कालचक्र:-शरद पवार राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोबत जातील..?

कालचक्र.

 शरद पवार राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोबत जातील..?

 शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होणार का? आणि शरद पवार राष्ट्रवादी तसेच अजित पवार राष्ट्रवादी हे दोन पक्ष एकत्र येणार का? या विषयावर गेला जवळजवळ एक आठवडा माध्यमांमध्ये चर्वितचर्वण सातत्याने सुरूच आहे. त्यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एक नेते जयंत पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याने या चर्चेत जास्तच रंग भरला आहे. मात्र शरद पवारांनी या संदर्भात आपले हात वर केले आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे जयंत पाटील आणि अनिल देशमुख हे देखील "आम्ही नाही त्यातले" असे सांगत फिरत आहेत. 

माजी लोकसभा अध्यक्ष आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी नेहमी म्हणायचे की शरद पवार नेहमी जे बोलतात त्याच्या विपरीत वागतात. तसा अनुभव अनेकदा अनेकांना आलेलाही आहे. हे बघता आम्ही एकत्र येण्याचा कोणताही प्रस्ताव नाही आणि आम्ही एनडीए सोबत जाण्याचाही कोणताही प्रस्ताव नाही असे जेव्हा शरद पवार छातीठोकपणे सांगतात, तेव्हा त्याच्या विपरीत घडू शकते असा अंदाज बांधायला काही हरकत नसावी. 

आता इथे दोन प्रश्न येतात शरद पवार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोबत जातील का? आणि त्यांचे आणि अजित पवारांच्या गटाचे मनोमिलन होईल का? माझ्या मते शरद पवार  राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोबत कोणत्याही क्षणी जाऊ शकतात. त्याला कारणे देखील तशीच आहेत. शरद पवार यांना कायम सत्तेच्या जवळ राहण्याची सवय आहे. त्यांना आयुष्यात सत्तेजवळ जाऊन बरेच काही मिळाले. ते सतत मिळत रहावे असेच त्यांना वाटते. त्यामुळेच १९८० पर्यंत मुख्यमंत्री राहिल्यावर काही काळ ते विरोधी पक्ष नेते राहिले खरे, मात्र त्यांनी राजीव गांधींशी संधान बांधून मुख्य प्रवाहात येण्याची तयारी सुरू केली होती. योग्यवेळी ते मुख्य प्रवाहात आले आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले होते. 

तोच प्रकार त्यांनी १९९९ मध्येही केला होता. विदेशी मूळ असलेली व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदी नको म्हणून त्यांनी काँग्रेस सोडली आणि अवघ्या सहा महिन्यात त्याच काँग्रेससोबत त्यांनी अभद्र शय्यासोबत केली होती. त्याचवेळी केंद्रात पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी संधान बांधत केंद्रात कॅबिनेट दर्जाचे एक महत्त्वाचे पद देखील त्यांनी मिळवून घेतले होते. नंतर २००४ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीचा घटक म्हणून त्यांनी त्या सोनियांच्या विरोधात त्यांनी काँग्रेस फोडली होती, त्याच सोनियांना पंतप्रधान बनवण्यासाठी ते प्रचार करत देखील फिरले होते. त्यातूनच त्यांनी पुन्हा दहा वर्ष केंद्रात कृषिमंत्रीपद मिळवले होते.

आता पवारांना आयुष्यात काही नवे मिळवायचे राहिलेले नाही. जे हवे होते ते मिळणार नाही हे स्पष्ट दिसते आहे. अशावेळी आपल्या हयातीत किमान एकुलत्या एक मुलीला केंद्रात मंत्रिपद मिळावे, आणि त्या योगे केंद्रात आणि राज्यात सत्तेजवळ सरकता यावे, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्या एका कारणासाठी ते निश्चित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोबत जाऊ शकतात. 

यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला देखील काही महत्त्वाची विधेयके पारित करून घ्यायची असल्यामुळे पवारांच्या आठ खासदारांचा पाठिंबा हवा आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी अमित शहा हे देखील पवारांशी तडजोड करू शकतात, ही शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर केंद्रात पवार सोबत आले तर राज्यात देखील महायुतीचे बळ दहाने वाढते. हे दहा अजित पवारांच्या पक्षात गेले नाही, तर तेथे भाजप सोबतच राहतात. त्यामुळे त्या जोरावर भाजपला देखील त्यांच्या मित्र पक्षांवर दबाव आणायला सोयीचे होऊ शकते त्यामुळेच पुढच्या पंधरा दिवसात चित्र स्पष्ट होईल असे जे काही राजकीय नेत्यांनी म्हटले आहे, त्यातले तथ्य नाकारता येत नाही. 

मात्र त्याचवेळी शरद पवार गट आणि अजित पवार गट हे एकत्र येण्याची शक्यता सध्या तरी कठीण वाटते. दोन्ही गट एकत्र आले तर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे कोणाच्या हातात द्यायची हा वाद होणार हे निश्चित आहे. पवारांची मानसिकता लक्षात घेता ते आधी आपल्या हातात आणि मग सुप्रियाच्या हातात सर्व सूत्रे सोपवण्याच्या प्रयत्नात राहतील. त्यावेळी अजित पवार गटातील इतर लोक तर सोडा, पण सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे देखील त्याला तयार होणार नाहीत. त्यामुळे हे दोन्ही गट वेगवेगळे राहून महायुतीतला एक घटक पक्ष वाढला असे चित्र निर्माण करता येऊ शकेल. यामुळे शरद पवार यांचा गट देखील पुन्हा एकदा सत्तेची फळे चाखू शकणार आहे. 

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे शरद पवार गट अजित पवारांच्या सोबत जाण्यास इतकेच काय पण त्या पक्षात विलीन होण्यास देखील तयार झाला होता. मात्र अजित पवारांकडून तसे कोणतेही संकेत अखेरपर्यंत मिळाले नव्हते. अजित पवार गेल्यावर शरद पवार गटाच्या सर्वच नेत्यांनी अजित दादांची एकत्र येण्याची इच्छा होती असे चित्र निर्माण केले होते. मात्र ठोस पुरावा कोणताही नव्हता. त्यात अजित पवार गट आणि विशेषत्वाने सुनेत्रा पवार यादेखील दोन्ही गटांनी एकत्र यावे या मताच्या त्यावेळी दिसत नव्हत्या, आणि आजही दिसत नाही हे बघता हे दोन्ही गट एकत्र येण्याची आज तरी शक्यता कमी दिसते. 

तरीही राजकारणात केव्हाही काहीही घडू शकते. त्यातच शरद पवार हे एक अनाकलनीय व्यक्तिमत्व म्हणूनच ओळखले जातात. त्यामुळे शरद पवार नेमका कोणता पवित्र घेतील आणि त्याचवेळी नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे कोणती भूमिका घेतील त्यावरच शरद पवार एनडीए सोबत जातील का आणि दोनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील का याचे काळाच्या पोटात दडलेले उत्तर मिळणार आहे. 

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.