मुख्याधिकारी यांना एक खुले पत्र!
मुख्याधिकारी यांना एक खुले पत्र!
मूल, दीपक देशपांडे.
आदरणीय मुख्याधिकारी साहेब, नगर परिषद, मूल यांना खुले पत्र
प्रति,
मा. मुख्याधिकारी साहेब
नगर परिषद, मूल
विषय : नगर परिषद अंतर्गत घनकचरा वादग्रस्त निविदा तात्काळ रद्द करणेबाबत.
आदरणीय साहेब,
सध्या आपल्या मूल शहरातील घनकचरा संबंधी टेंडरचे प्रकरण प्रचंड गाजत असून, जनतेमध्ये तो चर्चेचा प्रमुख विषय झाला आहे. नवीन टेंडर काढण्यात आले असून ते फक्त सहा महिन्यांसाठी काढण्यात आले आहे. यात पूर्वीच्या टेंडरपेक्षा दरमहा सुमारे ₹१० लाखांची वाढ केल्याचे कळते. त्याचप्रमाणे, अशा काही जाचक अटींचा समावेश केल्याची माहिती आहे की, एखाद्या विशिष्ट कंत्राटदारालाच सदर कंत्राट मिळेल अशी व्यवस्था केली गेली आहे की काय, अशा प्रकारची चर्चा जनमानसात होत आहे.
निविदेत कचरा संकलनासाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या या २०२६ सालातील असाव्यात, अशी अट असल्याची माहिती आहे. सदर टेंडर हे फक्त सहा महिन्यांसाठी काढण्यात आले आहे. अटी टाकणे हे आपल्या अधिकारक्षेत्रात येत असेल, तरी सदर अटींमुळे विशिष्ट व्यक्तीलाच लाभ मिळतो की काय, अशी शंका निर्माण होत आहे.
वास्तविक कोणतेही टेंडर हे पारदर्शक, निष्पक्ष व स्पर्धात्मक असणे अपेक्षित असते. त्यामध्ये जास्तीत जास्त कंत्राटदार सहभागी व्हावेत यासाठी प्रशासनाने अधिकाधिक कंत्राटदारांशी संपर्क साधणे, प्रसंगी स्वतः त्यांच्याकडे जाऊन त्यांना निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणे, अशा प्रकारच्या सूचना शासकीय नियमावलीत आहेत. परंतु, या कंत्राटात टाकलेल्या अटी पाहता इतरांना परावृत्त करून विशिष्ट कंत्राटदाराला लाभ पोहोचविण्याची व्यवस्था तर केली गेली नाही ना, अशी शंका येण्यास वाव आहे.
जास्तीत जास्त कंत्राटदार प्रक्रियेत सहभागी झाल्यास स्पर्धा वाढेल, कमी दरातही काम करणारे कंत्राटदार पुढे येतील. त्यामुळे मुल शहरातील जनतेच्या घामाच्या पैशाची बचत होईल आणि वाचलेला निधी शहरातील इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वापरता येईल.
परंतु, पूर्वीच दरमहा ₹१० लाखांची वाढ, त्यात जाचक अटी, एकीकडे निधीअभावी अनेक विकासकामे प्रलंबित ठेवायची आणि दुसरीकडे कमी दरात काम करण्यास कंत्राटदार तयार असतानाही अशा प्रकारे दर वाढवून इतर कोणताही कंत्राटदार सहभागी होऊ नये आणि असलेल्या दरातच कंत्राट देण्याची व्यवस्था करायची, हे कितपत योग्य आहे, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
अधिकाऱ्यांवर वचक असावा म्हणून पदाधिकारी असतात आणि पदाधिकारी चुकीचे वागू नयेत म्हणून अधिकारी असतात, अशी संतुलित व्यवस्था आपल्या संविधानाने निर्माण केली आहे. आपण एक कर्तबगार प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळखले जाता. परंतु, सदर टेंडरमुळे संपूर्ण नगर परिषदेची विश्वासार्हता पणाला लागली आहे. जनतेचा प्रशासनावरील विश्वास अशा पद्धतीने कुठेही डगमगू नये, हीच अपेक्षा आहे.
त्यामुळे आपणांस या खुल्या पत्राद्वारे नम्र विनंती आहे की, जनतेचा पैसा कुणाच्या तरी घशात घालण्याचा हा घाट आहे, अशी भावना नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे सदर निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करावी आणि नव्याने सर्वसमावेशक, पारदर्शक व स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून जनतेचा नगर परिषद प्रशासनावरील विश्वास अबाधित ठेवावा, ही नम्र विनंती.
प्रा. डॉ. सौ. किरण कापगते-बोरकर
जिल्हा कार्यक्रम प्रमुख
भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा तथा नागरिक, मूल
मूलच्या नागरिकांना मुख्याधिकारी यांना अशा आशयाचे पत्र पाठविण्याची आणि हे कंत्राट रद्द करण्याची मागणी कां करावी लागली ? हो मूलच्या जनतेने चिंतन आणि मनन करण्याची गरज असल्याची मूल शहरांत चर्चा सुरू झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या कलगीतुऱ्याची तर ही सुरुवात नाही ना?
कारण......प्रा.किरण कापगते या मागील निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या आणि त्यात त्यांचा दारुण पराभव झाला होता व एकता समर्थ या काॅंग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. हेही जनता अजूनही विसरलेली नाही.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment