निवडणूक आचारसंहितेच्या शास्त्रीय मूल्यांकनाची गरज माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन.
निवडणूक आचारसंहितेच्या शास्त्रीय मूल्यांकनाची गरज
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
एनयुजेव्हीच्या पुढाकाराने परिसंवाद
नागपूर, १८ जून दीपक देशपांडे.
भारतीय निवडणूक प्रक्रियेत आचारसंहितेचा अतिरेक झाला असून हे कारण शोधत प्रशासन देखील अंगकाढूपणा करते आणि त्याचा सामान्य जनतेला त्रास होतो. त्यावर उपाय म्हणून संविधानात तरतूद नसलेल्या आचारसंहितेचे शास्त्रीय मूल्यांकन करावे व सामान्य नागरिकांनी देखील आयोगाला पत्र लिहून या संदर्भात व्यापक जनमत तयार करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट विदर्भतर्फे गुरुवार, १८जून रोजी ‘अप्रत्यक्ष निवडणुकीसाठी आचारसंहिता असावी का?’ या विषयावर नवदृष्टी सभागृहात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. व्यासपीठावर परिसंवादाला प्रमुख वक्ते म्हणून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, अध्यक्षस्थानी माजी संपादक सुधीर पाठक, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. अविनाश काळे, आ. डॉ. आशिष देशमुख, युनियनचे अध्यक्ष अविनाश पाठक उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, आचारसंहितेच्या अतिरेकामुळे सामान्यांची कामे होत नाहीत याचा अनुभव मी स्वतः घेतला आणि या कामांमुळे मतदान प्रभावित होत नाही, हे खरे असतानाही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यासाठी आता जनतेने पोस्टकार्डाच्या माध्यमातून आपली भावना निवडणूक आयोगाला कळवावी, असा सल्ला मुनगंटीवार यांनी दिला.
पाहुण्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करून, तसेच पत्रकार विराग पाचपोर यांना श्रद्धांजली अर्पण करून परिसंवादाला प्रारंभ झाला.
प्रारंभी प्रास्ताविकातून अविनाश पाठक यांनी, आचारसंहितेचा हा मुद्दा सुधीर मुनगंटीवर यांनी राज्यात उपस्थित केला. त्यानंतर संघटनेने या विषयावर परिसंवाद आयोजित करण्याचे ठरविल्याचे सांगितले.
यावेळी मत व्यक्त करताना डॉ. आशिष देशमुख यांनी, आगामी काळात वन नेशन वन इलेक्शन’चा निर्णय लागू झाल्यास वर्षभर आचारसंहितेचा त्रास नागरिकांना होणार नाही, तसेच अप्रत्यक्ष निवडणुकीत आचारसंहितेची गरजच नाही, असे मत व्यक्त केले.
यावेळी अॅड. अविनाश काळे म्हणाले, निधीवाटप, विकास आणि आचारसंहिता यांचा काही विशेष संबंध आहे असे मी मानत नाही. उपलब्ध निधी वेळेत खर्च होत नाही. आचारसंहितेपेक्षाही आज पक्षांतर कायदा बदलण्याची गरज आहे. त्यात पक्षांतर करणार्या लोकप्रतिनिधीने प्रथम आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व त्यानंतर दुसर्या पक्षात प्रवेश करावा. हा महत्त्वाचा बदल केल्यास राजकीय क्षेत्रात अस्थिरतेेला स्थान राहणार नाही.
अध्यक्षीय समारोपात सुधीर पाठक म्हणाले, आचारसंहितेच्या नावाखाली सर्वसाधारण लोकांची खूप अडवणूक होते. आचारसंहितेचा अतिरेक नको. यावेळी त्यांनी आचारसंहितेच्या अतिरेकाची अनेक उदाहरणे दिली. या प्रक्रियेत सामान्य माणसाचा मुळात विचारच नाही. त्यामुळे आगामी काळात महत्त्वाच्या कामांसाठी आचारसंहितेचा अडसर राहू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन स्नेहल जोशी यांनी तर, आभारप्रदर्शन संघटनेचे सचिव पराग जोशी यांनी केले. या परिसंवादाला ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख, सुनील किटकरू यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रगीताने या परिसंवादाची सांगता झाली.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment