कृषि महाविद्यालय, मूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा"
कृषि महाविद्यालय, मूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा"
दीपक देशपांडे मूल
आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी २१ जून रोजी जगभरात आरोग्य, मानसिक संतुलन आणि सजगता (Mindfulness) यांचा प्रसार करण्यासाठी साजरा केला जातो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत या दिवसाची संकल्पना मांडली होती. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. पहिला अधिकृत आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून २०१५ रोजी जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्नित कृषि महाविद्यालय, मूल येथे दि. २१ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. राम गावंडे (सेवानिवृत्त प्राध्यापक, कीटकशास्त्र), मुख्य योग प्रशिक्षक, पतंजली योगपीठ, हरिद्वार (नागपूर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. चंद्रकांत मनियार पत्रकार मूल , तथा प्रमुख अतिथी म्हणून डॉ. आर. पी. गजभिये, प्राध्यापक (उद्यानविद्या) उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्षीय मनोगतात सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. त्यांनी सांगितले की, प्रा. राम गावंडे यांनी आतापर्यंत १७०० हून अधिक योग कार्यशाळांचे आयोजन करून समाजात योगाबाबत जनजागृती करण्याचे तसेच निरोगी जीवनशैलीचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. योग हा जागतिक एकता आणि शांततेचा संदेश देणारा, मानवतेला जोडणारा मार्ग असून जगभरातील लोकांमध्ये एकात्मता निर्माण करणारे प्रभावी माध्यम आहे, असेही त्यांनी नमूद केले. प्रमुख मार्गदर्शक प्रा. राम गावंडे यांनी योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना समजावून सांगितले. त्यांनी सांगितले की, योगामुळे शारीरिक आरोग्य सुधारते, शरीर लवचिक, मजबूत व तंदुरुस्त राहते. योगामुळे मानसिक शांती प्राप्त होते तसेच ताणतणाव, चिंता आणि नैराश्य कमी करण्यास मदत होते. नियमित योगाभ्यासामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि कार्यक्षमता वाढते. योग ही संतुलित, आनंदी व आरोग्यदायी जीवनशैलीकडे नेणारी प्रभावी साधना असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे प्रा. चंद्रकांत मनियार यांनी योग व प्राणायामामुळे मिळालेल्या शारीरिक व मानसिक फायद्यांबाबत आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची प्रा. राम गावंडे यांनी सविस्तर उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी व अधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून नियमित योगाभ्यासाचा संकल्प केला. “योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनशैलीकडे नेणारी जीवनविद्या आहे,” हा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष लाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. नागेश नवघरे, सहाय्यक प्राध्यापक (मृदा विज्ञान), कृषि महाविद्यालय, मूल यांनी केले.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment