माझंही मत... अखेर उद्धवपंतांनी आपली इज्जत वाचवली.

माझंही मत...

अखेर उद्धवपंतांनी आपली इज्जत वाचवली.


महाराष्ट्र विधान परिषदेच्या विधानसभा सदस्यांनी निवडून द्यायच्या ९ जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत तासाभरापूर्वीच संपलेली आहे. या ९ जागांसाठी फक्त ९च उमेदवार रिंगणात राहिल्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल हे नक्की झाले आहे. या निवडणुकीचे एकच वैशिष्ट्य म्हणता येईल की शिवसेना पक्षप्रमुख उद्धवपंत ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज न भरता आपले एक विश्वासू चेले अंबादास दानवे यांना संधी दिली आहे. माझ्या मते २०१४ पासून गत बारा वर्षात उद्धवपंत ठाकरे यांनी पहिल्यांदाच राजकीय शहाणपणाचा निर्णय घेतलेला आहे.

शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक पथ्य पाळले होते. ते म्हणजे सत्ता द्यायची ती शिवसैनिकाला, मात्र ठाकरे परिवारातल्या कोणालाही सत्तेचे कोणतेही पद द्यायचे नाही. त्या परंपरेला त्यांचेच सुपुत्र उद्धवपंत ठाकरे यांनी छेद दिला. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी आधी आपला मुलगा आदित्य याला वरळी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवायला उतरवले आणि मग ज्या भाजपसोबत युती करून निवडणूक जिंकली, त्याच भाजपशी आणि महाराष्ट्रातील जनतेशी गद्दारी करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत अभद्र शय्यासोबत केली आणि सत्ता मिळवली. इथपर्यंत ही ठीक होते मात्र शरद पवारांनी त्यांना घोळात घेतले आणि त्यांनाच मुख्यमंत्री केले. मग कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्यामुळे सहा महिन्यात विधान परिषदेचे सदस्य व्हायचे म्हणून ज्या नरेंद्र मोदींशी पंगा घेतला होता त्यांचेच पाय धरून विधानपरिषद सदस्यत्व जमवून घेतले. 

जुलै २०२२ मध्ये उद्धव पंतांचे मुख्यमंत्रीपद गेले. नंतरच्या तीन वर्षात विधान परिषद सदस्य म्हणून ते सभागृहात आपले अस्तित्व निश्चित दाखवू शकले असते. इतकेच काय तर महाराष्ट्रातल्या जनसामान्यांचे प्रश्न देखील सोडवून घेऊ शकले असते. मात्र ते अमावस्या पौर्णिमेलाच फक्त सभागृहात येत राहिले आणि आल्यावर देखील कामात त्यांचा फारसा सहभाग नसायचा. त्यामुळे ते आता पुन्हा सभागृहात न आलेलेच बरे असे जनसामान्यांना वाटू लागले होते. 

मात्र त्याचवेळी उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नेते आहेत, त्यामुळे त्यांनी विधान परिषदेचे सदस्य व्हायलाच हवे, असा कंठशोष उद्धव ठाकरेंचे विश्वासू हीज मास्टर्स व्हॉईस संजय राऊत करत होते. भरीस भर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने देखील जर उद्धव ठाकरे निवडणूक लढणार असतील तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करणार नाही अशी घोषणा केली होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एकच उमेदवार निवडून येण्याची शक्यता होती. त्यामुळे तो उमेदवार उद्धवपंत राहतील अशी हवा तयार करण्यात आली होती. 

मात्र अखेरच्या क्षणी उद्धवपंतांनी शस्त्र खाली ठेवली आणि मैदानातून पळ काढला. त्यांनी अंबादास दानवे यांना पुढे केले. त्यावेळी त्यांना म्हणे आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकू आला आणि शिवसैनिकाला संधी देऊन आपण पक्ष बांधणीसाठी मोकळे राहावे असे त्यांना वाटून गेले. म्हणून त्यांनी निवडणूक लढवायची नाही असा निर्णय घेतला. 

मात्र इथे इनसाईड स्टोरी काही वेगळीच आहे. उद्धवपंत ठाकरे जर उभे राहिले असते तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना किंवा मग भाजप यांच्यापैकी कोणीतरी एकाने एक जास्तीचा दहावा उमेदवार दिला असता आणि शिवसेना आणि काँग्रेस मधली मते फोडून उद्धव ठाकरेंना पाडले असते आणि हा महायुतीचाच नववा उमेदवार निवडून आणला असता. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही उद्धव ठाकरेंना झोपवायला अक्षरशः उतावळे झाले होते म्हणतात. याबाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी २०२२ मध्येच आपण किती घुटलेले पहिलवान आहोत हे सिद्ध केलेले आहेच.

ही बातमी आपल्या खास सूत्रांकडून कळल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी यावेळी माघार घेतली आणि अंबादास दानवे यांना पुढे करायचे ठरवले. जर शिवसेनेचा उमेदवार पाडायचा म्हणून भाजप किंवा शिंदे सेनेने आणखी एक उमेदवार दिला असता तर अंबादास दानवे पडले असते, आणि उद्धव ठाकरेंची झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली असती. म्हणून त्यांनी दानवेंना बळीचा बकरा बनवायला पाठवले होते म्हणतात. 

मात्र दानवे मैदानात आल्यामुळे त्यांना काय पाडायचे म्हणून शिंदे सेना आणि भाजप यांनी दहावा उमेदवार दिला नाही आणि आता निवडणुका बिनविरोध होणार आहेत. एकूणच उद्धवपंतांनी ऐनवेळी माघार घेत आपली उरलीसुरली इज्जत वाचवत आपण राजकीय दृष्ट्या किती परिपक्व आहोत याचा खोटाच आभास निर्माण केला आहे. अर्थात हा आभास किती काळ टिकणार याचे उत्तर काळच देईल. 

वाचकहो हे माझे मत झाले.....

 आपले जे काही मत असेल ते मोकळेपणाने कळवा....

 त्याचे स्वागतच होईल. 

✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.