पुस्तक परीक्षण.. सामान्य वाचकालाही वाचायला आवडेल असे "अजिंक्य योद्धा".

 पुस्तक परीक्षण..

सामान्य वाचकालाही वाचायला आवडेल असे "अजिंक्य योद्धा"

साधारणपणे मान्यवरांची चरित्रे म्हणजे त्यांच्या जीवनप्रवासाचा एक दस्तावेज म्हणूनच त्याकडे बघितले जाते. त्यामुळे त्या मान्यवरांचे जीवन चरित्र अभ्यासासाठी त्या दस्तावेजाचा निश्चितच उपयोग होतो, मात्र सामान्य वाचकांना ते रुचतेच असे नाही. आजच्या तरुणाईच्या भाषेत सांगायचे तर ते "बोअरिंग" वाचन असते.

त्यामुळेच आता काही मान्यवरांची चरित्रे कादंबरी रूपातही प्रकाशित केली जातात. अशी चरित्र सामान्य वाचकांना वाचण्यासाठी निश्चितच आवडतात. मराठीतील ख्यातनाम लेखिका शुभांगी भडभडे यांनी हा प्रयोग यशस्वीरित्या केला होता. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, अशा अनेक मान्यवरांच्या जीवनावर कादंबऱ्या प्रकाशित केल्या होत्या, आणि त्या चांगल्याच गाजल्या देखील होत्या. 

मात्र कादंबरी म्हटली की त्यात लालित्य आणण्यासाठी बरेचदा लेखकाला काही मनाचे प्रसंग, कपोलकल्पित वर्णन सुद्धा त्यात टाकावे लागते. अशावेळी ते लेखन क्वचित प्रसंगी वास्तवापासून दूर जाणारे देखील असू शकते. मात्र पूर्णतः वास्तवावर आधारित पण वाचकांना रंजक वाटेल असे लेखन झाले तर अशा चरित्रांचे निश्चितच स्वागत होते. 

गत बारा वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेले विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवन चरित्रावर आधारित "अजिंक्य योद्धा" या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच नागपुरात पार पडले. नागपुरातीलच एक ज्येष्ठ लेखक अरुण कणेर यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. सुमारे ३६० पानांचे हे पुस्तक माझ्या मते तरी वाचकांच्या अपेक्षा पूर्ण करते आणि सामान्य वाचकाला देखील हे पुस्तक संपूर्ण वाचावेसे वाटते. 

देवेंद्र फडणवीस हे एक धडाकेबाज नेतृत्व म्हणून महाराष्ट्रात नव्हे देशात आज मान्यता पावलेले आहे. त्यामुळे त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल, तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सर्वसामान्य वाचकांना कुतूहल असणे सहाजिकच असते. "अजिंक्य योद्धा" हे ३६० पानांचे पुस्तक सर्वसामान्य वाचकांच्या अपेक्षा निश्चितच पूर्ण करेल असे बेतलेले आहे. ऐ

पुस्तकाच्या रंगीत मुखपृष्ठावर देवेंद्रजींच्या हसतमुख छायाचित्रासह हिंदी कवितेच्या चार ओळी लिहिलेल्या आहेत

 मेरा पानी उतरता देख. मेरे किनारे पर घर मत बना लेना..

 मै समुंदर हूं

 लोटकर वापस आऊंगा..

 या चार ओळीच देवेंद्र फडणवीस यांच्या संघर्षशील व्यक्तिमत्त्वाची पुरेपूर कल्पना देणाऱ्या आहेत. विशेषतः २०१९ मध्ये महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासाठी जे काही राजकारण झाले, परिणामी बहुमतातला पक्ष असूनही देवेंद्रजींना विरोधी पक्षात रहावे लागले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या विरोधकांना हाच इशारा दिला असेल हे या चार ओळींमधून जाणवते. हा इशारा त्यांनी २०२२ मध्ये खरा करून दाखवला आणि २०२४ मध्ये त्यांच्या किनाऱ्यावर घरे बसवणाऱ्या विरोधकांची घरे उद्ध्वस्त करून ते पुन्हा मुख्यमंत्री देखील झाले होते. 

साधारणपणे चरित्र म्हटले की त्या व्यक्तीच्याच आयुष्यावर लिहिलेले असते. मात्र लेखक अरुण कणेर यांनी फडणवीस परिवार नागपुरात कसा आला इथपासूनचा इतिहास मांडताना नागपूरकर भोसले यांच्या राजवटीचा इतिहास देखील वाचकांसमोर चित्रीत केला आहे. भोसल्यांबरोबर आलेले फडणवीस नंतर इथे कसे स्थिरावले आणि ते चंद्रपूर जिल्ह्यातील मूलचे मालगुजर कसे झाले, नंतर देवेंद्रजींचे वडील नागपुरात कसे आले आणि त्यांनी राजकारण कसे केले, हा सर्व इतिहास लेखकाने वाचकांसमोर मांडला आहे. इतकेच काय पण फडणवीस घराण्यातील इतर सदस्यांबाबत देखील या पुस्तकात माहिती आलेली आहे. गंगाधररावांसोबत परिवारातील दुसऱ्या राजकारणी शोभाताई फडणवीस यांच्याबाबत देखील माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. 

या पुस्तकात देवेंद्रजींचा जन्म, त्यांचे बालपण, त्यांचे शालेय शिक्षण, त्या वयातही काँग्रेसला त्यांनी केलेला विरोध, महाविद्यालयीन शिक्षण, तेव्हापासूनच त्यांच्यात आलेले नेतृत्व गुण, नंतर नगरसेवक महापौर आमदार पक्षाचे सरचिटणीस प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री इथपर्यंतचा सर्व इतिहास लेखकाने समर्पक शब्दात मांडला आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेली महत्त्वाची कामे, त्या काळात त्यांच्यासमोर असलेली राजकीय आव्हाने, त्यांचा केलेला सामना, प्रसंगी माघार घेत पक्षादेश पाळण्यासाठी स्वीकारलेले उपमुख्यमंत्रीपद आणि "मी पुन्हा येईन" हा खरा केलेला शब्द याची सविस्तर माहिती या पुस्तकात आलेली आहे. त्याचबरोबर त्यांचे कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन याबद्दलही लेखकाने योग्य तो प्रकाश टाकला आहे. विशेष म्हणजे लेखकाने देवेंद्रजींचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून माहिती मिळवली असल्यामुळे ती अधिकच निर्दोष झाली आहे आणि तितकीच वाचनीय सुद्धा झाली आहे. प्रत्येक पानावर लेखकाने रंगीत छायाचित्रे टाकली असून त्यामुळे पुस्तक आकर्षक झाले आहे. एकूणच हे पुस्तक फक्त अभ्यासकांसाठी न राहता सामान्य वाचकालाही आपलेसे वाटेल अशा रंजक पद्धतीने लेखकाने देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तीचित्र रेखाटले आहे. 

पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणात येणाऱ्या प्रत्येक तरुणाने हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि अभ्यास करावा असे आवाहन केले होते. त्यापुढे जाऊन प्रत्येक सामान्य वाचकाने देखील हे पुस्तक वाचावे आणि सामान्य कार्यकर्ता सुद्धा स्वकर्तृत्वाने कसा मोठा होऊ शकतो ते अभ्यासावे असे मला सुचवावेसे वाटते. 

अविनाश पाठक 

अजिंक्य योद्धा :-लेखक - प्रा. अरुण कणेर 

प्रकाशक - साईज्योती पब्लिकेशन, नागपूर..

मुल्य ₹ ७९९/-

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.