पटतंय का बघा....! डॉ. गिरीश गांधी.. संकुल प्रकरणात श्वेतपत्रिका काढण्याची आज घोषणा करा..

 पटतंय का बघा....!

डॉ. गिरीश गांधी.. संकुल प्रकरणात श्वेतपत्रिका काढण्याची आज घोषणा करा..



आज दुपारी एक वाजता विदर्भ साहित्य संघाची वार्षिक आमसभा होऊ घातली आहे. साहित्य संघातील म्हैसाळकर युग संपून गांधी युग सुरू झाल्यानंतरची ही पहिलीच आमसभा असेल. त्यामुळे इथे काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

विदर्भ साहित्य संघात आणि त्या योगे विदर्भाच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वर्तुळात सध्या एकच मुद्दा गाजतो आहे, तो म्हणजे साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलाचा. नुकतेच विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिक नारायण कुळकर्णी कवठेकर यांनी नागपुरात एका पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना विदर्भ साहित्य संघ आता जुना राहिला नसून त्याचा मॉल झाला आहे अशी खंत व्यक्त केली होती. जाहीररीत्या कुळकर्णींनी अशी खंत व्यक्त करावी याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. आजच्या बैठकीत हे मुद्दे उपस्थित होतील याबद्दल शंका नाही. 

विदर्भ साहित्य संघाची झाशी राणी चौकातील जुनी इमारत हे नागपूरचेच नव्हे तर विदर्भाचे एक सांस्कृतिक वैभव होते असे म्हटल्यास वावगे ठरु नये. १९९५ मध्ये ही इमारत पाडली गेली, आणि गेल्या ३१ वर्षात ही इमारत पुन्हा पूर्वीसारखी उभे राहू शकलेली नाही हे दुर्दैवी वास्तव स्वीकारावेच लागते. १९९५ नंतर २००२ पर्यंत संकुल पूर्ण झाले नाही म्हणून ज्या सदस्यांनी आवाज उठवला त्यांना निष्कासित करून तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी उर्वरित आजीवन सदस्यांमध्ये एक दहशत निर्माण केली होती. साहित्य संघातील म्हैसाळकर युग संपल्यामुळे आता ती दहशत सुद्धा संपल्यासारखी दिसते आहे. त्यामुळेच आता आवाज उठवणे सुरू झाले आहे. 

विशेष म्हणजे गेल्या ३४ वर्षात या सर्व प्रक्रियेत सहभागी असणारे सर्व जरी नाही, तरी त्यातले काही जण आता विरोधी बाकावर आले आहेत. त्यामुळे आता त्यांनाही कंठ फुटलेला दिसतो आहे. 

मध्यंतरी या  संदर्भात समाज माध्यमांवर मी एक पोस्ट व्हायरल केली होती. त्यात नवे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांनी १९९२ पासून या संकुल प्रकरणात जे काही घडले, त्यावर एक श्वेतपत्रिका काढावी आणि या सर्व प्रकाराला जबाबदार असणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्याच्या खुलाशात साहित्य संघात दीर्घकाळ उपाध्यक्ष पदावर राहिलेले डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी माझ्याकडे खुलासा पाठवला होता. जो काही करार झाला होता तो विकासक आणि साहित्य संघाचे विश्वस्त मंडळ यांच्यात झाला होता आणि कार्यकारिणीचे त्याच्याशी काहीही देणे घेणे नाही असे जोशींचे म्हणणे होते. 

इथे प्रश्न असा येतो की मग कार्यकारिणीची काहीच जबाबदारी नाही का? कार्यकारिणीचा अध्यक्ष हा विश्वस्त मंडळाचा पदसिद्ध सदस्य असतो असे जोशींनीच आपल्या खुलाशात म्हटले आहे. मग कार्यकारिणी अध्यक्षांना तर जाब विचारू शकतेच ना. तो जाब त्या त्यावेळी का विचारला गेला नाही हा देखील प्रश्न उपस्थित होतो. जर समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत तर कार्यकारिणी सदस्यत्वाचा राजीनामा देऊन जाहीर नाराजी व्यक्त करणे देखील जोशींना शक्य होते. मात्र त्यांनी ते केले नाही हे देखील वास्तव नाकारता येत नाही.

दुसरे असे की आज सकाळी माझ्यासारख्याच एका हितचिंतकाने प्रसारित केलेल्या पोस्टमध्ये साहित्य संघ आणि विकासक यांच्यात झालेल्या करावयाच्या तारखा आणि त्यावर कोणाकोणाच्या सह्या होत्या याची नेमकी माहिती दिली आहे. त्यानुसार या तीनही करारांवर तत्कालीन कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या असल्याचे आढळून आले आहे. त्यात काही ठिकाणी डॉ. जोशींच्याही सह्या असल्याचे सांगितले गेले आहे. त्यामुळे डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी ती जबाबदारी विश्वस्त मंडळावर झटकणे हा प्रकार "मी नाही त्यातली, अन् कडी लावा आतली" अशातलाच आहे असे म्हणता येईल. संकुलाचे कामकाज ३१ वर्षातही पूर्ण होत नाही आणि या ३१ वर्षात तत्कालीन कार्यकारिणी सदस्य काहीही आवाज उठवत नाहीत याचाच अर्थ एखाद्याने हे कार्यकारिणी सदस्य देखील या प्रकरणात लाभार्थी होते का असा काढला तर तो चुकीचा ठरु नये. 

आज साहित्य संघात म्हैसाळकर युग संपून गांधी युग सुरू झाले आहे. त्यामुळे म्हैसाळकर युगात पदाधिकारी असलेले आणि आज मतदारांनी नाकारल्यामुळे  सत्तेबाहेर असलेले आजीवन सदस्य संकुलाबाबत विद्यमान कार्यकारिणीला जाब विचारणार अशी माहिती आहे. त्यातही आमसभेत आपल्यावर काही बालंट येवू नये म्हणून काही मंडळी आम सभेला जाणारच नाहीत, पण आपापल्या माणसांकरवी प्रश्न उपस्थित करण्याची त्यांनी तयारी केली आहे, अशीही माहिती मिळते आहे. हे जर खरे असेल तर या सर्व मंडळींना आज संकुल पूर्ण झाले नाही म्हणून ओरड करण्याचा नैतिक अधिकार आहे का हा देखील प्रश्न उपस्थित होतो. कार्यकारिणीत असतानाच त्यांनी या प्रकरणात हालचाली का केल्या नाहीत हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. 

त्यामुळेच आजच्या आमसभेत विदर्भ साहित्य संघाचे नवे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांनी गत ३४ वर्षात संकुल प्रकरणात जे काही व्यवहार झाले आणि सकुल पूर्ण होण्यामध्ये ज्या अडचणी आल्या आणि जी दिरंगाई झाली त्या सर्व प्रकरणाची  उच्चस्तरीय चौकशी करून एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची घोषणा करावी आणि या प्रकरणात तत्कालीन कार्यकारणीतील जे जे जबाबदार आहेत, त्या सर्वांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल अशी देखील घोषणा करावी, ही एक साहित्यप्रेमी म्हणून माझी मागणी आहे. माझ्या मागणीला विदर्भातील इतर साहित्यप्रेमी देखील पाठिंबा देतील अशी आशा आहे. 

दुसरे असे की २००२ मध्ये संकुल पूर्ण झाले नाही म्हणून आवाज उठवणाऱ्या सहा आजीवन सदस्यांना तत्कालीन कार्यकारिणीने कायमचे निष्कासित केले होते. त्यानंतर देखील संकुल पूर्ण झाले नाही, आणि आजही ते अपूर्णच आहे. इतकेच नव्हे तर सध्या ते वादग्रस्त ठरले आहे. नागपूर महापालिकेचे अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्यामुळे आता तिथे पुन्हा एकदा कार्यक्रम घेणेदेखील बंद करावे लागले आहे. तिथून कार्यालय देखील पुन्हा इतरत्र हलवण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर तिथे एक सभागृह असतानाही आज आमसभा दुसऱ्या जागेत घेण्याची वेळ आली आहे. हे बघता त्यावेळी आवाज उठवणारे कुठेही चुकले नव्हते तर त्यांनी साहित्य संघाच्या आपुलकीपोटीच आवाज उठवला होता हे स्पष्ट होते आहे. त्यावेळी निष्कासित करणारे कार्यकारिणी सदस्यच आज विरोधी गटात बसलेले आहेत हे दिसते आहे. आता त्यावेळी निष्कासित करणारे सर्व तत्कालीन पदाधिकारी या सहा निष्कासित सदस्यांची आणि हा सर्व गोंधळ घातल्याबद्दल साहित्य संघाच्या सर्व सदस्यांची जाहीर माफी मागणार का आणि आम्ही केलेले निष्कासन चुकीचे होते याची जाहीर कबुली देत पुन्हा या सदस्यांना सदस्यत्व बहाल केले जावे याची मागणी करणार का हा देखील वैदर्भियांचा सवाल आहे. 

आठवडाभरापासून विदर्भ साहित्य संघाचे नवे अध्यक्ष डॉ गिरीश गांधी यांची प्रकृती बिघडली होती, किंवा बिघडवली होती, आणि त्यामुळे ते आमसभेला उपस्थितही राहणार नाहीत अशी चर्चा सुरू होती. एव्हाना गिरीश गांधींची प्रकृती सुधारली असेल आणि त्याच बैठकीला येतील अशी खात्री आहे. डॉ. गिरीश गांधी हे एकूणच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चालणारे आणि व्यापक जनहित लक्षात घेऊन काम करणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ते या प्रकरणात योग्य तो निर्णय घेतील अशी वैदर्भीयांची अपेक्षा आहे. 


✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.