सहज सुचलं म्हणुन पर्यावरणाचा ऱ्हास टाळायलाच हवा...

 सहज सुचलं म्हणुन 

पर्यावरणाचा ऱ्हास टाळायलाच हवा...

नुकताच एका साहित्यिक संस्थेच्या कार्यक्रमात वक्ता म्हणून जाण्याचा योग आला. त्या कार्यक्रमात अतिथींचे स्वागत करण्यासाठी नेहमीच्या परंपरेनुसार पुष्पहार, पुष्पगुच्छ किंवा गुलाबाचे फुल देण्याच्या पद्धतीला फाटा देत ग्रंथ देऊन प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले होते. त्यावेळी निवेदिकेने बोलताना सांगितले की फुले दिल्यामुळे पर्यावरणाचा कितीही नाही म्हटले तरी -हास होतोच, आणि ती फुले २४ तासात कोमेजलेली असतात. त्यामुळे आम्ही फुले देऊन स्वागत करायचे नाही असा निर्णय घेत त्या ऐवजी साहित्यिक संस्था असल्यामुळे चिरकाल स्मरणात राहतील असे ग्रंथ देऊनच स्वागत करायचे असा निर्णय घेतला आहे. ही संकल्पना खरोखरीच सुखावणारी होती. 

आपल्याकडे पूर्वी स्वागत करायचे तर पुष्पहार घालून स्वागत केले जायचे. नंतर पुष्पगुच्छ देण्याची पद्धत आली‌. मात्र यासाठी झाडावर लागलेली फुले तोडायची आणि २४ तासात त्या फुलांचे निर्माण होऊन ती कचऱ्यात जायची. यापलीकडे त्याचा काहीच उपयोग नसायचा. तरीही आज आम्ही आणि समारंभांमध्ये पुष्पगुच्छ देण्याची पद्धतच चालू ठेवली आहे. आज चांगला पुष्पगुच्छ द्यायचा तर त्याची किमान किंमत दोनशे रुपये तरी येतेच. मग त्या ऐवजी दोनशे रुपयांचे एक चांगले पुस्तक दिले तर ते पुस्तक नेहमी करता त्या मान्यवर व्यक्तीजवळ राहील. ते पुस्तक ती मान्यवर व्यक्ती स्वतः देखील वाचेल आणि त्यानंतर त्याच्या माध्यमातून अनेक वाचक ते पुस्तक वाचतील. आज फुले कोमेजली की त्याचा काहीही उपयोग नसतो. मात्र पुस्तके वर्षानुवर्षे सांभाळून ठेवले जाऊ शकते. अनेकदा पुढल्या पिढ्यांसाठी सुद्धा ते मार्गदर्शक ठरू शकतो. त्यामुळे या साहित्यिक संस्थेचा हा उपक्रम निश्चितच मनाला समाधान देणारा होता.

यावरून आणखी एक संदर्भ आठवला. मला आठवले २००८ मध्ये मी सहकुटुंब मुंबई गोवा, कणकवली  असा प्रवास करत कोल्हापूरला पोहोचलो होतो. कोल्हापूरला माझे तिथले आमदार मित्र सतेज उपाख्य बंटी पाटील यांनी त्यांची शिक्षण संस्था असलेल्या डी वाय पाटील शिक्षण संस्थेच्या विश्रामगृहात आमच्या निवासाची सोय केली होती. त्याच इमारतीत बंटी पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय देखील होते. तिथे तिथल्या सूचना फलकावर एक सूचना लावलेली पाहिली. त्यात आमदार सतेज पाटील हे कोणत्याही कार्यक्रमात पुष्पगुच्छ किंवा पुष्पहार स्वीकारणार नाहीत त्या ऐवजी आयोजकांनी आमदार महोदयांना शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्या द्याव्या असे लिहिले होते. तिथे त्याच फलकावर दरवर्षी आमदार सतेज पाटील यांनी याच पद्धतीने वर्षभरात किती वह्या जमवल्या आणि त्यांच्या मतदारसंघातील किती शालेय विद्यार्थ्यांना त्या वह्या त्यांनी विनामूल्य पुरवल्या त्याचा लेखाजोखा दिला होता. बंटीभाऊ पाटील यांचा हा उपक्रम निश्चितच मनाला भावणारा होता. 

एका लोकप्रतिनिधीला दिवसाला किमान एक तरी पुष्पगुच्छ दिला जातोच. म्हणजे किमान दोनशे रुपये हे खर्च केले जातात. जे की दुसऱ्या दिवशी निर्माल्यात जात असतात. त्याऐवजी दोनशे रुपयांच्या वह्या किमान प्राथमिक शाळेतील एका विद्यार्थ्यांची गरज तर निश्चितच भागवू शकतील. याच पद्धतीने आमदार बंटी पाटील यांनी आतापर्यंत अनेक गरजू विद्यार्थ्यांना मदत केली असेल यात माझ्या मनात शंका नाही. खरे तर हाच विचार प्रत्येक लोकप्रतिनिधींनी केला तर अनेकांचे भले होईल. 

आज आम्ही सुद्धा अशा प्रकारे फुले वाया घालवण्याऐवजी पुस्तके दिली तर एक तर ग्रंथ व्यवहाराला मदत होईल. दुसरे म्हणजे चांगले साहित्य यानिमित्ताने वाचकांपर्यंत पोहोचेल आणि सत्कार तसेच समाज प्रबोधन हे दोन्ही हेतू साध्य होतील. शिवाय ते ग्रंथ चिरकाल वाचकांपर्यंत पोहोचत राहतील हे नक्की. 

आज पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते आहे. आज कागद बनवायचा तरी लाकूड लागतेच. हेच लाकूड जळण्यासाठी देखील लागते. तर घर बांधण्यासाठी देखील हेच लाकूड वापरावे लागते. आज लाकूड हे वृक्षांपासूनच मिळते आणि मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे जंगले संपत चालली आहेत. त्यामुळेच जंगलातील तृणभक्षी प्राणी हे देखील संपत चालले आहेत. तृणभक्षी प्राणी संपल्यामुळे जंगलातील नरभक्षी प्राण्यांना अन्न कसे मिळवायचे हा प्रश्न पडतो. एकीकडे जंगले संपत आहेत आणि त्याचवेळी तिथले तृणभक्षी प्राणी म्हणजेच या नरभक्षींचे अन्न संपत असल्यामुळे शेवटी हे नरभक्षी प्राणी नागरी वस्तीत येतात आणि मग बिबट्या नागरी वस्तीत शिरला म्हणून ओरड होते. मात्र या वन्य हिंस्र प्राण्यांना हवा असलेला अधिवास आणि त्यांना हवे असलेले खाद्य कसे राखून ठेवले जावे याचा विचार कोणीही करत नाही. त्यासाठीच जंगले राखून ठेवावी लागतात. 

फक्त नरभक्षी प्राण्यांचे नागरी वस्तीतील हल्ले कमी व्हावे म्हणून जंगले जपायची असे नाही, तर आज निसर्गाचे जे ऋतुचक्र बिघडले आहे, त्यालाही पर्यावरणाचा म्हणजेच जंगलांचा ऱ्हास कारणीभूत ठरला आहे. त्याचबरोबर विकासाच्या नावाखाली मोठमोठे डोंगर पोखरले जात आहेत, की ते डोंगर भुईसपाट देखील केले जात आहेत. तर अर्धवट डोंगर फोडल्यामुळे त्याच्याच दरडी कोसळून अपघात देखील होत आहेत. परिणामी डोंगर धराशयी होत आहेत. मग त्यावरची वृक्षवल्ली देखील संपणार. परिणामी त्याचा परिणाम पावसावर होणार. पाऊस कमी पडला म्हणजे अन्नधान्याचे पीक कसे घ्यायचे हे प्रश्न आहेत. त्याशिवाय पिण्याच्या पाण्याचा, गुरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न येतो. आज या सर्व समस्या देशासमोर आ वासून उभ्या आहेत. मात्र त्यावर उपाय करायला कोणालाही वेळ नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. 

पूर्वी पावसाचे पाणी जमिनीत जिरायचे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी हळूहळू वाढत जायची. आता सर्वत्र सिमेंटीकरण होत आहे त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण कमी झाले आहे‌. मग ते पाणी वाहून गटाराला मिळते. गटारातून ते गावाबाहेर नेले जाते मात्र त्यामुळे शहरातील विहिरींची पातळी कमी होत चालली आहे. आज सिमेंटीकरण झाल्यामुळे नवी झाडे लावायची कुठे हा प्रश्न येतो. जुनी झाडे सर्रास कापली जात आहेत. एका काळात नागपूर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे हिरवेगार शहर म्हणून ओळखले जात होते. आता ती हिरवळ कुठे गेली असा प्रश्न पडावा ही परिस्थिती निर्माण झाली आहे. 

हे सर्व प्रकार घडण्यामागे माणसाची विकासाची राक्षसी भुक आणि त्यामुळे पर्यावरणाचे केले जात असलेले नुकसान हेच खरे कारणीभूत आहे. त्यामुळेच प्रत्येकाने पर्यावरणाचे रक्षण कसे करता येईल, त्याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी. म्हणून फुलांचा अवाजवी वापर टाळून पर्यावरणाचे नुकसान टाळायला स्वतःपासून सुरुवात करायला हवी. ते सर्वांच्याच हिताचे असेल असे सहज सुचले म्हणून सांगावेसे वाटते. 

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.