सहज सुचलं म्हणून ... ..तर मग मराठीत बोला म्हणून कोणताही कायदा करावा लागणार नाही...
सहज सुचलं म्हणून...
..तर मग मराठीत बोला म्हणून कोणताही कायदा करावा लागणार नाही...

महाराष्ट्र दिनापासून महाराष्ट्रातील सर्व ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीत बोलण्याची सक्ती करण्यात आली आहे. ते जर मराठीत बोलणार नसतील तर त्यांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. त्यावरून आता राजकारण देखील बरेच रंगले आहे. मराठी समर्थक विरुद्ध मराठी विरोधक अशी रंगतदार लढत समोर आलेली दिसते आहे.
मुळात असा कायदा करण्याची वेळ महाराष्ट्रावर काय यावी याचा विचार देखील प्रत्येक मराठीप्रेमी नागरिकाने करायला हवा. महाराष्ट्र सुरुवातीपासून एक विकसित राज्य म्हणूनच ओळखले गेले आहे. त्यामुळे इथे रोजगार सहज उपलब्ध होतो असे प्रत्येकालाच वाटते. परिणामी देशभरातून परप्रांतीय इथे येतात आणि पोटापुरते कमावतात. मग हळूहळू इथेच स्थायिक होतात. हे प्रकार मुंबईतून सुरू झाले आणि पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले आहेत.
महाराष्ट्रात व्यवसायासाठी हे परप्रांतीय येतात. त्यांना मराठीचा गंधही नसतो. ते हिंदीत बोलतात आणि आपला व्यवसाय करतात. आपणही त्यांच्याशी हिंदीत बोलतो आणि आपले काम करून घेतो. मात्र आम्ही मराठीतच बोलू असे प्रत्येक मराठी माणूस का ठरवत नाही?
आज महाराष्ट्रात मराठी माणूस हा कोणत्याही दुकानात किंवा फेरीवाल्याकडे गेला तर त्याच्याशी हिंदीतच बोलायला सुरुवात करतो. मग समोरचा माणूस देखील तुम्हाला हिंदीतच उत्तर देतो. अनेकदा दोन मराठी माणसं देखील एकमेकांशी मराठीतच बोलत असलेले तुम्हाला दिसून येतात. त्या ऐवजी मराठी माणसाने समोरच्या माणसाशी मराठीतच बोलायचे असे का ठरवले जात नाही, आणि ठरवल्यानुसार तसे वर्तन देखील का केले जात नाही?
मला आठवते सुमारे ४० वर्षांपूर्वी आम्ही काही मित्रमंडळी नागपुरातील धरमपेठच्या कॉफी हाऊस मध्ये बसायचो. कॉफी हाऊस ही दक्षिणात्य मंडळींची हॉटेलची चेन आहे. त्यामुळे त्यांच्या हॉटेलमध्ये काम करणारे सर्व वेटर्स हे दक्षिणात्यच असतात. त्यांना मराठीत बोलणे जमत नाही, त्यामुळे ते हिंदीतच बोलायचे. मात्र आम्ही सर्व मित्रांनी ठरवले होते की तिथे त्या वेटर मंडळी तसेच काऊंटर वरील मॅनेजर या सर्वांशी मराठीतच बोलायचेआणि त्यांच्याकडून मराठीतच उत्तराची अपेक्षा करायची. मग त्यातल्या अनेकांना आम्ही मराठी शब्द सुद्धा शिकवायला सुरुवात केली होती, आणि ती दाक्षिणात्य मंडळी देखील मराठी शिकायला तयार झाली होती. आमच्यातलं एक साहित्यिक मित्र विदर्भ साहित्य संघाचा पदाधिकारी होता. त्यावेळी विदर्भ साहित्य संघातर्फे मराठी भाषिकांसाठी मराठीच्या परीक्षा घेतल्या जात असत. त्यावेळी गमतीत आम्ही या सर्व वेटर्सना आता साहित्य सांगायच्या संघाच्या मराठीच्या परीक्षांना बसवूया असेही म्हणायचो.
तुम्ही जर मराठीतच बोलण्याचा आग्रह धरला तर परप्रांतीय देखील मराठी शिकायला तयार होतील. पण तुम्ही जर त्यांच्याशी हिंदीत बोलायला सुरुवात केली तर ते तुमच्याशी का मराठीत बोलतील?
इथे आणखी एक मुद्दा मांडावासा वाटतो. इथे परप्रांतीय मोठ्या प्रमाणात व्यवसायासाठी का आले याचाही विचार आम्हाला करायला हवा. आज अनेक मराठी भाषिक बेकार आहेत. त्यांना रोजगार नाही म्हणून ओरड होते. त्याचवेळी हे परप्रांतीय इथे येऊन रोजगार मिळवतात आणि वर्षानुवर्षे राहून इथे घरदार वसवतात. आमच्या घरी धुणी भांडी करायला येणारी मोलकरीण बाई काही वर्षांपूर्वी छत्तीसगड मधून इथे आली आणि इथे सकाळी सहा पासून तर दुपारी पाच पर्यंत घरोघरी थोडी भांडी झाडू पोछा ही सर्व कामे करू लागली. त्यातून पैसा कमवत तिने गावाबाहेर स्वतःचे घर बांधले. आजही सायकलने फिरून ती घरोघरी जाऊन कामे करते. हे एक उदाहरण झाले. बाकीही आज चौकाचौकात उभे असणारे फळवाले भाजीवाले हे देखील मोठ्या प्रमाणात परप्रांतीयच आहेत. ते सकाळी सात वाजल्यापासून आपला हातगाडा लावून बसतात आणि दिवसभर भाजी विकत असतात. हीच कामे मराठी माणसाने का करू नये. मात्र तिथे आमची प्रतिष्ठा आडवी येते.
आज परप्रांतीयांनी आमचा रोजगार पळवला म्हणून आम्ही ओरड करतो. आज महाराष्ट्रातील बहुसंख्य उद्योगधंदे परप्रांतीयांच्या हातात आहेत म्हणून आम्ही तक्रार करतो. मात्र हे सर्व करायला तुम्हाला कोणी अडवले होते? तुम्ही जर ही सर्व कामे केली असती तर तुम्ही देखील आपला व्यवसाय उभारू शकला असतात? आज एका काळात उत्तर प्रदेशातून मुंबई झालेला हात गाडीवर कांदे बटाटे विकत मोठा होतो आणि एक दिवस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्याचा नंबर लागलेला आम्ही पाहतो. आम्ही मात्र फक्त त्याच्या नावाने ओरडत राहतो. पण आम्ही आपल्यात काय बदल करायला हवा याचा आम्ही कधीच विचार करत नाही.
आज तोच विचार करण्याची वेळ आलेली आहे. आम्ही कोणत्याही रिक्षा किंवा टॅक्सीवाल्याशी मराठीतच बोलू आणि जो मराठीत उत्तर देईल त्याच्यात वाहनात आम्ही बसू, तसेच जो व्यावसायिक आमच्याशी मराठीत संवाद साधेल त्याच्याकडे आम्ही खरेदी करायला जाऊ असे प्रत्येक मराठी माणूस जर ठरवेल, तर इथे प्रत्येकाला मराठी शिकावीच लागेल. त्याचप्रमाणे मराठी माणूस नोकरीच्या मागे न लागता प्रत्येकाने छोटा-मोठा उद्योग धंदा करायचे ठरवले तर परप्रांतीयांची ही दादागिरी आपोआप संपेल. मग मराठी माणूस नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा बनेल.
त्यासाठी गरज आहे ती जबर इच्छाशक्तीची. ती प्रत्येक मराठी माणसाने दाखवायला हवी आणि त्यासाठी मराठी संघटना आणि नेत्यांनी देखील मराठी माणसाला प्रवृत्त करायला हवे. तसे झाले तर मग या राज्यात मराठीसाठी कोणताही कायदा करायची गरज पडणार नाही, इतकेच सहज सुचले म्हणून सांगावेसे वाटते.
✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment