माझंही मत... अरविंद सावंत आणि संजय राऊत यांना काही प्रश्न....

माझंही मत...

अरविंद सावंत आणि संजय राऊत यांना काही प्रश्न.....

 शिल्लक शिवसेनेत काल पुन्हा एकदा फूट पडली. त्यांचे नऊ पैकी सहा खासदार बाहेर पडले आणि त्यांनी वेगळ्या गट स्थापन केला आहे. लवकरच ते शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी होणार असल्याची माहिती आहे. 

या निमित्ताने शिल्लक शिवसेनेतील संजय राऊत, अरविंद सावंत या नेत्यांची अक्षरशः आगपाखड सुरू आहे. संजय राऊत यांनी तर ताळतंत्रच सोडला आहे. ते चक्क नाक्यावर द्याव्या तशा शिव्या पत्र परिषदेत देत आहेत, आणि या एडिट न करता दाखवा असेही माध्यमांना ठणकावत आहेत. 

त्याचवेळी अरविंद सावंत यांनी एक मुद्दा मांडला आहे‌. तुम्ही एका पक्षाच्या चिन्हावर नावावर विजयी होता आणि विजयी झाल्यावर कायद्यातील पळवाटा शोधून मुळ पक्षाशी गद्दारी करता, आणि दुसऱ्या पक्षात निघून जाता. हे कितपत योग्य आहे असा त्यांचा सवाल आहे. ही तुम्ही मतदारांशी केलेली गद्दारी आहे असे म्हणत हे कुठल्या नैतिकतेत बसते असेही सावंत विचारतात.

तिथे मला अरविंद सावंत यांना विचारायचे आहे,की २०१९ मध्ये आपण भारतीय जनता पक्षाशी युती केली होती, आणि त्या युतीतील एक घटक पक्ष म्हणून आपण जागा लढवल्या होत्या. भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तुमच्या उमेदवारांसाठी देखील प्रचार केला होता आणि भाजपच्या मतदारांनी तुमच्या उमेदवारांना मते देखील दिली होती. त्यामुळेच तुमचे उमेदवार निवडून आले होते.

त्यावेळी तुम्ही अचानक बंद खोलीत दिलेल्या कथित (खऱ्या की खोट्या) वचनाचा आधार घेत भाजपशी युती तोडली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन सरकार स्थापन केले. ही तुमची मतदारांशी बेईमानी नव्हती का? मतदारांनी तुम्ही भाजपसोबत युती केली म्हणून तुम्हाला निवडून दिले होते. ज्या मतदारांनी तुम्हाला भाजपशी युती केल्याबद्दल मते दिली  होती त्यांच्याशी तुम्ही बेईमानी केली नाही का? हे कुठल्या नैतिकतेत बसते याचे उत्तर अरविंद सावंत यांनी महाराष्ट्राला द्यायला हवे. त्यावेळी जर तुम्ही सर्व आमदारांनी राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढवली असती आणि निवडून आला असता, तर तुम्हाला टीका करण्याचा नैतिक अधिकार राहिला असता. मात्र तुम्ही तसे न करता काँग्रेससोबत जाऊन बाळासाहेबांच्याच तत्वांना हरताळ फासला असं नाही का तुम्हाला वाटत? तुम्हाला वाटणार नाहीच, पण मतदारांना ते पटलेले नाही. म्हणूनच मतदारांनी २०२४ च्या निवडणुकीत तुम्हाला हिसका दिला आहे.

या सहा खासदारांना आतापर्यंत २५ कोटी रुपये प्रत्येकी मोजण्यात आल्याचा दावा शिल्लक शिवसेनेचे आणखी एक नेते संजय राऊत यांनी केला आहे. हे २५ कोटी दिले याचा पुरावा काय देणार, तर काहीही नाही. २०२२ मध्ये ज्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार शिवसेनेतून फुटून बाहेर पडले होते, तेव्हाही प्रत्येकाला ५० कोटी रुपये देण्यात आले होते असा आरोप संजय राऊत करत होते. तो  आरोप राऊत आजही करतात. आता इथे प्रश्न असा पडतो की ही रक्कम राऊत छातीठोकपणे सांगतात, तेव्हा ते खरोखरी प्रत्येकाला किती रक्कम दिली त्या नोटा मोजायला गेले होते का? की तोंडाला येईल तो आकडा फेकून मोकळे झाले? की त्या दिवशी त्यांना लागलेल्या सट्ट्याचा नंबर हा होता  याची उत्तरे राऊत यांनीच द्यायला हवी. 

संजय राऊत यांनी आता या खासदारांविरोधात आम्ही रस्त्यावर राडा करू अशी धमकी दिली आहे. मात्र आता राउतांजवळ राडा करायला माणसं कुठे उरली असा प्रश्न भाजपाचे एक मंत्री गिरीश महाजन यांनी विचारला आहे. तेव्हा गिरीश महाजन यांनी पोलीस संरक्षण बाजूला ठेवून मैदानात यावे मग आम्ही बघतो असे खुले आव्हान राऊत यांनी दिले आहे. आता गिरीश महाजन यांना तुम्ही म्हणता, तुम्ही देखील पोलीस संरक्षणातच फिरता ना. तुमचे नेते उद्धवपंत ठाकरे कोणाचेही पद नसताना झेड सिक्युरिटी घेऊन फिरत आहेच, पण घरी झोपतात सुद्धा झेड सिक्युरिटीतच. ते जर खरे लोकनेते असतील तर त्यांनी झेड सेक्युरिटी सोडून बाहेर यावे. मात्र संजय राऊत यांचे धोरण "शेजाऱ्याचे पहावे वाकून आणि आपले ठेवावे झाकून" असेच राहिलेले आहे. काय करणार त्याला? 

आता या गद्दारांविरोधात आपण महाराष्ट्रात "ऑपरेशन तुडवा" सुरू करणार आहोत अशी धमकी संजय राऊत यांनी दिली आहे. तुमच्या या राडा संस्कृतीमुळेच तुमचा मतदार तुमच्या पासून दूर गेला आहे हे राउतांनी लक्षात ठेवायला हवे. अर्थात मतदार सांभाळायचे असतात हे त्यांना कसे कळणार? ते कायम मागच्या दारानेच राज्यसभेत सदस्यत्व मिळवतात. एरवी साधी ग्रामपंचायत सुद्धा ते निवडून आलेले नाहीत. त्यामुळे मतदारांना सांभाळावे लागते ही अपेक्षा त्यांच्याकडून काय करायची? 

अर्थात हे माझं मत झालं......

 तुमचे स्पष्ट आणि परखड मत तुम्ही सुद्धा मांडू शकता.

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.