खलबत्ता:-विनोद देशमुख.बारा(भानगडी)मती(गुंग) पाच-तीन-दोनच्या डावाचे रंग.

 खलबत्ता:-विनोद देशमुख.

बारा(भानगडी)मती(गुंग)

पाच-तीन-दोनच्या डावाचे रंग

-------------------------"बारा गावच्या बारा भानगडी" अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. पण, बारामती हे असं गाव आहे, जेथे एकाच गावात बारा भानगडी आहेत, अन् याचे सूत्रधार आहेत अर्थातच महाराष्ट्राचे ज्येष्ठतम राजकीय नेते शरच्चंद्र गोविंदराव पवार. पूर्वीचे जाणते राजे. सध्याचे लोकनेते. सर्व राजकीय पक्षांमध्ये लागेबांधे ठेवून त्याचा लाभ घेणारे चतुर राजकारणी. बारामती ओळखलंच जातं शरद पवारांच्या नावानं. पुणे जिल्ह्यातील एक तालुक्याचं गाव आज राष्ट्रीय नकाशावर आहे ते केवळ पवारांमुळेच. बारामती उच्चारल्याबरोबर सर्वप्रथम आठवतात शरद पवार. इतकी ही दोन नावं एकमेकात मिसळून गेलेली आहेत, हे कोणालाही अमान्य करता येणार नाही. बारामती म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजे बारामती. बस्स.

तर, अशा या जगावेगळ्या बारामतीत सध्या काय सुरू आहे ? विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार. पवारांचे पहिले वारस अजितदादा (आता वारस सुप्रिया सुळे आहेत) दुर्दैवी अपघातात गेल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. दादांच्या वारस सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानं त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी आणि महायुतीसाठी ही पोटनिवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटासाठीही ती तेवढीच प्रतिष्ठेची होती. कारण, २०२३ मध्ये अजितदादा वेगळे होईस्तोवर बारामती विधानसभा मतदारसंघ पवारकाकांच्या एकसंध राष्ट्रवादीकडेच होता. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा तो काकाकडून पुतण्याकडे गेला. महा विकास आघाडीत ही जागा शप गटाकडे गेल्यानं काकाने उमेदवार दिला अजितदादाचाच पुतण्या युगेन्द्र. (यावेळीही जिंकले काकाच). तेव्हापासून बारामतीवर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा समान दावा आहे. पण-

यावेळी असा दावा करण्यापेक्षा काकांनी  सुनेत्रा पवारांच्याच उमेदवारीला पाठिंबा दिला आणि नातू रोहित पवार यांना प्रचारासाठी नियुक्तही केले. या जागेवर मविआतर्फे हक्क सांगण्याचा प्रयत्न काँग्रेसनं करून पाहिला. पण तो फसला. कारण, पवारकाका आणि उबाठा शिवसेना हे आघाडीचे दोन्ही घटकपक्ष सोबत नाही म्हटल्यावर काँग्रेसचा हास्यास्पद पराभवच झाला असता. आता सुनेत्रा पवार यांची निवडणूक जवळजवळ एकतर्फी होत असल्याचं चित्र आहे. त्यांच्या सोबत भाजपा आणि शिवसेना हे महायुतीचे मित्रपक्षही आहेत. 

असं असताना राष्ट्रवादी (शप) चे रोहित पवार 'काकी'च्या प्रचाराला निघाले आहेत😃 ते कशासाठी ? त्याची गरज आहे का ? हे दोन प्रश्न आपोआपच येतात. कारण, उर्वरित २२ उमेदवारांमध्ये मातब्बर कोणी दिसत नाही. करुणा शर्मा-मुंडे आणि अभिजित बिचुकले हे दोनच नाव घेण्यासारखे प्रतिस्पर्धी आहेत आणि हे दोघेही काय चीज आहे, ते सर्वांना ठावूक आहे. ते धोका करतील याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार निवडून आल्यातच जमा आहेत. मग, विरोधी पक्षाचे रोहित पवार मधे का कुदले ? आता तर प्रचाराच्या दिवशी सुप्रिया सुळे स्वत: वहिनीसाठी मैदानात उतरल्या आहेत. (लोकसभेत याच नणंदेनं याच वहिनीला हरवलं होतं)

बदललेल्या परिस्थितीत पवार कुटुंबीय म्हणून हे लोक मदतीला धावले, असं कोणी म्हणू शकतं. त्यावर प्रश्न- याच सुनेत्रा पवार २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या उमेदवार असताना तर तुम्ही सारे पवार सुप्रिया सुळेच्या पाठीशी होते ना ? (आणि, सर्वांनी मिळून त्यांना हरवलंही.) नंतर यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीतही अजितदादा विरुद्ध युगेन्द्र अशी काका-पुतण्याची लढत पवार कुटुंबानंच घडवून आणली. या दोन्ही वेळचं 'पवार-युद्ध' राजकीय स्वरूपाचं होतं. यावेळी मात्र अजितदादांच्या अचानक अन् अपघाती जाण्यानं परिस्थिती वेगळी आणि भावनिक आहे, असा युक्तिवादही केला जाऊ शकतो. तो बऱ्यापैकी पटतोही.

परंतु, तसं असेल तर, निर्नायकी झालेला अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलीनीकरणाच्या नावाखाली ताब्यात घेण्याच्या हालचाली लगेच का झाल्या ? दादांच्या मुलांना फितवण्याचे आणि त्यांच्या राष्ट्रवादीत संशयाचं वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न का करण्यात आले ? असे प्रश्नही अनेकांच्या मनात आलेले आहेत. त्यांचं उत्तर लोक स्वत:च काढतात, ते असं- "पवार कुटुंब ही कल्पनाच मुळात फक्त राजकीय स्वार्थापुरती असते. स्वार्थ साधत असेल तर सर्व पवार आपले. नसेल तर काही पवार विरोधात गेले तरी चालतील" 

शेवटी काय, शरद पवार गेलं अर्धशतक राजकारण खेळत आहेत आणि त्यांच्या चाली या नेहमीच इतरांची मती गुंग करणाऱ्या असतात. (२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मतमोजणीचा कल पाहून, भाजपानं मागितलेला नसतानाही परस्पर पाठिंबा जाहीर करण्याचा एकतर्फी निर्णय) त्याच धर्तीवर रोहित पवार, सुप्रिया सुळे यांची प्रचारात पेरणी करणं, हीही एक चाल तर नसेल ना, या शंकेचा खुलासा पुढे केव्हातरी होईलच. आजघडीला शरद पवार गटात दोन खासदार अन् एक आमदार आहे आणि सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्री पद आणि एक खासदार आहे. बारामतीच्या निकालातून आणखी एक पवार आमदार निवडून आला की त्यांच्या कुटुंबातील पाच लोकप्रतिनिधी, तीन खासदार आणि दोन आमदार. म्हणजे पाच-तीन-दोनच की हो.

     ✍️ विनोद देशमुख ✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.