दिनविशेष तेजाच्या उपासनेची....आज दीप अमावस्या.

 दिनविशेष 

तेजाच्या उपासनेची....आज दीप अमावस्या

 


               जिवती पूजनाला काही ठिकाणी जरा-जिवंतिका पूजन असेही म्हटले जाते. या दिवशी जिवतीचे चित्र देवघरात किंवा भिंतीवर लावून त्याची पूजा केली जाते. मुलांना औक्षण करण्याची, सुवासिनींना हळदी-कुंकू देण्याची आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याचीही महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांत परंपरा आहे.  

दीपपूजा (दीप अमावस्या) आणि जिवतीची पूजा या महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाच्या धार्मिक परंपरा आहेत. दोन्ही विधींचा मूळ उद्देश कुटुंबाचे कल्याण, मुलांचे आरोग्य आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणणे हा आहे.
१. दीपपूजा (दीप अमावस्या)
आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच आषाढ अमावस्येला 'दीप अमावस्या' किंवा दिव्यांची आवस साजरी केली जाते. 

  • महत्त्व: दिवा हे मांगल्याचे, ज्ञानाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. वर्षभर आपल्याला प्रकाश देणाऱ्या आणि अंधार दूर करणाऱ्या पणत्या, समई, निरांजन यांसारख्या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जाते.
  • पूजन पद्धती: या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ घासून पुसून, पाण्याने धुऊन वाळवले जातात. पाटावर तांदूळ पसरून त्यावर हे सर्व दिवे मांडले जातात. दिव्यांना हळद-कुंकू, अक्षता आणि फुले वाहून पूजा केली जाते. गुळाचे किंवा तिळाचे दिवे लावून नैवेद्य दाखवला जाते.
  • उद्दिष्ट: पावसाळ्यातील गडद अंधार आणि मनातील नकारात्मकता दूर करून, पवित्र श्रावण महिन्याचे स्वागत करणे हा यामागील हेतू आहे.

        *दीपज्योति: परब्रह्म:*

        *दीपज्योति: जनार्दन:।*

        *दीपोहरतिमे पापं*

        *संध्यादीपं नामोस्तुते ॥*

        *शुभं करोतु कल्याणमारोग्यं*

        *सुखं सम्पदां ।*

        *शत्रुवृद्धि विनाशं च*

        *दीपज्योति: नमोस्तुति ॥*     

       हे दीपज्योति, तू शुभ.. कल्याण करणारी.. आरोग्य.. धनसंपदा देणारी.. शत्रूबुद्धीचा नाश करणारी आहेस. तू जनार्दन आहेस. तुला नमन.

        आज चातुर्मासातील चैतन्यदायी सण अर्थात दीप अमावस्या. घरोघरी स्वच्छता होणार. या आषाढातील पावसाने घरातील हवेत आलेला कोंदटपणा.. अलक्ष्मी दूर होणार. उंबरा असो वा देवघर रांगोळीने, फुलाफुलानी सजणार. आज रस्त्यालगत भरपूर प्रमाणात उगवलेल्या आघाडा तसेच केना या आयुर्वेदिक गुणकारी झाड पानांचे हार देवासाठी होणार.

        भारतीय संस्कृतीत परमेश्वर पूजनातील सर्वात महत्त्वाचे प्रतिक म्हणजे दिवा. या दिव्याची ज्योत म्हणजे तर जिवंतपणाचे द्योतक. आपले शरीर हे पंचमहाभूतांनी व्यापले आहे. अग्नी जो तेज देतो.. ज्याची ज्योत प्रत्येक हृदयी आहे, ही ज्योत आहे तोपर्यंत जीव असतो. ही ज्योतच जीवन तेजस्वी करते. भारतीय संस्कृती म्हणूनच तेजाचे, म्हणजेच दिव्यांचे पूजन करते.

        पहाटे सूर्यदेवाकडे हात जोडले जातात. तर दिवस मावळतीला अंधार पसरू लागला की देवापूढे दिवा लावून उपासना होते. दिव्याकडून तेज प्राप्त केले जाते. जिथे तेज आहे तिथेच लक्ष्मी राहते. या प्राप्त झालेल्या शुभ.. धवल लक्ष्मीने घरोघरी सुख.. समृद्धी आनंद प्राप्त होतो. या लक्ष्मीचा उपयोग करुन जगात सेवाकार्य होते. त्याचे फायदे दहाही दिशात दिसतात.

        मानवी जीवन हे तेजस्वी असले तरच त्या जीवनाला जगात किंमत असते. या दिव्यांच्या तेजाने जगातील.. मनातील अंधार संपतो.. शत्रूभावनेचाही नाश होतो. संकटे टळतात. स्वच्छ दृष्टीने जग न्याहाळता येते. जगाविषयी शुभ.. कल्याणकारी भावना मनात रुजविण्याचे कार्य या दिव्याच्या उपासनेने घडते. दिव्याकडून प्राप्त होणाऱ्या तेजाने निरामय आरोग्य.. लक्ष्मी लाभ.. सुखशांती प्राप्त होत जीवन उजळून जाते.

        *तेलतुपाच्याच एका दिव्याच्या ज्योतीने हजारो दिवे लागतात. प्रत्येक शुभप्रसंगी, विजयासाठी निघालेल्या आणि विजय प्राप्तीनंतर औक्षण केले जाते ते याच दिव्यांनी. देवाची आरती होते ती याच तेलतुपाच्या दिव्यांनी. वाढदिवसाच्या दिवशीही याच दिव्यांनी औक्षण केले जाते. जीवनात तेज प्राप्त होते ते याच दिव्यांनी.         

        आज घरोघरी तेल तूपाचे सर्व दिवे घासून स्वच्छ होणार. प्रज्वलीत दिव्यांची मांडणी करुन त्यांचे हार फुलासह विधीवत पूजन होणार. हे लखलखीत उजळलेले एकत्रित प्रज्वलीत दिवे बघणेही आनंददायी. आज पूर्वज आपल्या घरातील आनंद बघायला येणार म्हणून घरातील सगळे दिवे लावून वाट दाखवली जाणार. या दिव्यावरचेच नाही तर  मनावरचे अविचाराचे.. अंधाराचे मळभ.. अकारण भीती.. चिंता दूर होत जीवन प्रकाशमान होणार.

        आज घर हे प्रसन्नतेने मंगलमय.. सात्त्विक प्रकाशाने न्हावून निघणार.. लक्ष्मीला या घराची वाट सापडणार. श्रावणालाही हे हर्षभरीत घर सापडून तो पण उद्या आनंद व्दिगुणीत करायला येणार. तर म्हणू या..

        *दीप सूर्याग्निरुपस्त्वं*

        *तेजसां तेज उत्तमम्‌ ।*

        *गृहाण मत्कृतां पूजां*

        *सर्वकामप्रदो भव ॥*

        हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.

        दिवा.. जो 'चिन्मय' आहे. तो ज्ञान आणि चेतना युक्त आहे. तेव्हा हे दीपका, तू जीवनातील अंधार दूर करून हे जीवन उजळून टाक. उदासिनता दूर कर. नवचैतन्य दे. फुलाप्रमाणे विकसित होवू दे. तुझ्या किरणात मला पक्ष्याप्रमाणे आकाशांत विहार करु दे.. प्रगती करू दे. जगाकडे.. सृष्टीकडे सकारात्मकतेने बघण्यासाठी ज्ञानाची नवी दृष्टी दे. सुर्या प्रमाणे आमचे जीवन तेजस्वी होवू दे. अशी प्रार्थना आपण आज करूयात.


  *तेजोमया हे चिन्मया*

  *उजळून या तिमिरात या*


  *नैराश्य हे जावो दुरी*

  *नवचेताना उगावो उरी*

  *विकसून या कुसुमांत या*


  *किरणांमध्ये बुडू दे मला*

  *मनमोकळे उडू दे मला*

  *विहगांपरी गगनात या*


  *ज्योतिर्मया सृष्टी नवी*

  *बघण्यास द्या दृष्टी नवी*

  *नव सूर्य व्हा हृदयात या*

               *१२.०८.२०२६*

 दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.