आठवणींच्या हिंदोळ्यावर:-सहजगत्या घडलेले भवानीदेवीचे दर्शन.
आठवणींच्या हिंदोळ्यावर
२१ मे २०२६
*नमस्कार मंडळी*
*आज २१ मे २०२६, आज मला ७१ वर्षे पूर्ण झाली आहेत. गत सात दशकांच्या आयुष्यात जी काही वेगवेगळे प्रसंग अनुभवायला मिळाले, ते सर्व मी "आठवणींच्या हिंदोळ्यावर" या शीर्षकाखाली आपल्याशी शेअर करणार आहे. काल लिहिल्याप्रमाणे आठवड्याला किमान एक तरी आठवण मी लिहिणार आहे. तर या लेखमालिकेतील पहिला लेख आज मी लिहितो आहे....*
**************
सहजगत्या घडलेले भवानीदेवीचे दर्शन
आजकाल बऱ्याच ठिकाणी देवाच्या दारी तुम्ही गेलात की दर्शनासाठी खूप ताटकळावे लागते. त्यातही ते तीर्थक्षेत्र असले तर मग विचारायलाच नको. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपुरात वारकऱ्यांना १५ ते १६ तास रांगेत उभे राहावे लागते. तोच प्रकार इतरत्र देखील आहे, मग ती कोल्हापूरची अंबाबाई असो की तुळजापूरची भवानीदेवी, भक्तांची मोठी रांग ही ठरलेलीच असते. मला आठवते, तिरुपतीच्या बालाजीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही दुपारी एक वाजता रांगेत उभे राहिलो. दर्शन झाले तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. यावरूनच परिस्थिती लक्षात यावी.
अशावेळी तुम्ही मोठी रांग पाहून आणि आता किमान चार तास तरी थांबावे लागणार हे पाहून अस्वस्थ झाला असलात, आणि अचानक कोणीतरी देवदूतासारखा भेटून तुम्हाला अवघ्या पंधरा मिनिटात दर्शन घडवून बाहेर आणले असेल, तर तुम्ही तो योगायोग तरी समजता, किंवा मग देवालाच तुमच्या भेटीची ओढ लागली होती, म्हणूनच त्याने लवकर बोलावून घेतले असा समज करून घेत स्वतःचे समाधान तरी करून घेता.
असाच एक योग माझ्या आयुष्यात देखील एकदा तुळजापूरच्या भवानीमातेच्या मंदिरात अचानक आला होता. ही घटना ऑगस्ट २००९ ची आहे. त्यावेळी हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेची एक बैठक सोलापूर येथे होणार होती. शनिवार आणि रविवार ती बैठक होती. त्यावेळी मी पत्नी अनुरुपा आणि मुलगी दिव्येशा हिलाही घेऊन तिथे जायचे ठरवले, आणि नंतर एक दिवस थांबून पंढरपूर आणि तुळजापूरला जाऊन यायचे असा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारी सकाळी आम्ही सोलापुरात डेरे दाखल झालो.
सोलापुरात शनिवारी सकाळी ११ पासून कार्यक्रम ठरले होते. दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम होते. रविवारी सकाळी दहा वाजता देखील एक बैठक लागली होती. दुपारी एक पर्यंत चालली. मग आमचे भोजन संपले आणि बैठकीचे सूप वाजले. त्यानंतर बैठकीला आलेली सर्व मंडळी एक गाडी करून आम्ही अक्कलकोटला जाऊन आलो. बाकी मंडळी त्याच दिवशी रात्री सोलापूरहून आपापल्या गावी रवाना झाली. आम्ही मात्र दुसऱ्या दिवशी मुक्काम ठेवला होता.
सोमवारी सकाळी आम्ही एका टॅक्सीची सोय केली होती. त्या टॅक्सीने आम्ही पंढरपूरला पोहोचलो. पंढरपूर हे माझी पत्नी अनुरूपाचे आजोळ असल्यामुळे तिथे तिचे मामा आणि मावशी यांची घरे होती. त्यांच्या घरी जाऊन थोडी विश्रांती घेतली आणि पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतले. सर्व नातलगांच्या भेटीगाठी आटोपल्या आणि आम्ही तिथून परत सोलापूरच्या दिशेने निघालो. पंढरपूरहुन तुळजापूरला जायचे तर सोलापूर मार्गेच जावे लागते. तसे आम्ही सोलापूरला पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे पाच वाजत होते. आम्ही तिथे मंदिराच्या परिसरात गेलो अनुरूपाने ओटीचे आणि प्रसादाचे सामान घेतले आणि दर्शनासाठी कुठून जायचे त्याची चौकशी केली. तर तिथे खूप मोठी रांग होती. तिथल्या सुरक्षारक्षकाकडे चौकशी केली, तर ही रांग संपायला आणि तुमचे दर्शन व्हायला रात्रीचे नऊ तरी वाचतील असे त्याने सांगितले. तो दिवस श्रावण सोमवारचा होता. आम्हा उभयतांना उपवास होता. त्यामुळे इतके उशिरा दर्शन घ्यायचे, मग उपवास सोडायचा, तर कसे करायचे या विचारात आम्ही होतो. तुळजापूरला गर्दी असली तर तिथे शिवसेनेच्या शहर प्रमुखांशी संपर्क करा, तुमचे दर्शन झटपट होऊन जाईल असे मला शिवसेनेच्या एक उपनेत्या आणि माझ्या स्नेही डॉ. नीलमताई गो-हे यांनी सांगितले होते, आणि त्या शहरप्रमुखाचा मोबाईल नंबरही दिला होता. मात्र पंढरपूरहुन निघाल्यापासून त्या शहर प्रमुखाला मी फोन करत होतो. मात्र फोन उचललाच जात नव्हता. त्यामुळे आता काय करायचे या विवंचनेत मी, पत्नी अनुरुपा आणि मुलगी दिव्येशा तिघेही उभे होतो. आम्ही विचार करतोच आहोत तोच बाजूने एक सणसणीत आवाज कानावर पडला." अरे काय पाठक नागपूर सोडून इथे तुळजापुरात काय करत आहात?" मी आवाजाच्या दिशेने वळून पाहिले, तर शिवसेना नेते आणि विधान परिषद सदस्य आ. दिवाकर रावते काही सहकाऱ्यांसोबत समोर चालत येत होते. मी आधी बरीच वर्षे विधान परिषदेतच वृत्तसंकलन करीत असल्यामुळे रावते आणि माझी बऱ्यापैकी मैत्री होती. चालतच ते समोर आले मग मीही हसून त्यांना उत्तर दिले. "तुम्ही नागपूर आणि मुंबईत कधी भेटत नाही, म्हणून तुमच्या शोधात इथे तुळजापूरला येऊन पोहोचलो आहे, इथे तरी तुम्ही भेटाल म्हणून." मी असे म्हणताच ते हसत म्हणाले "चला, थापा देऊ नका, तुम्ही दर्शनाला आलात हे दिसतेच आहे. तुमचं दर्शन झालं का? त्यांनी असे विचारताच मी लगेच उत्तर दिले "मी सहकुटुंब आलो आहे दर्शनासाठीच, आणि नीलमताईंनी तुमच्या शहर प्रमुखांचा मोबाईल नंबर दिला होता. मात्र त्यांना मोबाईलवर फोन करतो आहे पण फोनच उचलला जात नाही. त्यामुळे आता ही दर्शनाची मोठी रांग पाहून आम्ही विचारात पडलो आहोत." मी असे सांगताच त्यांनी बाजूच्या शिवसैनिकाकडे बघितले आणि मला म्हणाले "हाच आहे तो" मग त्यांनी त्याला त्याला दाटायला सुरुवात केली. "काय रे तू पाठकांचा फोन उचलला नाहीस?" तो बिचारा सारवासारव करायला लागला. त्यावेळी रावतेंनी त्याला फटकारले," हे मोठे पत्रकार आहेत, आणि आपल्या शिवसेनेच्या सर्वच नेत्यांचे चांगले जवळचे आहेत. पुन्हा यांचा फोन उचलायचा नाही असं करू नकोस." मग लगेच ते आमच्याकडे बघून म्हणाले," चला दर्शन करून घेऊ आपण," लगेच माझ्या पत्नीकडे बघत म्हणाले, "चला वहिनी, चल ग बेटा तूही चल," असे म्हणत आम्हाला सगळ्यांना घेऊन ते देवळाच्या मागच्या बाजूला पोहोचले. तितक्यात तिकडून तिथला सुरक्षारक्षक धावत आला, आणि त्याने लगेच मागच्या दाराचे कुलूप उघडले, आणि आम्हा सर्वांना त्याने आत घेतले. मग मी अनुरूपा दिव्येशा आणि रावते साहेब, शिवाय त्यांच्यासोबतचे सर्व शिवसैनिक असे दोन मिनिटात थेट गाभाऱ्यातच पोहोचलो. दिवाकर रावते दर्शनाला येणार ही तिथल्या पुजाऱ्याला पूर्वसूचना असावी. त्यामुळे त्याने लगेचच त्यांचे स्वागत केले. मग आम्ही सर्वांनी दर्शन घेतले . विशेष म्हणजे त्यावेळी गाभाऱ्यात आम्ही मोजकेच लोक होतो बाकी सर्व गर्दी बाहेर थोपवली होती. त्यावेळी मला सहजच व. पु. काळे यांच्या एका कथेतला प्रसंग आठवला. त्यात वपुंनी लिहिले होते की पंढरपूरला कथाकथनासाठी गेलो असताना तिथल्या आयोजकांचा मंदिरात इतका वट होता, की मी म्हटले असते की पांडुरंगाच्या गळ्यात हात टाकून मला फोटो काढायचा आहे, तरी त्यांनी काढू दिला असता. माझी पत्नी अनुरूपाला देवीची ओटी भरायची होती. त्यासाठी ती पुढे झाली. तसे रावतेंनीच पुजारीबुवांना सांगितले, "गुरुजी, वहिनींना ओटी भरायची आहे, ती भरून घ्या." मग ओटी भरण्याचा कार्यक्रम आटोपला. अशा मोठ्या मंदिरांमध्ये कोणी मान्यवर मंडळी आली तर त्यांना तिथले ओटीत आलेले नारळ प्रसाद म्हणून देण्याची पद्धत असते. एरवी तुम्हाला ते नारळ हवे असले तर ते विकत घ्यावे लागतात. पुजाऱ्याने लगेचच रावतेच्या हातात नारळ आणि देवीवरचे एक फुल दिले. त्यांनी नमस्कार केला मग रावतेंनीच पुजाऱ्याला सांगितले, "पाठकांनाही नारळ द्या आणि वहिनींनाही द्या." मग आम्हा दोघांनाही देवीचा मानाचा नारळ अगदी सहज हातात दिला गेला. तिथे प्रसाद घेतला आणि आम्ही बाहेर निघालो. हा सर्व कार्यक्रम अवघ्या पंधरा मिनिटात आटोपला होता. मग तिथे समोरच एक महादेवाचेही मंदिर आहे. तिथेही रावते आम्हाला दर्शनाला घेऊन गेले. "इथे शिवाजी महाराज नेहमी दर्शनाला यायचे आणि याच मंदिरात भवानी मातेने शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिली होती" अशी माहिती देखील रावतेंनी आम्हाला दिली. अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटात आम्ही दर्शन आटोपून बाहेर निघालो होतो. मग रावतेंना म्हटले की चला आपण पुढे चहा घेऊया, तर ते म्हणालेत की आता चहा नको आम्हाला घाईने पुढल्या गावात सभेसाठी जायचे आहे, त्यामुळे चहा पेंडिंग ठेवा" मग माझ्या पत्नीकडे बघत म्हणाले "वहिनी नागपूर अधिवेशनात चहा घ्यायला मी घरीच येईल" इतके बोलून त्यांनी आमचा निरोप घेतला. मग दहा-पंधरा मिनिटे तिथे समोर लागलेल्या दुकानांमध्ये अजून काही किरकोळ खरेदी केली. तिथल्याच एका टपरीवर चहा घेतला आणि पावणेसहाच्या सुमाराला आम्ही सोलापूरकडे परत निघालो होतो.
निघाल्यावर टॅक्सीत आमची चर्चा सुरू झाली. दिव्येशा म्हणाली "बाबा, हे रावते काका भेटले नसते तर आपल्याला निघायला दहा वाजले असते." तर मग अनुरूपा म्हणाली "त्यांना बहुदा भवानी देवीनेच पाठवले असावे. कारण आज आपले दर्शन लवकरात लवकर होऊन पुढे वेळच्यावेळी आम्हा दोघांचाही श्रावण सोमवारचा उपवास सुटायला हवा याची देवीलाच काळजी असावी. त्यामुळेच आज इथे अचानक दिवाकर रावते भेटले आणि आपले दर्शन अगदी सहज होऊन गेले. "
त्या दिवशीचा हा योगायोग आणि सहजगत्या झालेले भवानी मातेचे दर्शन हे आम्हा सर्वांनाच कायम आठवणीत राहिलेले आहे.
✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment