माणसांची श्रीमंती कमावणाऱ्या माणूस वेड्या लेखकाचे आत्मकथन... आयुष्यातले सांगाती
माणसांची श्रीमंती कमावणाऱ्या माणूस वेड्या लेखकाचे आत्मकथन...
आयुष्यातले सांगाती
(पुस्तक परिचय)
माणूस जन्माला येतो, तेव्हा तो एकटाच असतो. मात्र जसा जसा तो मोठा होत जातो, तसा तसा त्याचा इतरांशी संपर्क येत जातो. त्यातूनच माणसं जोडली जातात.
त्यातच एखादा अगदीच माणूसघाणा असला तर तो इतरांशी फटकून वागत आपल्याच विश्वात रमतो. मात्र काहींना माणसं जोडायची, त्यांच्याशी मैत्री करायची आणि संबंध जपायची हौस असते. अशा व्यक्तींचा स्नेही परिवार देखील खूपच मोठा असतो.
नागपूरच्या साईज्योती पब्लिकेशन ने नुकतीच प्रकाशित केलेली "आयुष्यातले सांगाती: भाग एक दोन आणि तीन" ही तीन पुस्तके अशाच माणूसवेड्या आणि स्नेही परिवार जपणाऱ्या व्यक्तीचे आत्मकथन आहे असेच म्हणता येईल. नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश पाठक यांनी आयुष्यातली ५४ वर्ष इलेक्ट्रॉनिक, मुद्रित, आणि डिजिटल माध्यमात पत्रकारिता केली. विपुल असे साहित्य लेखन केले, आणि सामाजिक क्षेत्रात त्यांची धडपड आजही वयाची सत्तरी ओलांडल्यावर देखील चालूच असते. त्यांच्या आयुष्यात त्यांना भेटलेल्या आणि भेटल्यानंतर त्यांच्याशी स्नेहबंध जपलेल्या ५१ मान्यवरांबाबत त्यांनी जे लेख लिहिले त्याचेच तीन भागांमध्ये संकलन प्रकाशित करण्यात आले आहे.
या ५१ मान्यवरांमध्ये पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री यांच्यापासून राजकीय नेते, साहित्यिक, उद्योगपती, पत्रकार, शासकीय अधिकारी, कलावंत ,डॉक्टर्स अशा सर्वांचाच समावेश असल्याचे आढळते. मात्र पुस्तके वाचल्यावर आयुष्यभर पत्रकारिता करणाऱ्या या माणूसवेड्या माणसाने किती विविधअंगी संबंध जोडले आणि ते जपले हे लक्षात येते.
या तीन भागांमध्ये माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय मंत्री वसंतराव साठे, हंसराज अहिर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, साहित्यिक विद्याधर गोखले, नाट्यलेखक आणि दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर, पत्रकार मा गो वैद्य, नीला उपाध्ये, शासकीय अधिकारी श्रीपाद सहस्रभोजने आणि राम खांडेकर, वैद्यकीय क्षेत्रातील साहित्यिक डॉ. प्रमोद कोलवाडकर आणि डॉ. प्रफुल्ल मोकदम, नेत्रतज्ज्ञ डॉ विकास महात्मे,माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे, पक्षी विषयक लेखन करणारे मारुती चितमपल्ली, संगीतकार डॉ तनुजा नाफडे, उद्योगपती शक्तीकुमार संचेती अशा ५१ मान्यवरांवर लेखकाने लिहिले आहे. विशेष म्हणजे लेखकाने या सर्व व्यक्तींचे आणि त्याचे जे काही व्यक्तिगत स्नेहबंध राहिले आणि त्यात जे काही सुखद अनुभव आले त्याच्याच बाबत लिहिलेले आहे. हे लिहिताना स्वतःचा अहंभाव न दाखवता फक्त त्या व्यक्तींचे मोठेपण कसे दाखवता येईल हाच प्रयत्न लेखकाने सातत्याने केलेला दिसून येतो.
पुस्तकाच्या तिन्ही भागांच्या प्रस्तावनेमध्ये लेखकाने नमूद केले आहे की मी आयुष्यात पैसा कमावू शकलो नाही, मात्र माणसं खूप कमावली. आयुष्यातले सांगाती वाचल्यावर लेखकाच्या या दाव्याची सत्यता पटते. माणसाची श्रीमंती त्याच्याजवळ असलेल्या संपत्तीत मोजता येत नाही, तर त्याने किती माणसे जोडली यावर त्याची संपत्ती लक्षात येते. अविनाश पाठक यांचे हे लेखन वाचल्यावर त्यांची लोकसंग्रह संपत्ती किती विशाल आहे हे लक्षात येते.
पुस्तक वाचताना ही सर्व मोठी माणसं देखील किती साधी आहेत आणि कशाप्रकारे ते देखील समाजातील सर्व घटकांशी संबंध ठेवतात आणि जपतात हे लक्षात येते. विशेषतः पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी, साहित्यिक विद्याधर गोखले, डॉ. मोहन भागवत यांचे अनुभव खूपच बोलके वाटतात.
अविनाश पाठक साधारणतः १९७२-७३ च्या दरम्यान पत्रकारितेत सक्रिय झाले. तेव्हापासून त्यांना जे काही अनुभव आले आणि ज्या ज्या व्यक्तींशी त्यांचे मैत्र जमले, त्यांचे अनुभव त्यांनी लिहिले आहेत. एकूणच तीनही पुस्तके वाचल्यावर हे लेख म्हणजे महाराष्ट्राच्या समकालीन राजकीय सामाजिक सांस्कृतिक वांङमयीन जडणघडणीचा एक दस्तावेज आहे हे लक्षात येते. लेखकाची भाषा देखील सरळ सोपी आणि ओघवती शैली वाचकाच्या मनाला भावणारी आहे त्यामुळे पुस्तक वाचताना आपणही त्या व्यक्तींशी संपर्कात आलो की काय असे वाटू लागते.
आयुष्यातले सांगाती च्या पहिल्या भागाला माजी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रस्तावना आहे. तर दुसऱ्या भागाला माजी राज्यसभा सदस्य आणि मध्य भारतातील आघाडीचे उद्योजक अजय संचेती, तर तिसऱ्या भागाला मध्य भारतातील ख्यातनाम नेत्रशल्य चिकित्सक आणि माजी राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे यांची प्रस्तावना आहे. या तीनही प्रस्तावनांमध्ये लेखकाच्या माणसे जोडण आणि याच्या जोडण्याच्या मानसिकतेवरच प्रकाश टाकलेला दिसून येतो.
एकूणच संग्राह्य अशी ही तीन पुस्तके झालेली आहेत. तिन्ही पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ, नेटकी मांडणी आणि अंतर्गत सजावट ही देखील डोळ्यात भरण्याजोगी राहिलेली आहे. त्यामुळे प्रत्येक मराठी वाचकाने हे पुस्तक आवर्जून वाचावे अशीच ही पुस्तके झाली आहेत.
श्रुती देशपांडे
आयुष्यातले सांगाती ,भाग १,२, आणि ३
लेखक: अविनाश पाठक ,तर ,प्रकाशक: साईज्योती पब्लिकेशन नागपूर हे असून या पुस्तकाचे एकुण मुल्य ₹९२५/-आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment