माझंही मत... विदर्भ साहित्य संघाची आमसभा आणि डॉ. गिरीश गांधींचे आजारपण
माझंही मत...
विदर्भ साहित्य संघाची आमसभा आणि डॉ. गिरीश गांधींचे आजारपण

विदर्भातील १०० वर्ष जुन्या असलेल्या विदर्भ साहित्य संघ या संस्थेची वार्षिक आमसभा येत्या २६ जुलै २०२६ रोजी म्हणजेच रविवारी दुपारी होऊ घातली आहे. या संस्थेतील मनोहर म्हैसाळकर यांचा ४२ वर्षांचा प्रदीर्घ कालखंड संपून डॉ गिरीश गांधी राजवट सुरू झाल्यावर ही पहिलीच वार्षिक आमसभा असेल. त्यामुळे ही सभा वादळी होणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत.
त्यामुळेच की काय पण संस्थेचे नवे अध्यक्ष डॉ गिरीश गांधी हे आजारी पडले असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या आठवडाभरात त्यांच्या सहमतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये देखील ते अनुपस्थित राहिले होते. आज गिरीश गांधींचा ७८ वा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून तीनदा फोन केला. मात्र त्यांनी उचलला नाही आणि त्यांनी कॉल बॅक देखील केला नाही. एरवी ते गडबडीत असले आणि फोन घेतला नाही, तर कॉल बॅक निश्चित करतात. मात्र आज तसे झाले नाही. त्यामुळे ते आजारी आहेत या दाव्याला पुष्टी मिळते आहे. आता ते किमान २६ जुलै पर्यंत आजारीच राहणार २५ जुलै च्या संध्याकाळी रुग्णालयात दाखल होऊन बैठकीत उपस्थित राहून आमसभेची अध्यक्षता करणे टाळणार की काय असे बोलले जात आहे.
डॉ. गिरीश गांधींच्या कुंडलीत सध्या साडेसाती, एखाद्या पापग्रहाची महादशा किंवा खडतर योग असावेत असे दिसते आहे. विदर्भ साहित्य संघाचे सांस्कृतिक संकुलाचे काम १९९५ पासून सुरू झाले. ते निर्धारित वेळात पूर्ण होत नव्हते. म्हणून काही आजीव सदस्यांनी आवाज उठवला. त्यावेळी त्या सहा सदस्यांना कार्यकारिणीने निष्कासित करून टाकले. तेव्हापासून म्हैसाळकरांच्या विरोधात कोणी फारसे बोलत नव्हते. सर्वच आजीव सदस्यांनी या प्रकाराचा चांगलाच धसका घेतला होता. मात्र गिरीश गांधींनी सूत्रे घेतली आणि एक एक मुद्दा वर काढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वयाच्या ७८ व्या वर्षी ही काय डोक्याला कटकट लागली असे गिरीश गांधींना वाटत असावे.
या आमसभेचे आयोजन विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलाच्या सभागृहात करण्यात आलेले नसून ते वोकहार्ट हॉस्पिटलच्या मागे असलेल्या साई सभागृहात करण्यात आले आहे. त्यामुळे संस्थेची स्वतःची इमारत असताना आणि तिथे सभागृह असताना भाड्याने सभागृह घेण्याची वेळ का यावी असा प्रश्न काही विरोधी सदस्यांनी उपस्थित केला असल्याची बातमी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये छापून आली आहे. त्याशिवाय संस्थेच्या शताब्दी वर्षात राज्य शासनाने साहित्य संघाला दहा कोटी रुपये ठेव स्वरूपात ठेवण्यासाठी दिले होते, आणि त्याच्या व्याजात साहित्य संघाचा खर्च चालवावा असे सांगण्यात आले होते. तरीही गिरीश गांधींनी साहित्य संघाचे अध्यक्ष झाल्यावर साहित्यप्रेमींना साहित्य संघासाठी आर्थिक मदत मागणे सुरू केले आहे. असा पैसा मागण्याची गरज का पडावी हा देखील प्रश्न विचारला जात आहे.
विदर्भ साहित्य संघाचे सांस्कृतिक संकुल उभे करण्याला १९९५ मध्ये सुरुवात झाली अजूनही ते पूर्ण झालेले नाही. मात्र तिथे दुकानेही लागली आणि संघाचे कार्यालय देखील सुरू झाले. इतकेच काय पण छोट्या सभागृहांमध्ये नियमित कार्यक्रम देखील सुरू झाले. मात्र या इमारतीला नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे आता त्या इमारतीतून कार्यालय हलवले असून त्याचबरोबर तिथे कार्यक्रम घेणेदेखील बंद झाले आहे. तिथले ग्रंथालय आणि अभ्यासिका देखील बंद केली आहे अशी बातमी आहे. ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवायत इमारतीत कामकाज कसे सुरू केले हा देखील प्रश्न विचारला जातो आहे. नुकत्याच काही मोठ्या इमारतींमध्ये घडलेल्या आगीच्या घटना लक्षात घेता हा मुद्दा ऐरणीवर आला आहे असे बोलले जात आहे. आता या मुद्द्यावर देखील गिरीश गांधींना घेरले जाणार हे निश्चित आहे.
त्यातच काही कार्यकारिणी सदस्यांनी बाहेर केलेल्या काही वक्तव्यामुळे वातावरण अधिकच तापले आहे. या सर्वच बाबी आता वर येणार हे निश्चित आहे. त्यात हे सर्व प्रश्न उपस्थित करणारे गिरीश भाऊंच्या निकटच्या सहकारी असलेल्या एका पदाधिकाऱ्याच्या मते "माजोरडे" असेच गोळा झाले आहेत. हे "माजोरडे" आणि काही इतर सदस्य आमसभेत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार या भीतीनेच गिरीशभाऊंची तब्येत बिघडली किंवा त्यांनी बिघडवून घेतली असू शकते. म्हणूनच त्यांचे आजारपण खरे की राजकीय यावर साहित्य संघाच्या वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
वस्तूतः संकुल प्रकरणात जे काही झाले त्याला गिरीशभाऊ आणि सध्याच्या कार्यकारणीतील किमान अर्धे तरी पदाधिकारी निश्चितच जबाबदार नाहीत. मात्र आधीच्यांचे पाप आता याच्या उरावर येऊन पडते आहे, हेच गिरीश भाऊंचे मोठे दुर्दैव आहे. विशेष म्हणजे संकुल प्रकरणात ज्या कार्यकारिणीत निर्णय झाले, ते निर्णय घेणारे पदाधिकारीच "आता याचे काय करता?" म्हणून गिरीश भाऊंना प्रश्न विचारणार, हा देखील एक विरोधाभासच ठरेल.
२५ जुलै च्या संध्याकाळी गिरीश भाऊ जर रुग्णालयात भरती झाले, तर त्यांच्या गैरहजेरीत त्यांच्या तीन उपाध्यक्षांपैकी कोण सभेच्या अध्यक्षस्थानी राहणार ही देखील चर्चा सध्या जोरात आहे. गिरीशभाऊ ही जबाबदारी एखाद्या "माजोरड्या"वर टाकतात की अन्य कोणावर हे लवकरच कळेल.
अर्थात गिरीशभाऊ हे चतुर राजकारणी आहेत. ते परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळतील यात शंका नाही. मात्र त्यांच्या कार्यकाळात तरी साहित्य संघाचे आणि साहित्यिक वर्तुळाचे भले व्हावे हीच सर्वांची अपेक्षा असेल.
शेवटी जाता जाता गिरीशभाऊंना ७८ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांनी अजून किमान २२ वर्ष तरी ठणठणीत आयुष्य जगावे आणि त्यासाठी परमेश्वराने त्यांना सुदृढ आयुष्य द्यावे हीच प्रभुचरणी प्रार्थना. त्याचबरोबर त्यांची बिघडलेली किंवा बिघडवून घेतलेली (?) प्रकृती लवकरात लवकर दुरुस्त व्हावी आणि पूर्वीसारखे ठणठणीत होऊन हसतमुखाने ते कामाला लागलेले दिसावे ही देखील प्रभूचरणी प्रार्थना.
✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment