माझंही मत... मग दक्षिणेतही भाजप आपला झेंडा फडकवू शकेल....

माझंही मत...

मग दक्षिणेतही भाजप आपला झेंडा फडकवू शकेल....

पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. अपेक्ष प्रमाणे आसाम आणि पुदुचेरी या दोन प्रांतांमध्ये राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने आपली सत्ता राखली. त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या साम्राज्याला धक्का देत तिथेही भाजपाने सत्ता मिळवली. मात्र दक्षिणेतील दोन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला कुठेच फारसे स्थान मिळालेले दिसले नाही. 

या निकालांवरच एका पत्रकार मित्राशी माझी चर्चा चालू होती. त्यावेळी त्याने मुद्दा उपस्थित केला की दक्षिणेत गेल्या शंभर वर्षांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपले चांगले नेटवर्क उभे केले आहे. आज दक्षिणेतील कर्नाटक राज्याने संघाला एक सरसंघचालक दिले तर दक्षिणेतूनच दोन सरकार्यवाह आणि अनेक महत्त्वाचे अधिकारी संघाला मिळालेले आहेत. तरीही दक्षिणेत भारतीय जनता पक्षाचे अस्तित्व का नाही?

माझ्या मित्राच्या या प्रश्नाने मला निश्चितच विचारात टाकले. त्यामुळे आज याच मुद्द्यावर आपले मत व्यक्त करायचे असे मी ठरवले आहे. 

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व असे यश मिळाले. तिथे पंधरा वर्षापासून असलेली तृणमूल काँग्रेसची सत्ता भाजपने उघडून फेकली. त्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नियोजन असल्याचे मत अनेक पत्रकारांनी व्यक्त केले आहे. त्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ पत्रकारांनी अनेक दाखले देखील दिले आहेत. हे बघता मग दक्षिण भारतात असे नियोजन झाले नव्हते का? आणि झाले असेल तर ते अयशस्वी ठरले का? हा देखील प्रश्न उपस्थित होतो.

इथे मला आधीच स्पष्ट करायचे आहे की मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणीही प्रवक्ता किंवा वरिष्ठ अधिकारी नाही. मात्र संघाचा एक अभ्यासक पत्रकार म्हणून जे काही माझे आकलन आहे, ते लक्षात घेत मी माझे मुद्दे मांडणार आहे. 

आज दक्षिणेत तेलंगणा, आंध्र, केरळ, कर्नाटक पुदुचेरी आणि तामिळनाडू ही राज्य आहेत. यात पुदुचेरीत भारतीय जनता पक्षसमर्थीत सरकार सत्तेत आलेले आहे. कर्नाटकात देखील मित्र पक्षांशी युती करून काही काळ भारतीय जनता पक्ष सत्तेत राहिला होता. आजही तिथल्या विधानसभेत भाजपचे अस्तित्व अगदीच नगण्य नाही.

आंध्र आणि तेलंगणात देखील भारतीय जनता पक्षाने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. मात्र केरळ आणि तामिळनाडू येथे भाजपचे अस्तित्व अगदीच असून नसल्यासारखे आहे. मध्यंतरी तिरुअनंतपुरम इथल्या महापालिकेत भारतीय जनता पक्षाचा महापौर बनला ही राष्ट्रीय बातमी बनली होती. काल जाहीर झालेल्या निवडणूक निकालांमध्ये देखील भाजपला फक्त तीन जागा मिळाल्या आहेत. अशीच परिस्थिती तामिळनाडूमध्ये देखील आहे. 

दक्षिणेतील या परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपले कार्य मोठ्या प्रमाणात उभे केले आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. मात्र तिथली राजकीय परिस्थिती उर्वरित देशापेक्षा वेगळी आहे. त्याचप्रमाणे तिथल्या लोकसंख्येची गणिते देखील काहीशी वेगळी आहेत. या भागात मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मीयांचा प्रभाव अतिरेकी आहे असे म्हटले तरी चालेल. आजचा आंध्र आणि तेलंगणा प्रदेश म्हणून जुने निजामाचे राज्य होते. त्यामुळे इथे मुस्लिमांचा प्रभाव असणे अगदी सहाजिकच आहे. भारतात ख्रिस्ती आले ते दक्षिणेतून. ते आधी व्यापार करण्यासाठी आले. मात्र व्यापार सोबत त्यांनी धर्मप्रसार देखील करायला सुरुवात केली. त्यावेळी म्हणजे सुमारे चारशे वर्षांपूर्वी तळागाळातल्या समाजातील नागरिकांची गरिबी आणि अंधश्रद्धा याचा फायदा घेत त्यांनी अनेक गोरगरीब हिंदूंना फसवून ख्रिश्चन केले होते. त्यामुळे त्या भागात ख्रिश्चन लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे ख्रिश्चन येण्यापूर्वी या परिसरात मुस्लिमांचे देखील प्राबल्य राहिलेले आहे. निजाम तसेच टिपू सुलतान यांनी या परिसरात दीर्घकाळ राज्य केले आहे. मुस्लिमांनी त्या काळात तलवारीच्या जोरावर अनेक हिंदूंना पाठवून मुस्लिम केले आहे, हा इतिहास आहे. त्यामुळेच या राज्यांमध्ये मुस्लिम आणि ख्रिस्ती मोठ्या प्रमाणात असून ‌ आज या सर्वच राज्यांमध्ये मशिदी आणि चर्चेस हे जागोजागी दिसतात. अर्थात या ख्रिस्ती धर्मीयांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात कामे देखील केली आहेत. त्यामुळेच ते जनसामान्यांना आपल्याशी जास्तीत जास्त जोडून ठेवू शकले आहेत. 

तामिळनाडू मध्ये संघाचे नेटवर्क सक्रिय आहे हे वास्तव नाकारता येत नाही. मात्र संघाची सुरुवातीची भूमिका ही हिंदुत्ववादी होती, तर तामिळनाडूमध्ये द्रविड संस्कृतीचे प्राबल्य जास्त आहे. त्यामुळे इथले नागरिक आजही हिंदू संस्कृतीला फारसे मानत नाहीत. इथे द्रविड संस्कृतीचे प्राबल्य आहे. त्यामुळेच इथे हिंदीला मोठ्या प्रमाणात विरोध आहे. इतक्या वर्षात संघाने तिथे आपले जे काही नेटवर्क उभे केले ते तिच्या उच्चवर्णीय हिंदूंना सोबत घेऊन. आता डॉ. मोहन भागवतांनी हिंदुत्व ही संस्कृती आहे, धर्म नव्हे आणि भारतीय भूखंडावर राहतो तो प्रत्येक हिंदूच आहे, ही भूमिका मांडल्यामुळे आता हळूहळू तिथे वाट काहीशी मोकळी होते आहे. काँग्रेस पक्ष हा एका काळात संपूर्ण देशात प्रभाव ठेवणारा पक्ष होता. मात्र इतक्या वर्षात इथे काँग्रेसचा प्रभाव पडू शकला नाही, तर द्रविड संस्कृतीवर आधारित असलेले द्रविड मुनेत्र कळघम आणि ऑल इंडिया अण्णा द्रमुक या पक्षांचेच प्राबल्य राहिले. या दोन पक्षांकडेच आलटून पालटून सत्ता राहत गेली. त्यात ऑल इंडिया अण्णाद्रमुक हा पक्ष काहीसा मवाळ असल्यामुळे भाजपने त्यांना सोबत घेऊन तिथे आपले पाय रोवण्याचे प्रयत्न जारी ठेवले आहे. मात्र त्यात अजून पर्यंत पुरेसे यश आलेले नाही. अर्थात या पक्षांच्या मदतीने संघ परिवार तिथे हळूहळू जमतील तसे पाय रोवण्याचा प्रयत्न करतो आहे हे वास्तव नाकारता येत नाही.

केरळमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन यांचे प्राबल्य होते तसेच तिथे मार्क्सवादी कम्युनिस्ट चळवळीचे देखील प्राबल्य होते. काँग्रेसने संघाशी वैचारिक मतभेद ठेवले पण संघाला शत्रू मानले नव्हते. मात्र कम्युनिस्ट हे संघाकडे शत्रू म्हणूनच बघत होते. परिणामी केरळमध्ये अनेक संघ प्रचारकांच्या आणि स्वयंसेवकांच्या हत्या झाल्या आहेत. या डाव्या पक्षाच्या सरकारांनी अनेक संघ स्वयंसेवकांवर खोटे खटले भरून त्यांना तुरुंगात डांबले आहे. काही महिन्यांपूर्वी त्रिवेंद्रम येथे एक लाख संघ स्वयंसेवकांचे पथसंंचलन झाले होते. त्यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थित होते. या संचालनात अनेक संघ स्वयंसेवक तुरुंगातून पॅरोलवर येऊन सहभागी झाले होते. यावरून या प्रकरणातील गांभीर्य लक्षात येईल. अशाही परिस्थितीत गेल्या शंभर वर्षात अनेक संघ प्रचारकांनी तिथे कामाची मुहूर्तमेढ रोवली आहे. केरळमध्ये उभे झालेले विवेकानंद शिला स्मारक ही तिथल्या संघ स्वयंसेवकांच्या कामाचीच उपलब्धी आहे. 

आज केरळमध्ये भाजप सरसकट निवडून येईल आणि सत्ता परिवर्तन करेल ही अपेक्षा संघालाही नाही. मात्र त्याचवेळी किमान कम्युनिस्टांचे सरकार तरी तिथून जावे हे संघाचे धोरण होते, आणि त्यासाठी संघाने कंबर कसली होती असे सांगण्यात आले. मग त्या परिस्थितीत जे मतदार डाव्यांना कंटाळले आहेत, पण भाजपासोबत येण्यास सध्या इच्छुक नाहीत, अशांना काँग्रेसकडे वळवण्यात देखील संघाने महत्त्वाची भूमिका बजावली असे बोलल्या जाते. आता केरळमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे आता इथे संघ कार्य जास्त वेगाने पुढे जाऊ शकेल आणि २०३१ च्या निवडणुकीत चित्र बऱ्यापैकी बदललेले दिसेल असे जाणकारांचे मत आहे. 

आज कर्नाटकात तुलनात्मक स्थित्या दृष्ट्या परिस्थिती बरीच चांगली आहे. तिथे काही काळ भाजपची सत्ता देखील राहिली आहे. जवळजवळ नऊ वर्ष कर्नाटकचे के सुदर्शन संघाचे सरसंघचालक होते. आजचे सरकार्यवाह देखील कर्नाटकातीलच आहेत. राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का या देखील कर्नाटकातीलच आहेत. तिथे संघाचे नेटवर्क वेगाने उभे केले जात आहे. त्यामुळे पुढल्या काही वर्षात कर्नाटक हे भाजपच्या ताब्यात येऊ शकते असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. 

आंध्र आणि तेलंगणा ही दोन राज्य देखील मुस्लिम बहुलच आहेत. अर्थात तरीही तिथे संघाने काम उभे केले आहे. त्यामुळे तिथे भाजपची स्थिती केरळ इतकी वाईट नाही. या दोन्ही राज्यात संघाचेही नेटवर्क उभे होत आहे. संघ आणि भाजप यांचे काम परस्पर पूरक आहे. संघ दैनंदिन शाखातून वैचारिक पायाभूत सुविधा उपलब्ध करत असतो आणि त्या पायाभूत सुविधांच्या जोरावर भाजप पुढे जात असतो. त्यामुळे आज एकूणच दक्षिण भारतात संघ पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे आणि अशीच परिस्थिती राहिली तर पुढल्या दहा वर्षात या सर्वच राज्यांमध्ये भाजप सत्तेचा दावेदार बनलेला असू शकतो. आज देशातील ७८ टक्के भूभागावर भाजपची सत्ता आहे. शतप्रतिशत भाजप व्हायचे असेल तर संघाच्या पायाभूत सुविधा आणि त्यावर भाजपची संघटनात्मक बांधणी या दोन्हीच्या जोरावरच हे शक्य होऊ शकेल. 

अर्थात हे माझे मत झाले....

 आपणही आपली परखड मते मांडू शकता..... 

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.