पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवा करताना माणसेही जोडता येतात....माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित.
पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवा करताना माणसेही जोडता येतात....माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित.
अविनाश पाठक लिखित "आयुष्यातले सांगती भाग१,२ आणि३ चे प्रकाशन
नागपूर: १७ जुलै: दीपक देशपांडे.
पत्रकारिता हा व्यवसाय नसून ते व्रत आहे. याच माध्यमातून समाजसेवाही करता येते आणि माणसेही जोडता येतात. पत्रकार अविनाश पाठक यांनी पत्रकारिता करताना फक्त माणसे जोडली आणि त्यांचेच चित्रण त्यांनी समाजासमोर मांडून समाजाला एक पाच दशकांचा राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक आढावा घेणारा एक दस्तावेज उपलब्ध करून दिला आहे असे प्रतिपादन माजी राज्यपाल आणि भारतीय विद्या भवन चे राष्ट्रीय अध्यक्ष बनवारीलालजी पुरोहित यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अविनाश पाठक लिखित आयुष्यातले सांगाती भाग १,२, आणि ३ या तीनही पुस्तकांच्या अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती, विदर्भ प्रांत आणि साईज्योती पब्लिकेशन तर्फे आयोजित नागपूरच्या अंध विद्यालय परिसरातील नवदृष्टी सभागृहात आयोजित प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे तसेच पुस्तकांवर भाष्य करणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक प्रकाश एदलाबादकर, साहित्यभारतीचे विदर्भ प्रदेश महामंत्री विनय माहूरकर, साई ज्योती पब्लिकेशन चे गणेश राऊत आणि लेखक अविनाश पाठक व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पुरोहित म्हणाले की पत्रकारिता करताना पत्रकाराने सामाजिक भान जपणे गरजेचे असते. पत्रकाराने आपल्या गरजा कमी ठेवल्या आणि चारित्र्य जपले तर तो समाजासाठी खूप काही देऊ शकतो. अविनाश पाठक यांनी पत्रकारिता करतानाच लेखन देखील केले आणि त्या माध्यमातून पाच दशकांचा संपन्न असा अनुभव वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे असेही उद्गार त्यांनी यावेळी काढले.
पत्रकारिता हे असे क्षेत्र आहे की जिथे पत्रकार हा गरिबातल्या गरीब माणसाजवळ आणि श्रीमंतातल्या श्रीमंत माणसापर्यंत किंवा अगदी सत्तेतल्या सर्वोच्च माणसापर्यंत सहज पोहोचू शकतो. मात्र त्यातून मिळणारे अनुभव हे समाजापर्यंत पोहोचवणे हेच पत्रकाराचे खरे कसब असते. अविनाश पाठक यांनी त्यांच्या पाच दशकांच्या पत्रकारितेत ज्या अनेक मान्यवरांशी संपर्क साधला आणि मैत्र जपले त्यांचे अनुभव सांगत त्यांनी नव्या पिढीसाठी एक बहुमूल्य ठेवा उपलब्ध करून दिला आहे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी यावेळी बोलताना केले. अविनाश पाठक हे आमच्या आधीच्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्याच प्रमाणे प्रेरणा घेऊन आता नव्या पिढीतील पत्रकारांनी देखील असे व्यापक लेखन करावे आणि समाजाला माहितीचा ठेवा उपलब्ध करून द्यावा असे मत पांडे यावेळी यांनी व्यक्त केले.
आपल्या पाच दशकांच्या संपन्न अनुभवाचा ठेवा मराठी वाचकांना उपलब्ध करून देत अविनाश पाठक यांनी मराठी वाचकांवर उपकार केले आहेत असे मत पुस्तकांवर भाष्य व्यक्त करताना ख्यातनाम समीक्षक प्रकाश एलाबादकर यांनी व्यक्त केले. या पुस्तकातील अनुभव व्यक्तिगत स्पर्श करणारे आहेत. त्यात स्वतःचा मोठेपणा सांगण्याचा कुठेही प्रयत्न झालेला नाही याकडे देखील एदलाबादकर यांनी लक्ष वेधले.
दीप प्रज्वलनाने सुरू झालेल्या या समारंभाच्या प्रारंभी अविनाश पाठक यांनी प्रास्ताविकात आयुष्यातले सांगाती या लेखनामागील भूमिका स्पष्ट केली. आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक मान्यवरांपैकी ज्यांचे आपले व्यक्तिगत संबंध निर्माण झाले आणि ते उभयपक्षी जपले गेले अशा ५१ व्यक्तींवर आपण हे लेखन केले आहे असे सांगून ही लेखमालिका सुरू असतानाच आजचे अध्यक्ष बनवारीलालजी पुरोहित यांनीच ही लेखमालिका पुस्तक रूपात प्रकाशित व्हावी, तो एक महत्त्वाचा दस्तावेज ठरेल अशी सूचना केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे मंच संचालन डॉ. प्रगती वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन साहित्यभारतीचे नागपूर जिल्हा अध्यक्ष डॉ. गणेश चव्हाण यांनी केले. यावेळी लेखिका वर्षा देशपांडे यांनी "आयुष्यातले सांगाती" चे लेखक अविनाश पाठक यांचा सपत्नीक सत्कार केला. तसेच नागपूरच्या हडस हायस्कूलमध्ये अविनाश पाठक यांच्याबरोबर शिकलेल्या मित्रमंडळींनी देखील त्यांचा सत्कार केला. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाला माहिती आयुक्त गजानन निमदेव, ख्यातनाम नेत्रतज्ञ डॉ. प्रफुल्ल मोकदम, निवृत्त ग्रुप कॅप्टन विजय हरदास, शंखनादच्या निर्मात्या संगीतकार डॉ तनुजा नाफडे, निवृत्त संपादक सुधीर पाठक विभागीय माहिती संचालक डॉ. गणेश मुळे, बालरोगतज्ञ डॉ. उदय बोधनकर, जागतिक बँकेचे निवृत्त कृषी सल्लागार डॉ. रमेश ठाकरे प्रभृतींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment