माझंही मत... अखेर ऑपरेशन टायगर यशस्वी होण्याच्या मार्गावर...
माझंही मत...
अखेर ऑपरेशन टायगर यशस्वी होण्याच्या मार्गावर...

अखेर ऑपरेशन टायगर यशस्वी होण्याच्या दृष्टीने दिशेने पहिले पाऊल आज पडले आहे. शिल्लक शिवसेनेतल्या एकूण नऊ खासदारांपैकी सहा खासदारांनी शिल्लक शिवसेनेला राम राम ठोकलेला असून त्यांनी आज आपला स्वतंत्र गट स्थापन केला आहे. आता लवकरच ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील. आता या पाठोपाठ लवकरच विधानसभेतीलही १३ ते १४ आमदार असाच स्वतंत्र गट स्थापन करणार अशी खात्रीलायक गोठातील माहिती आहे. त्याचबरोबर मुंबई महापालिकेतील ६५ नगरसेवकांपैकी सर्व नगरसेवक उद्धव ठाकरेंनी सांभाळून ठेवावे असे आव्हान शिंदे सेनेचे खासदार नरेश मस्के यांनी दिले आहे. एकूणच उद्धव ठाकरेंची शिवसेना आता हळूहळू संपणार की काय असे चित्र दिसू लागले आहे.
हा सर्व घटनाक्रम बघता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने ठाकरेंच्या शिल्लक शिवसेनेला आणखी एक जबरदस्त झटका दिला आहे असे म्हणता येईल. २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुका भाजपसोबत महायुतीत लढवून निवडणुकीचे निकाल लागल्यावर उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी भाजपसोबत जी काही धोकेबाजी केली तिचा वचपा पुन्हा एकदा काढण्यात मोदी, शहा, फडणवीस यशस्वी झाले आहेत.
अर्थात जे काही घडते आहे ते मोदी, शहा फडणवीस यांचे जसे यश आहे, तसेच शरद पवारांचेही यश आहे असे काही राजकीय विश्लेषक म्हणतात. आता या प्रकारात शरद पवारांना साधायचे तरी काय असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मात्र शरद पवारांना कसेही करून शिवसेना संपवायची होती, ते लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने ते आणखी एक पाऊल पुढे सरकले आहेत, हे निश्चित, असे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
शरद पवारांना शिवसेना संपवायची तरी का होती याचा विचार करायचा झाल्यास आपल्याला इतिहासात डोकावावे लागेल. शिवसेनेची स्थापना १९६६ साली झाली. त्यावेळी महाराष्ट्रात मुख्यमंत्री जरी वसंतराव नाईक होते, तरी रिमोट कंट्रोल मात्र यशवंतराव चव्हाण यांच्याच हातात होता. यशवंतराव १९६२ मध्ये दिल्लीला केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेले. त्याआधी ते महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते. केंद्रात गेले तरी महाराष्ट्राचा सर्व कारभार ते दिल्लीतून हाकायचे असे म्हटले जाते. ते दिल्लीला गेल्यावर पहिले मुख्यमंत्री चंद्रपूर जिल्ह्यातील मारोतराव कन्नमवार हे होते. त्यावेळी प्रत्येक बाबतीत काय करायचे याच्या सूचना म्हणे चव्हाणच दिल्लीवरून द्यायचे. मग कन्नमवार म्हणायचे "मी मुंबईत भरतासारखा पादुका सांभाळतो आहे आणि माझा राम हा वनवासात न जाता दिल्लीत जाऊन बसला आहे." यावरून एकंदरीत परिस्थिती लक्षात यावी. कन्नमवार गेल्यावर वसंतराव नाईकांच्या बाबतीतही तेच होते. त्यावेळी मुंबईत जॉर्ज फर्नांडिस आणि कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांची दहशत होती. या दोघांनी ठरवले तर तासाभरात मुंबई ठप्प करू शकत होते. हे दोघेही चव्हाण यांच्या ऐकण्यात होते. त्या जोरावर चव्हाण इथल्या मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणायचे. त्याचवेळी विदर्भात नाग विदर्भ आंदोलन समितीचा जोर होता. ते मात्र चव्हाण यांच्या विरोधात होते. १९६६ मध्ये चव्हाण यांनी नागबीतर्फ आंदोलन समितीचे प्रमुख नेते लोकनायक बापूजी अणे आणि टी जी देशमुख या दोघांनाही हाताशी धरले आणि तुम्ही काँग्रेसमध्ये या तुम्हाला विदर्भ मिळवून देतो असे सांगितले. ते दोघेही काँग्रेसमध्ये आल्यामुळे नाग विदर्भ आंदोलन समितीचा जोर संपला. चव्हाण यांचे आता महाराष्ट्रात एकछत्री राज्य सुरू झाले होते.
तेच वसंतराव नाईक यांना अडचणीचे ठरत होते. त्यामुळे चव्हाण यांना शह देण्यासाठी डांगे आणि फर्नांडिस यांची ताकद कशी कमी करता येईल याचा विचार नाईकांनी सुरू केला. त्यावेळी प्रबोधनकार ठाकरेंचे चिरंजीव बाळ ठाकरे हे मार्मिक नावाचे साप्ताहिक चालवायचे. त्यातून मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाबाबत ते वाचा फोडायचे. वसंतराव नाईक यांनी ठाकरेंनाच हाताशी धरले आणि त्यांना पडद्याआडून रसद पुरवली. त्यातूनच शिवसेना उभी झाली. त्या काळात शिवसेनेची वाढती ताकद पाहून आचार्य अत्रे हे शिवसेनेला वसंत सेना म्हणूनच पुकारायचे. हे बघता वसंतराव नाईकांची शिवसेनेला आतून मदत होती हे उघड गुपीत होते. शिवसेनेने मुंबईच्या कामगार क्षेत्रात प्रवेश करून फर्नांडिस आणि डांगे यांची ताकद संपवली. त्याचा परिणाम यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणावर देखील झाला. याच काळात नाईकांनी विदर्भातही जांबुवंतराव धोटे नावाचे नवे विदर्भवादी नेतृत्व उभे केले. त्यालाही नाईकांचा आतून पाठिंबा होता. धोटेंनी देखील १९७७-७८ पर्यंत विदर्भात आपली ताकद कायम ठेवली होती. त्यामुळेच १९७८ नंतर यशवंतराव चव्हाण यांचे राजकारणातले महत्त्व हळूहळू कमी होत गेले.. शेवटली काही वर्षे तर ते दिल्लीत अज्ञातवासातच होते असे म्हटले तरी चुकीचे ठरू नये.
शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय मानसपुत्र म्हणूनच ओळखले जात होते. आपल्या राजकीय गॉडफादरला शिवसेनेने अशा पद्धतीने खच्ची करावे हे कुठेतरी शरद पवारांच्या मनात खूपत होते. त्यामुळेच त्यांना शिवसेनेचे जितक्या लवकर खच्चीकरण करता येईल तितक्या लवकर करायचं होते. त्यामुळेच १९९२ मध्ये छगन भुजबळांसह १४ आमदारांना फोडून शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरे यांना पहिला धक्का दिला होता. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी केली. त्यामागेही शरद पवारांचे डोके होते असे अनेक राजकीय जाणकारांचे मत आहे. राज ठाकरेंनी शिवसेना सोडणे हा देखील शिवसेनेला एक धक्काच होता.
२०१४ मध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढले. तेव्हाच शरद पवार हे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंसोबत युती करून महाराष्ट्रात सत्ता मिळवू शकले असते. पण त्यावेळी त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊन उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला. शेवटी उद्धव ठाकरे यांना दाती तृण धरून देवेंद्र फडणवीस यांना शरण जावे लागले होते.
२०१९ मध्ये जे राजकीय नाट्य घडले त्यामागेही शरद पवारांचा मेंदू काम करत होता असे राजकीय विश्लेषक ठामपणे सांगतात. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिघेही एकत्र येत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचे इतपत राजकारण मान्य, मात्र त्यावेळी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणे ही शरद पवारांचीच खेळी होती. तिथे सामान्य शिवसैनिक तर दुखावलाच आणि शिवसेनासमर्थक सुद्धा तितकाच दुखावला. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेला सत्तेत आणले, मात्र ठाकरे कुटुंबाला कायम सत्ते बाहेर ठेवले होते. उद्धव ठाकरे देखील त्याच मार्गाने गेले असते तर कदाचित शिवसेनेतली फुट टळली देखील असती. मात्र शरद पवारांनाही शिवसेनेत फूट पाडायचीच होती. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांना धरून बांधून गोसावी बनवत मुख्यमंत्रीपदी बसवले. परिणामी शिवसेनेचे आमदार दुखावले आणि २०२२ मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली. नंतरच्या निवडणुकांमध्ये सुद्धा या फुटीचे फटके शिवसेनेला बसतच राहिले आणि आज शिवसेना पुरती विकलांग झाली आहे. आता जर काही चमत्कार झाला तरच शिवसेना पुन्हा नव्याने उभी राहू शकते आणि पुन्हा जुने वैभव मिळू शकते. अन्यथा भविष्यात शिवसेनेचे अस्तित्व फक्त कागदावरच राहील आणि एका काळात महाराष्ट्राच्या इतिहासात आपला दबदबा निर्माण करणारा एक पक्ष म्हणून शिवसेनेची नोंद घेतली जाईल. वर्तमानात शिवसेना कुठेही नसेल हे चित्र आज तरी स्पष्ट दिसते आहे.
हे सर्व बघता शरद पवारांनाही शिवसेना संपवून यशवंतराव चव्हाण यांचे ठाकरे यांनी केलेले नुकसान वसूल करायचे होते. त्यामुळेच ते वेळोवेळी खेळी खेळत गेले आणि शिवसेनेला कमकुवत करत गेले असे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यातील वास्तव एकदम नाकारताही येत नाही.
काहीही असले तरी एका काळात महाराष्ट्रात मराठी माणसाची तारणहार म्हणून शिवसेना उभी झाली होती. ते वैभव शिवसेनेने आपल्या हाताने गमावले. ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी विरोध केला, त्याच काँग्रेस सोबत उद्धव ठाकरेंनी अभद्र शय्यासोबत केली. बाळासाहेब हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढले आणि उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी मुस्लिमांचे लांगूल चालन केले. बाळासाहेबांच्या काळातील जुने वैभव शिवसेनेला पुन्हा एकदा प्राप्त व्हावे असे प्रत्येक मराठी माणसाला वाटते. अर्थात आज तरी ते चित्र फार धूसर दिसते आहे.
अर्थात हे माझे मत झाले.....
तुमची स्पष्ट आणि परखड मते तुम्ही देखील मांडू शकता..
✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment