माझंही मत... फक्त विरोधासाठी विरोध व्यापक देशहितासाठी मारकच..

माझंही मत...

फक्त विरोधासाठी विरोध व्यापक देशहितासाठी मारकच..

इस्रायल आणि इराण यांच्यातील अमेरिका प्रायोजित युद्ध तात्पुरते थांबलेले असले तरी अजूनही धमक्यांचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे पुन्हा युद्ध केव्हा घडले हे सांगता येत नाही. हीच बाब लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना काटकसरीचे आवाहन केले आहे. त्यात त्यांनी महत्त्वाचे म्हणजे इंधन वाचवायला सांगितले आहे आणि त्याचबरोबर नवीन सोने खरेदी करू नका ही देखील सूचना केली आहे. सोबतच परदेश दौरे देखील करू नका हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. इतरही  वेगवेगळ्या सूचना त्यांनी नागरिकांना केल्या आहेत. 

त्यांच्या या सूचना जाहीर होताच देशातील विरोधी पक्षांनी त्याचे जोरदार राजकारण देखील सुरू केले आहे. मात्र आपल्या देशातील विरोधी पक्ष एक बाब विसरतात की जेव्हा आपण एक बोट समोरच्याकडे दाखवतो तेव्हा तीन बोटं आपल्याकडे असतात. 

आपल्या देशात राष्ट्रप्रमुखांनी किंवा सरकारने अशा प्रकारे काटकसर करायला सांगण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील अनेकदा असे प्रकार घडले आहेत. मात्र आपले विरोधी पक्ष सध्या केंद्र सरकारकडे दूरदृष्टीचा अभाव आहे असा आरोप करत आहेत. मग तसा विचार केला तर पूर्वीच्या सरकारांकडे सुद्धा दूरदृष्टीचा अभाव होता का हा प्रश्न उपस्थित होतो. 

मला आठवते १९६२ मध्ये ज्यावेळी चीनने भारतावर आक्रमण केले. त्यावेळी परदेशातून शस्त्र खरेदी करण्यासाठी आपल्या तिजोरीत सोन्याचा साठा असणे गरजेचे होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुवर्ण नियंत्रण कायदा आणला होता. एका व्यक्तीजवळ ठराविक वजनाचे सोन्याचे दागिने असावेत. त्यापेक्षा जास्त असल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई होईल असा सज्जड दम भरत नेहरुंनी पोलिसांच्या मदतीने नागरिकांच्या घरचे सोने मोठ्या प्रमाणात जप्त केले होते. नागपुरातच एका धनिकाच्या घरी सरकारी नियमापेक्षा जास्त सोने आढळल्यामुळे त्याला तुरुंगवास देखील झाला होता अशी चर्चा होती. हा सुवर्ण नियंत्रण कायदा दीर्घकाळ अमलात आला होता. 

१९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी आपल्या देशात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशवासीयांना दर सोमवारी एकच वेळा जेवा आणि अन्नधान्य वाचवा असे आवाहन केले होते. त्यावेळी सोमवारी संध्याकाळी देशभरात सर्व हॉटेल्स बंद असायचे. खाणावळी सुद्धा बंद ठेवल्या जायच्या, आणि सोमवारी संध्याकाळी कुठेही अशा मोठ्या पार्ट्या सुरू असल्या तर त्यावर नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी धाडी टाकायचे आणि अन्न जप्त करायचे. सोबत मालकावर गुन्हा देखील नोंदवायचे. लग्नाकार्यातही २५ च्या वर लोकांना भोजन देऊ नये असे निर्बंध त्यावेळी लावले होते. 

१९७३ मध्ये देखील आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी देखील इंधनाचा तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हा नागपुरात १.९० रुपये प्रति लिटर या भावाने पेट्रोल मिळायचे. एका रात्रीत तो भाव ३.१० रुपये इतका गेला होता. तेव्हा देखील पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी अशाच रांगा लावाव्या लागत होत्या. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नागरिकांना इंधनावर चालणारी वाहने कमी चालवा असे आवाहन केले होते. 

१९९०-९१ मध्ये पुन्हा एकदा इस्रायल आणि इराक यांच्यात युद्ध भडकले होते. त्यावेळी देखील इंधनाची समस्या निर्माण झाली होती. परिणामी देशाच्या अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम झाला होता. त्यावेळी इंधनाच्या तुटवड्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव तर वाढले होते पण त्याचबरोबर पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या कित्येक रेल्वे गाड्या देखील रद्द केल्या गेल्या होत्या. जागतिक बाजारपेठेत रुपयाचा भाव देखील चांगलाच घसरला होता. त्यावेळी जागतिक नाणेनिधी कडून कर्ज घेण्यासाठी कित्येक किलो सोने रिझर्व बँकेला जागतिक नाणेनिधीकडे गहाण ठेवावे लागले होते. त्यानंतर देखील अर्थव्यवस्था पूर्णतः बिघडलेली होती. मग नरसिंहराव सरकार सत्तेत आल्यावर त्यांना रुपयाचे अवमूल्यन देखील करावे लागले होते. 

ही माझ्या आठवणीतली काही उदाहरणे मी वाचकांसाठी दिली आहेत. असे अजूनही काही प्रसंग घडलेले असू शकतात. मात्र यावेळी ओरड अतिरेकी प्रमाणात केली जाते आहे .यामागे देखील विरोधकांचे राजकारणच आहे असे म्हणण्यास बराच वाव आहे. 

पंतप्रधानांनी इंधन वाचवा आणि विजेवर चालणारी वाहने वापरा असे आवाहन केल्यावर सरकारने आधी हे काम करावे अशी टीका विरोधकांकडून केली गेली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या ताब्यात १५ ते २० वाहने कशाला असतात असा सवालही केला. मात्र पंतप्रधान ही देशातील अतिविशिष्ट व्यक्ती असते. आपल्या देशात दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणात होतात. यापूर्वी देखील पंतप्रधानांवर हल्ले होण्याचे प्रसंग घडलेले आहेत. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्याच सुरक्षारक्षकाने त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याची घटना घडली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची मानवी बॉम्बने हत्या करण्यात आली आहे. असे प्रसंग लक्षात घेत अतिविशिष्ट व्यक्तींना विशेष सुरक्षा पुरवली जाते. त्यासाठी हा वाहनांचा ताफा असतो. तसा विचार केला तर कोणत्याही पदावर नसताना पाच-सहा गाड्यांचा ताफा घेऊन राज ठाकरे गावोगावी फिरतातच ना. 

मात्र पंतप्रधान मोदींनी आपल्या वाहनातील वाहनांच्या ताब्यातील बरीच वाहने कमी केल्याची बातमी आहे. आता ते फक्त दोन वाहने सोबत घेऊन जात आहेत आणि ती देखील इलेक्ट्रिकवर चालणारीच आहेत. सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात सुद्धा सर्व मंत्र्यांनी इलेक्ट्रिक वर चालणारी वाहने वापरावी असे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आपल्या वर्षा बंगल्यावरुन मंत्रालयात इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या बाईकने आल्याचे टीव्हीवर दाखवण्यात आले. नागपुरात स्थायी समिती अध्यक्ष चक्क आपली बसने प्रवास करायला लागल्या आहेत. दिल्लीतही केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे मेट्रोने जाणे येणे करीत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आता वाहनांचा ताफा सोबत मिळण्याऐवजी नेण्याऐवजी एकाच बसने मंत्री, त्यांचा खाजगी स्टाफ, सुरक्षारक्षक आणि पत्रकार असे सर्व एकत्रितपणे प्रवास करत आहेत. 

तरीही विरोधकांचे राजकारण सुरूच आहे. एकूणच विरोधाकरता विरोध हेच त्यांचे धोरण दिसते आहे. मात्र माझ्या मते असे प्रकार सकस लोकशाहीला मारक ठरणार आहेत. देशावर कोणतेही संकट आले असेल तर त्याचे राजकारण करण्या ऐवजी सर्व पक्षांनी एकत्र येऊन मार्ग काढायला हवा. त्यातच सर्वांचे आणि पर्यायाने देशाचे हित आहे असे मला वाटते. 

अर्थात हे माझे मत झाले.....

आपणही आपली स्पष्ट आणि परखड मते मांडू शकता...

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.