कालचक्र. काँग्रेसचे प्रभू रामचंद्राचे बेगडी प्रेम.
कालचक्र.
काँग्रेसचे प्रभू रामचंद्राचे बेगडी प्रेम.
प्रभू रामचंद्र हे करोडो देशवासीयांचे श्रद्धास्थान आहे. त्यांचा योग्य तो मान जपला गेलाच पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय प्रवक्ते अलोक वर्मा यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केले आहे. राम मंदिराच्या देणगीतील अपहार हा रामभक्तांच्या श्रद्धेचा अपमान असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
प्रभू रामचंद्र हे करोडो देशवासीयांचे आणि त्यातही हिंदूंचे श्रद्धास्थान असल्याचे काँग्रेस पक्षाने मान्य करावे हा त्यांना काळाने शिकवलेला धडा आहे की हे त्यांचे राजकारण आहे हे स्पष्ट व्हायला हवे. याला कारण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेसचे हिंदू देवदेवता विरोधी असलेले धोरण हेच कारणीभूत आहे, असे म्हणता येईल. जर प्रभुरामाचंद्र हे करोडो देशवासीयांचे श्रद्धास्थान आहे हे काँग्रेसला मान्य असते तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच अयोध्येत रामा मंदिराची पुनर्बांधणी सुरू झाली असती. मात्र ती पुनर्बांधणी सुरु होण्यासाठी २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाला निकाल द्यावा लागला होता. त्याआधी हिंदुत्ववादी संघटनांना दोन दशके संघर्ष करावा लागला होता. काही रामभक्तांना त्यांचे प्राण देखील गमवावे लागले होते. त्या काळात अयोध्येत राम मंदिर व्हावे याला काँग्रेसने सातत्याने विरोध केला होता. इतकेच काय पण रामसेतू प्रकरणात आणि राम मंदिर प्रकरणातही तत्कालीन काँग्रेस सरकारने प्रभू रामचंद्र हे काल्पनिक पात्र असल्याचा दावा न्यायालयात केला होता. ज्यावेळी राम मंदिर उभे झाले आणि त्याचे देशाला लोकार्पण झाले, त्या सोहळ्याकडे देखील काँग्रेसजनांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे आता केंद्रात सत्ता गेली आहे, ती परत येण्याची समोर संधी दिसत नाही, आणि हळूहळू सर्व राज्यातही सत्ता हातातून जाते आहे,ती परत मिळवायची असेल तर हिंदू मतदार आपल्या बाजूने वळला पाहिजे. त्यासाठी काँग्रेसचे हे बेगडी प्रेम आहे हे स्पष्ट दिसते आहे.
ज्या काँग्रेसने मुस्लिमांचे लांगुलचालन करण्यासाठी आतापर्यंत राममंदिराला प्राणपणाने विरोध केला त्यांच्याच नाकावर टिचून आज देशात राम मंदिर उभे झाले आहे, आणि गत दोन वर्षात राम मंदिराने तिथे भेट देणाऱ्या भाविकांचे आणि परदेशी पर्यटकांचे सर्व रेकॉर्ड तोडलेले आहेत. आतापर्यंत भारतात सर्वात प्रेक्षणीय स्थळ हे आग्र्याचा ताजमहाल समजले जात होते. मात्र राम मंदिर उभे झाल्यापासून आग्र्याला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे जगातील मुस्लिम देश चिंतित झाले आहेत. त्याच्याच सूचनेवरून मुस्लिम धार्जिणे काँग्रेसजन आता राम मंदिराला बदनाम करू बघत आहेत. म्हणून राम मंदिरातील चोरीचा मुद्दा काँग्रेसने आता प्रचारासाठी महत्त्वाचा बनवला आहे आणि त्यावरून राजकारण सुरू केले आहे.
तसा विचार करता मंदिरातील चोरी हा काही इथे पहिला प्रकार नाही. यापूर्वी तुळजापुरात घोटाळे झाले होते. शिर्डीच्या साई मंदिरातही घोटाळे झाले होते. इतकेच काय पण अजमेरच्या चिस्ती दर्गा मध्ये देखील गडबडी झाल्याच्या बातम्या होत्या. तिरुपतीच्या बालाजी मंदिरातील लाडवाच्या प्रसादाचा घोटाळा तर ताजाच आहे. मात्र त्या प्रकारात काँग्रेसने कधीच तोंड उघडले नव्हते. आताच त्यांना प्रभू रामचंद्र हा लाखो करोडो देशवासीयांचा श्रद्धेचा विषय असल्याचा साक्षात्कार का व्हावा याचे सहज सोपे उत्तर म्हणजे त्यांना अयोध्येतील राम मंदिर बदनाम करायचे आहे हेच असू शकते.
देशात काँग्रेसचे सरकार आल्यापासून त्यांनी कायम हिंदूहिताला विरोधच केला आहे. देशा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर सर्वप्रथम सरदार पटेल यांनी सोमनाथच्या मंदिराचा पुनर्विकास केला. त्याला देखील पंडित नेहरूंनी विरोध केला होता. सोमनाथ मंदिराच्या लोकार्पणाला जाण्यासाठी तत्कालीन राष्ट्रपतींना देखील नेहरूंनी अडथळे आणले होते. हिंदूंच्या मंदिरावर सरकारी नियंत्रण आणण्याचा कायदाही काँग्रेसनेच केला होता. मशिदीसमोरुन वाद्य वाजवत जाऊ नका असे हिंदूंवर बंधन घालणाऱ्या काँग्रेसने मुस्लिमांना मात्र मशिदीवर भोंगे लावून दिवसातून पाच वेळा नमाज अदा करण्यास परवानगी दिली होती. हिंदू शाळांमध्ये धार्मिक शिक्षणाला मनाई असताना मुस्लिम मदरशांमध्ये मात्र खुलेआम परवानगी होती. शहाबानू खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मुस्लिम जन दुखावतील या भीतीने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विपरीत कायदाच बदलण्याचे पाप काँग्रेसनेच केले होते. असे हिंदूंवर अन्याय करणारे अनेक प्रकार काँग्रेसच्या काळात झाले. त्यामुळेच देशात समान नागरी कायदा लागू शकला नाही.
हे सर्व काँग्रेस आज विसरली असेल, पण देशातील सुजाण सामान्य नागरिक अजूनही विसरलेला नाही. त्यामुळेच काँग्रेसला आज प्रभू रामचंद्र हे देशातील करोडो देशवासीयांचे श्रद्धास्थान आहे हा साक्षात्कार होण्यामागे नेमके काय राजकारण आहे हे सर्वसामान्य जनता जाणते.
अर्थात हे काँग्रेसवाल्यांना लक्षात येत असूनही हे लक्षात आल्यासारखे दाखवत नाहीत हे विशेष. मात्र मांजर दूध पिताना डोळे मिटून घेते आणि आपल्याकडे कोणी बघत नाही असे मांजरीला वाटते. त्यावेळी आजूबाजूला कोणीतरी बघत असतेच. तेच काँग्रेसचे होते आहे. आज काँग्रेसला हिंदूंचे बेगडी प्रेम जागृत झाले आहे हे स्पष्ट दिसते आहे. देशातील बहुसंख्य रामभक्तांनी हे ओळखले आहे याचे भान काँग्रेसने आता ठेवायला हवे.
✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment