लक्षवेधी:- जिल्हा परिषद चंद्रपूरच्या हायस्कूलमध्ये रिक्त पदांचा डोंगर; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान.
लक्षवेधी.
जिल्हा परिषद चंद्रपूरच्या हायस्कूलमध्ये रिक्त पदांचा डोंगर; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
१५ जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षक, अधिव्याख्याता व मुख्याध्यापकांची पदे रिक्त; पालकांमध्ये तीव्र असंतोष
चंद्रपूर : दीपक देशपांडे.
जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर गंभीर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील एकूण १५ जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये निम्न श्रेणी शिक्षक, उच्च श्रेणी शिक्षक, कनिष्ठ अधिव्याख्याता तसेच मुख्याध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध शिक्षकांवर अतिरिक्त अध्यापनाचा भार पडत असून विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन प्रभावित होत आहे.
उपलब्ध नोंदीनुसार इयत्ता ५ वी ते ८ वी, ९ वी ते १० वी तसेच ११ वी ते १२ वी या वर्गांसाठी विविध विषयांची रिक्त पदे मोठ्या संख्येने असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी एकाच विषयाचे दोन-तीन तर काही ठिकाणी त्यापेक्षाही अधिक शिक्षक उपलब्ध नसल्याने शाळेचे वेळापत्रक सांभाळणे प्रशासनासमोर आव्हान ठरत आहे.
प्रतिनियुक्तीचा पर्यायही ठरला अपयशी
रिक्त पदांवर तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची प्रतिनियुक्ती करून हायस्कूलमध्ये पदस्थापना करण्यात आली होती. मात्र, संबंधित गावातील पालकांनी याला तीव्र विरोध केला. प्राथमिक शाळांमधून शिक्षक कमी केल्यामुळे आपल्या मुलांचेही नुकसान होणार असल्याची भूमिका पालकांनी घेतली. पालकांच्या वाढत्या असंतोषानंतर करण्यात आलेली प्रतिनियुक्ती अखेर रद्द करण्यात आली.
मात्र, प्रतिनियुक्ती रद्द झाल्यानंतरही हायस्कूलमधील रिक्त पदे कायमस्वरूपी भरण्यासाठी प्राथमिक शिक्षकांकडून विकल्प मागवून पुढील कार्यवाही करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषद चंद्रपूरच्या शिक्षण विभागाकडून अद्याप प्रभावीपणे राबविण्यात आलेली नाही, असा आरोप होत आहे.
रिक्त पदे भरण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा आवश्यक
एका बाजूला प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे, तर दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रतिनियुक्ती करून एका शाळेची समस्या सोडविताना दुसऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते.
त्यामुळे शासनाच्या नियमांनुसार उपलब्ध शिक्षकांकडून विकल्प मागवून, पात्र शिक्षकांना कायमस्वरूपी पदस्थापना देणे, तसेच उर्वरित रिक्त पदे नियमानुसार भरती प्रक्रियेतून तातडीने भरणे आवश्यक आहे.
पालकांचा सवाल : विद्यार्थ्यांचे नुकसान कोण भरून काढणार?
वर्षभरातील महत्त्वाचा शैक्षणिक कालावधी सुरू असताना शिक्षकांची पदे रिक्त ठेवणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ असल्याची भावना पालकांमध्ये निर्माण झाली आहे. अनेक विषयांचे अध्यापन नियमित होत नसल्याने अभ्यासक्रम पूर्ण होणार कसा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढणार आणि आगामी परीक्षांना विद्यार्थी सामोरे जाणार कसे, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
जिल्हा परिषद चंद्रपूरच्या शिक्षण विभागाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन जिल्हा परिषद हायस्कूलमधील सर्व रिक्त पदांचा आढावा घ्यावा, विषयवार रिक्त पदे भरावीत आणि विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी मागणी पालक, विद्यार्थी व शिक्षकांकडून होत आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment