सहज सुचलं म्हणून... प्रकाशित साहित्याचे परिक्षण वृत्तपत्रात यायलाच हवे...

 सहज सुचलं म्हणून...

प्रकाशित साहित्याचे परिक्षण वृत्तपत्रात यायलाच हवे...



नुकतेच माझ्या म्हणजेच अविनाश पाठक लिखित "आयुष्यातले सांगाती" भाग १,२, आणि ३ या तीन पुस्तकांचे माजी राज्यपाल आणि भारतीय विद्या भवन चे राष्ट्रीय अध्यक्ष बनवारीलालजी  पुरोहित यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशन पार पडले. यावेळी बोलताना बनवारीलालजी पुरोहित यांनी चांगल्या साहित्याची दखल घेत सर्व वृत्तपत्रांनी त्यावर समीक्षणे प्रकाशित करायला हवीय, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

पुरोहित यांची ही अपेक्षा अगदी रास्तच म्हणावी लागेल. मात्र आजच्या काळात वृत्तपत्रात बातम्या आणि लेख यांच्यापेक्षा जेव्हा जाहिरातींना जास्त महत्त्व आले आहे. त्या परिस्थितीत या समीक्षणांना जागाच दिली जात नाही असे गेल्या काही वर्षात दिसून आले आहे. विशेषतः मोठ्या राज्यव्यापी वृत्तपत्रांमध्ये तर आता कशाला पाने वाया घालवायची अशीच भूमिका घेतलेली दिसून येते. त्यामुळे पुरोहित यांची ही अपेक्षा आजची वृत्तपत्रे कितपत पूर्ण करतील हा देखील प्रश्नच आहे. 

मला आठवते, जुन्या काळात प्रत्येक वृत्तपत्रात नव्या पुस्तकांचे परीक्षण किंवा परिचय दिला जात असे. त्यामुळे नवे साहित्य कोणते बाजारात आले आहे याची माहिती वाचकांना होत असे. आणि सहाजिकच ती पुस्तके विकली देखील जात असत. त्याच धर्तीवर आकाशवाणी किंवा दूरदर्शनवर देखील नव्या पुस्तकांवर कार्यक्रम होत असत. मला आठवते नागपुरातील उर्दू गजलांचे एक अभ्यासक डॉ. विनय वाईकर यांनी उर्दू गजलांमध्ये येणारे शब्द त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी अर्थ आणि त्या शब्दाला अनुरूप अशी असा एक शेर असे असा एक शब्दकोशच प्रकाशित केला होता. आईना ए गझल या नावाने प्रकाशित झालेला हा ग्रंथ गाजला तो दूरदर्शन आणि वृत्तपत्रांनी त्याचा परिचय करून दिल्यामुळेच. या पुस्तकावर आधारित एक कार्यक्रम मुंबई दूरदर्शनने "मुलखावेगळी माणसं" या कार्यक्रमात सादर केला होता. लगेचच मुंबईत पुस्तक विक्रेत्यांकडे या पुस्तकाबद्दल चौकशी केली जाऊ लागली, आणि मुंबईचे विक्रेते हे कोण शब्दकोशकार आहेत याचा शोध घेत नागपूरपर्यंत पोहोचले होते. या पुस्तकावर त्यावेळी दैनिक लोकसत्ताने अग्रलेख लिहिला होता. इतरही अनेक नियतकालिकांनी या ग्रंथावर समिक्षा प्रकाशित केली होती.

हे एक उदाहरण मी इथे नमूद केले. मात्र त्या काळात अशी अनेक पुस्तकांची समीक्षणे वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये छापून यायची. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, पुढारी, लोकमत अशा दैनिकांमध्ये रविवारच्या पुरवणीच्या दिवशी चक्क अर्ध पान या परीक्षणांसाठी राखून ठेवलेले असायचे. नागपूरच्या दैनिक तरुण भारतचे संस्थापक संपादक ग. त्र्यं उपाख्य भाऊसाहेब  माडखोलकर हे स्वतः साहित्यिक होते. त्यांच्या काळात त्यांनी दैनिक तरुण भारतात अनेक लेखकांना त्यांच्या पुस्तकांवर समीक्षण देऊन प्रसिद्धी दिली होती. हीच परंपरा त्यांच्यानंतर संपादक झालेल्या या.गो. वैद्य नंतर मामा घुमरे, लक्ष्मणराव जोशी, सुधीर पाठक यांनीही चालवली. नंतरच्या काळात मात्र व्यवस्थापकांनीच ही पद्धत बंद केली. एका पुस्तकाच्या परीक्षणाबद्दल एका मोठ्या वृत्तपत्रात मी विचारते, तेव्हा इतक्या शब्दांचा लेख तुम्ही द्या, आणि त्यामागे इतके इतके पैसे द्या आम्ही प्रकाशित करू असे मला उत्तर मिळाले होते. 

हे बघता हा आता व्यवहार झाला आहे का असाच प्रश्न येतो. आज वाचन संस्कृती संपत चालली आहे. त्यामुळे पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय देखील डबघाईला आलेला दिसतो आहे. मराठीत अनेक मान्यवर साहित्यिकांनी चिरंतन राहील असे अक्षर साहित्य निर्माण केले आहे. तीच परंपरा आजच्या पिढीने देखील पुढे चालवली आहे. आज लेखक वृत्तपत्रात लिहितात, तसेच समाज माध्यमांवर देखील लिहितात. त्यातील अनेकांचे लेखन खरोखरच दर्जेदार असते. मात्र हे लेखन मग ते वृत्तपत्रातले किंवा नियतकालिकातले असो, किंवा मग समाज माध्यमांवरचे, ते अल्पावधीतच शिळे होते. जर असे लेखन पुस्तक रूपाने प्रसिध्द झाले तर त्याचे महत्त्व चीरकालीन असते. ख्यातनाम साहित्यिक डॉ द.भि.कुळकर्णी म्हणायचे की कोणतेही लेखन पुस्तकरूपात ग्रंथालयाच्या कपाटात पोहोचले तर १०० वर्षांनतरही ते संदर्भ म्हणून वापरले जाते.त्यामुळेच हे सर्व साहित्य पुस्तकरूपात प्रकाशित होणे गरजेचे असते. 

आणि अशी पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचायला हवी असतील तर वृत्तपत्रांमध्ये या पुस्तकांवर समिक्षा यायलाच हवी आणि अशा साहित्यावर चर्चाही व्हायला हवी.साहित्य हे चिरंतन असते आणि ते टिकवण्याची जबाबदारी वृत्तपत्रांची देखील आहे. त्यांना ती टाळता येणार नाही हे सहज सुचलं म्हणून सांगावसं वाटते...

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.