आठवणींच्या हिंदोळ्यावर....६. आठवण संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याची...
आठवणींच्या हिंदोळ्यावर....६.
आठवण संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याची...
दोन दिवसांपूर्वी युट्युबवर धुरंधर हा चित्रपट बघत होतो. त्यात १३ डिसेंबर २००१ ला देशाचे सार्वभौम सभागृह असलेल्या संसदेवर हल्ला झाला तो प्रसंग दाखवण्यात आला होता. तो प्रसंग पाहिल्यावर त्या दिवशीच्या माझ्या सर्व आठवणी एकदम जाग्या झाल्या.
त्या दिवशी दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होते, तसेच नागपुरात देखील महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होते. या अधिवेशनाचे वृत्त संकलन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे १३ डिसेंबर २००१ रोजी मी दुपारी नागपूरच्या विधान भवन परिसरातच होतो.
नागपुरात साधारणपणे दुपारी बारा ते एक विधान परिषदेत प्रश्नोत्तरांचा तास असतो. तसा त्यादिवशी देखील होता. प्रश्नोत्तरांचा तास संपल्यावर मग लक्ष्यवेधी सूचना सुरू होण्यापूर्वी कागदपत्रे पटलावर ठेवणे, सदस्यांच्या काही सूचना, औचित्याचे मुद्दे हरकतीचे मुद्दे, नियम ९३ च्या सूचना असे प्रकार सुमारे १५ ते २० मिनिटे चालतात. त्या दिवशी देखील प्रश्नोत्तरांचा तास नुकताच संपला होता आणि असे कागदपत्रे पटलावर ठेवणे औचित्त्याचे मुद्दे हेच कामकाज सुरू होते. कशावरून तरी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात थोडी तणातणी सुरू झाली होती. सभागृहातील पीठासीन सभापती प्रा. ना.स. फरांदे हे वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करत होते.
त्याचवेळी प्रश्नोत्तराच्या तासाच्या शेवटी शेवटी कशाला तरी बाहेर गेलेले काँग्रेसचे एक सदस्य रामदास फुटाणे सभागृहात आले आणि त्यांनी ही तणातणी थांबवत सभापतींना सांगितले, "सभापती महोदय, आत्ताच बाहेर माहिती आलेली आहे, की देशाच्या संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केलेला आहे." फुटाणेंचे हे वक्तव्य ऐकताच संपूर्ण सभागृह एकदमच स्तब्ध झाले. फरांदे सरांनी लगेचच सभागृह पाच मिनिटांसाठी स्थगित करत असल्याची घोषणा केली आणि ते उठून आपल्या दालनात गेले. सभागृहातील सर्वच सदस्य आणि मंत्री हे देखील बाहेर गेले. पत्रकार गॅलरीतील आम्ही सर्व पत्रकारही भराभर बाहेर निघालो आणि काय घडले त्याची माहिती कुठून घेता येईल ही आमची धावपळ सुरू झाली.
पाच मिनिटात सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाले खरे, मात्र सभापती फरांदे यांनी कामकाज पुन्हा एक तासासाठी स्थगित केले. तोवर आम्ही पत्रकार आत गॅलरीमध्ये पोहोचायचेच होतो. आम्ही बाहेर असतानाच सभागृह पुन्हा एक तासासाठी तहकूब झाले असल्याची माहिती आम्हाला मिळाली. तासभरानंतर कामकाज जेव्हा सुरू होईल तेव्हा सरकारतर्फे नेमकी परिस्थिती काय याचे निवेदन करण्यात यावे असेही सभापतींनी निर्देश दिल्याचे सांगण्यात आले.
याच दरम्यान विधानसभेचे कामकाज देखील स्थगित झाले होते. त्यामुळे दोन्ही बाजूचे सर्व सदस्य, सभागृह परिसरात पोहोचलेले विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि आलेले पत्रकार हे सर्वच सभागृहासमोरच्या मोकळ्या पटांगणात जमून काय घडले कसे घडले याची चर्चा करत होते. दरम्यान सर्वच पक्ष कार्यालयातले टीव्ही चालू होते. तिथे देखील अनेकांनी गर्दी केली होती. मी देखील भाजप कार्यालयातील टीव्ही जवळ जाऊन बसलो आणि माहिती घेण्यास सुरुवात केली. ते दहशतवादी एका कार कार मध्ये बसून सुरक्षारक्षकांची नजर चुकवत संसद भवन परिसरात पोहोचले होते, आणि बाहेर निघून त्यांनी तिथल्या सुरक्षारक्षकांवरच हत्यारे रोखली होती. सुरक्षारक्षकांची आणि त्यांची जी काही झटापटी झाली त्यात आपले काही जवान मारले गेले होते आणि त्या दहशतवाद्यांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यातही घेतल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार संसद भवन परिसरात बॉम्बस्फोट करण्याचा त्यांचा इरादा होता. मात्र तो उधळला गेला होता.
टीव्हीवर मिळालेल्या माहितीनंतर आम्ही सर्वच पत्रकार आणि राजकीय मंडळी जमून चर्चा करू लागलो. दहशतवादी इतक्या सहजपणे संसदभवनात शिरू शकतात ही बाबच सर्वांना धक्का देणारी होती.
ही घटना इतकी हादरवून टाकणारी होती की त्याचे पडसाद देशभर कसे उमटतील ही सर्वांनाच भीती होती. मी लगेच प्रेस रूममध्ये जाऊन घरी फोन लावला आणि घरच्यांनाही बातमी कळवली. (त्यावेळी आजच्यासारखे प्रत्येकाजवळ मोबाईल राहत नव्हते) त्यावेळी सकाळच्या शाळांमधून येणारी माझी मुलगी आणि शेजारीच राहणाऱ्या बहिणीचा मुलगा हे दोघेही घरी पोहोचले आहेत किंवा नाही याची चौकशी केली आणि त्यांना आता कुठे बाहेर पाठवू नका या देखील सूचना दिल्या
विधिमंडळाचे वृत्तसंकलन करायला मी जातो तेव्हा ज्या खुर्चीवर मी बसलेला असतो, तिथेच मी माझी बॅग आणि कागदपत्रे ठेवलेली असतात. मधल्या वेळात बाहेर चहासाठी किंवा जेवणासाठी निघालो तर सामान तिथेच ठेवायचे ही माझी अनेक वर्षांची पद्धत आहे. ही माझीच नव्हे तर अनेक पत्रकारांची हीच पद्धत आहे. तसेही गॅलरीत सामान सुरक्षित राहते. त्यामुळे पाच मिनिटांसाठी जेव्हा कामकाज तहकूब झाले तेव्हा आम्ही सर्व पत्रकार मित्र आपली कागदपत्रे आणि बॅगा तिथेच ठेवून निघालो होतो. पावणेदोनच्या सुमारास जाऊन सकाळच्या कामकाजाची कॉपी लिहून काढावी या विचाराने मी गॅलरीकडे जायला निघालो, तो सुरक्षारक्षकांनी मला लगेचच अडवले आणि माझा पास विचारला. ते सुरक्षारक्षक मला नेहमीचे ओळखणारे होते. तरीही त्यांनी पास का विचारला म्हणून मी विचारले, तेव्हा आम्हाला वरिष्ठांकडून आता सर्व सुरक्षा व्यवस्था टाईट करा असेच सांगण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. माझे पासेस माझ्या बॅगमध्येच ठेवले होते. मग त्या सुरक्षारक्षकांना जेव्हा तसे समजावले तेव्हा त्यांनी मला आज सोडले. मात्र आता पुढे काही दिवस पास खिशातच ठेवत चला असेही त्यांनी सुचवले.
गॅलरीत बसून कॉपी लिहिण्यापेक्षा बाहेरच अजून काय चर्चा होतात ते बघावे म्हणून मी पास खिशात टाकले आणि पुन्हा खाली विधान भवन परिसरातच येऊन थांबलो. घडलेल्या घटनेवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत होते. मात्र प्रकाराचे गांभीर्य प्रत्येकालाच जाणवले होते आणि प्रत्येकच जण कुठेतरी हलला होता.
दुपारी सव्वादोन च्या सुमारास विधान परिषदेचे कामकाज पुन्हा सुरू झाले. सभापती प्रा. ना स फरांदे यांच्या सूचनेनुसार सभागृहाचे नेते आणि राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात निवेदन केले. संसद भवनात दहशतवादी कसे शिरले, सुरक्षा रक्षकांनी त्यांना कसे अडवले, आणि झटापटीत काय काय घडले याची सविस्तर माहिती त्यांनी दिली. त्यानंतर विरोधी बाकावरून शिवसेना सदस्य प्रमोद नवलकर उभे राहिले आणि घडलेल्या या प्रकारामुळे प्रत्येक देशप्रेमी राष्ट्रभक्त नागरिकाला धक्का बसला आहे, त्यामुळे आज आपण कामकाज इथेच थांबवू या अशी त्यांनी सूचना केली. सभागृहाचे नेते छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते नितीन गडकरी या दोघांनीही ती सूचना मान्य केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केल्याची घोषणा करत सभापती उठून आपल्या दालनात गेले आणि कामकाज संपले.
बाहेर निघाल्यावर पुन्हा तीच चर्चा सर्वत्र चालू असलेली दिसली. एव्हाना विधानसभेचे कामकाज देखील तसेच तहकूब करण्यात आले होते. मग थोडा वेळ कॅन्टीनमध्ये बसून चहा घेत घेत पुन्हा चर्चा रंगल्या आणि सर्वजण आपापल्या मुक्कामी निघालो.
त्या दिवशी संध्याकाळी टीव्ही रेडिओ सर्वत्र याच बातम्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व वृत्तपत्रांमध्ये या घटनेच्या बॅनर लाईन होत्या. त्या दोन दिवसात बोलायला किंवा लिहायला दुसरा कोणताही विषय नव्हता.
सकाळी नऊ वाजता विधान परिषदेचे कामकाज सुरू होणार होते. त्यानुसार मी विधानभवनात पोहोचलो आणि गॅलरीत जाऊन बसलो. बरोबर नऊ वाजता कामकाज सुरू झाले. सुरुवातीलाच सभापतींनी झाल्या घटनेबद्दल सांगत कालच्या या दहशतवादी हल्ल्यात जे सुरक्षा जवान शहीद झाले त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया आणि मगच कामकाजाला सुरुवात करू असे सुचवले. त्यानुसार मग श्रद्धांजली अर्पण करून कामकाजाला सुरुवात झाली.
त्या दिवशी रात्री जवळजवळ आठ वाजेपर्यंत कामकाज चालले होते. मात्र त्या कामकाजावर आणि पूर्ण विधान भवन परिसरावरच आदल्या दिवशी संसद भवनात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे सावट असलेले जाणवत होते.
या घटनेला २५ वर्षाहून अधिक काळ लोटलेला आहे. काळाच्या ओघात ही घटना काहीशी विस्मृतीतही गेली होती. मात्र धुरंधर सिनेमा पाहताना पुन्हा एकदा सर्व आठवणी जाग्या झाल्या. त्याच वाचकांसाठी मी शेअर केलेल्या आहेत.
✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment