लक्षवेधी:- कारवाया अनेक, तरीही रेती तस्करी कायम; जबाबदार कोण?

लक्षवेधी:-

 कारवाया अनेक, तरीही रेती तस्करी कायम; जबाबदार कोण?


मूल, दीपक देशपांडे 

  मूल तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात  नदिघाटांची मुदत संपल्यानंतर महसूल विभागाने पुन्हा एकदा धडक कारवाई करत एक पोकलँड आणि तीन हायवा वाहने जप्त केली आहेत. कारवाईचे स्वागत होत असले तरी यापूर्वीही अनेक वेळा अशा कारवाया झालेल्या असताना अवैध रेती व्यवसाय पुन्हा पुन्हा डोके वर काढत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

आजपासून बरोबर एक महिन्यापूर्वी २२ जून रोजी मध्यरात्री महसूल विभागाच्या अवैध गौण खनिज पथकाने राजोली आणि डोंगरगाव परिसरात कारवाई करत एक पोकलँड व तीन हायवा वाहने जप्त केली. सदर वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे. असे उत्तर मिळाले होते.

मात्र नागरिकांच्या मते, रेती घाट बंद होण्यापूर्वी आणि त्यानंतरही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती साठे निर्माण करण्यात आले. नदीपात्रातून दिवस-रात्र पोकलँड आणि हायवांच्या सहाय्याने रेती उपसा सुरू असल्याचे चित्र अनेकदा समोर आले. अनेक वाहनांवर कारवाई झाल्यानंतरही अवैध उत्खनन थांबले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, जर अवैध उत्खनन सुरू नव्हते तर इतके मोठे रेती साठे निर्माण कसे झाले? आणि जर सुरू होते, तर त्यावर वेळेत नियंत्रण का मिळवता आले नाही? 

विशेष म्हणजे, यापूर्वीही महसूल विभाग, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि जिल्हास्तरीय पथकांनी अनेक वाहने जप्त केली होती. लाखो रुपयांचा दंडही आकारण्यात आला होता. पाऊस पडून नदीच्या पात्रात पाणी भरले आहे तरीही अवैध रेती उत्खननाचे प्रकार कायम असल्याने केवळ वाहन जप्तीपुरती कारवाई पुरेशी नसून संपूर्ण साखळीची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

नागरिकांच्या मते, नदीकाठावरील रेती साठे, वाहतुकीचे मार्ग, स्टॉक पॉइंट आणि संबंधितांची भूमिका यांची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. तसेच गेल्या एक वर्षातील कारवायांची माहिती सार्वजनिक करून प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी.

अवैध रेती उत्खननामुळे शासनाचा महसूल बुडत असून नदीपात्रांचे नुकसान आणि पर्यावरणीय हानी होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात केवळ वाहनचालक किंवा मजुरांवर नव्हे तर मुख्य सूत्रधारांवर कारवाई होणे आवश्यक असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.नदिकाठावरील ग्रामीण भागात असलेल्या खेडेगावात लाखो रुपये ग्रामकमेटिंना विकासासाठी देऊन कंत्राटदार गावाजवळ रेतीसाठे निर्माण करुन तेथूनच त्याचा पुरवठा कसा करीत आहेत?याबाबतही चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणीही ग्रामस्थ करीत आहेत.

आता या प्रकरणात जिल्हा प्रशासन आणि खनिकर्म विभाग काय भूमिका घेतात? घेतीलच यांची अजिबात  शाश्वती नाही कारण  ही वस्तुस्थिती सगळ्यांना ठाऊक आहे ,तरीही काय कारवाई  होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.