्यांच्या कार्यक्रमांपुरतेच मर्यादित होते.
यंदा वंदे मातरम ला १५० वर्षे पूर्ण झाली होती. त्यामुळे नरेंद्र मोदी सरकारने यानिमित्ताने विशेष कार्यक्रम देखील घडवून आणला आणि सर्वत्र सहा कडवी गायली जावीत असा आदेशच काढला. नंतर त्यांनी कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती देखील करून घेतली. त्यामुळेच आता शासकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सर्व सहा कडवी गायली जाणे बंधनकारक झाले आहे.
मात्र काँग्रेसला हे मान्य नाही. त्यामुळेच सोनिया गांधींनी विरोध करत हे गीत थांबवले असावे हे निश्चित. सोनिया गांधी या मूळच्या ख्रिस्ती आहेत. त्यामुळे हिंदू देव देवतांशी त्यांना काही देणे घेणे नाही.
मात्र काँग्रेसमधल्या इतरांनी त्याला का पाठिंबा द्यावा हा देखील प्रश्न आहे. या देशात आजही हिंदू समाज बहुसंख्यच आहे. या गीतात हिंदुस्थानला दुर्गेची आणि आदिशक्तीची उपमा दिली आहे. आज या देशात दुर्गा आणि आदिशक्तीची उपासना करणारे मोठ्या संख्येत आहेत. त्यामुळे एका समाजाचे लांगुलचालन करण्यासाठी बहुसंख्यांक समाजाला नाराज करणे यात कुठले राजकारण आले? मात्र काँग्रेसला हेच राजकारण करायचे आहे.
ज्यावेळी सोनिया गांधी इशाऱ्याने गीत थांबवत असल्याचे दृश्य वृत्तवाहिन्यांनी दाखवले, त्यावेळी सहाजिकच भारतीय जनता पक्ष आणि इतर हिंदुत्ववाद्यांनी त्यावर टीका केली. तिथे जयराम रमेश आणि इतर काँग्रेसी नेत्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून जायचा तो संदेश गेलाच. काँग्रेसची हिंदू विरोधी भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे एक नेते जितेंद्र आव्हाड हे देखील सोनिया गांधींच्या मदतीला मैदानात उतरलेले दाखवण्यात आले. त्यांच्या मते जर नेहमी आधीचीच दोन कडवे म्हणतो तर सहा कडवी म्हणण्याचे कारणच काय? पण प्रश्न असा येतो की जर सहाही कडवी अर्थपूर्ण आहेत, तर ती गायला तुम्हाला अडचण काय? फक्त तुमचे मतांचे राजकारण डोळ्यासमोर ठेवूनच तुम्ही हा विरोध करत आहात हे समजण्याइतपत भारतीय सुज्ञ आहेत, हे आव्हाडांनी लक्षात घ्यायला हवे.
या देशात आजवर काँग्रेसने हिंदूविरोधी आणि मुस्लिम तसेच ख्रिस्ती बांधवांचे लांगुलचालन करण्याचे राजकारण केले आहे. त्यांनी याच राजकारणाचा फायदा घेत आणि हिंदूंमध्ये जातीपातीचे राजकारण करून फूट पाडत सत्ता मिळवली होती. मात्र आता देशातील जनता शहाणी झाली आहे. त्यामुळे आता मतदार अशा तुमच्या राजकारणाला फसणार नाही, हे काँग्रेस जनांनी लक्षात घ्यायला हवे. वंदे मातरम हे देखील संपूर्ण गीत आता गायलाच हवे. स्वातंत्र्यलढ्यात वंदे मातरम या घोषणेनेच चैतन्य निर्माण केले होते. कित्येक क्रांतीकारकांनी फाशीवर जाताना वंदे मातरम चा नारा दिला होता. आजही हे गीत आणि वंदे मातरम चा नारा देशात नवे चैतन्य निर्माण करेल हे निश्चित. त्यामुळे वंदे मातरम ला निरार्थक विरोध करणे चुकीचेच ठरणार आहे हे निश्चित.....
✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment