मूल मध्ये वर्षानुवर्षांपासून मालधक्का आहेच पण........?
मूल मध्ये वर्षानुवर्षांपासून मालधक्का आहेच पण......?
पत्रपरिषदेत सज्जड इशारा.
मूल: दीपक देशपांडे.
मूलच्या शांततेत बाधा निर्माण करणाऱ्या आणि मूलच्या जनतेच्या आरोग्याशी खेळ करु बघणाऱ्या प्रस्तावित मालधक्क्याला विरोध करीत असतांनाच मालधक्का हटाव संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांसोबत जेलमध्ये जाण्याची वेळ आली तरी आम्ही तयार असणार आहोत पण हा मालधक्का होऊ देणारच नाही,अशी स्पष्ट ग्वाही मूलच्या नगराध्यक्षा एकता समर्थ यांनी पत्रकारांशी फोनवरून बोलताना दिली.
मालधक्का हटाव संघर्ष समितीच्या वतीने मूल येथील विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मूलच्या नगराध्यक्षांना संघर्ष समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात संबंधात मूल नगरपरिषद कोणती भूमिका घेणार याविषयी नगराध्यक्षांचे मनोगत जाणून घेतले असता एकता समर्थ यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.
यापूर्वी मूल येथील जनतेच्या आरोग्याशी खेळ करु बघणाऱ्या *त्या नेत्यांच्या* या आत्मघातकी प्रयत्नांचा संघर्ष समितीच्या वतीने तिव्र शब्दात निषेध करण्यात आला आणि एकंदरीत २०२२सालीच रेल्वे प्रशासनाने आणलेला प्रस्तावित मालधक्का नागरिकांच्या प्रचंड विरोधामुळे मूल पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या केळकर येथे नेण्यात आला असताना *मूलच्या जनतेशी काही घेणे देणे नसणाऱ्या या कथित मोठ्या नेत्यांनी* भाजपच्या कोट्यातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची हार जणूकाही आपल्याच आशीर्वादाने झाली आहे आणि त्यामुळे सत्तेवर असलेले नगरपरिषद पदाधिकारी आपल्याला विरोध करणार नाही या समजुतीने हा डाव टाकला असल्याचाही स्पष्ट आरोप या पत्रपरिषदेत अनेकांनी आपल्या उद्बोधनातून केला आणि त्या नेत्याच्या या कारवाया कशाप्रकारे आपण स्वतः अलिप्त राहून आपल्या चेलेचपाट्यांकडून करीत आहेत याविषयी स्पष्टपणे नाव घेऊन हा आरोप केला आणि कदाचित हा प्रकार शहप्रतीशहाचा प्रकार असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे,खरेतर भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी आखलेला हा या जेष्ठ नेत्यांचा प्रयत्न असू शकतो परंतु मूलच्या नागरिकांनी या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला भाजप स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला दिलेली ही एक धोबीपछाडच होती आणि आता आपल्या निवृत्तीची वेळ येवून गेली असल्याची आणि शांतपणे घरी बसण्याची ती अलिखित सूचनाच होती ,असेही समजायला हरकत नसावी.
यापूर्वी मूल येथील तांदूळ,शांतीकुंज येथे सोयाबीन व तेथील सोयाबीन तेल , आणि एमआयडीसी परिसरात कच्चे लोखंड यांची नेआण करण्यासाठी मूलमध्ये अनेक मालगाडीचे डबे भरले ,उतरवले जात होते यासाठी वापरला जाणारा हा जूना मालधक्काच होता पण तो कुणाच्या जिवीताशी खेळ करणारा मालधक्का नव्हता हेदेखील या संघर्ष समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मूल रेल्वे स्थानकावर प्रस्तावित मालधक्का उभारून सुरजागड येथील लोहखनिजाची देशभर वाहतूक करण्याची योजना सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या योजनेसाठी काही राजकीय नेत्यांकडून मदत केली जात असल्याचा आरोप असून, या पार्श्वभूमीवर “मूल शहर बचाव संघर्ष समिती”च्या वतीने मालधक्का हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहर प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन समितीने केले आहे.
मूल येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला. प्रस्तावित मालधक्का उभारल्यास स्थानिकांना अपेक्षित रोजगार मिळणार नसून, केवळ काही स्वार्थी घटकांना लाभ होणार असल्याचा आरोप करण्यात आला. रोजगाराचे आमिष दाखवून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
मालधक्क्यामुळे मूल शहराला जलप्रदूषण, वायुप्रदूषण व ध्वनीप्रदूषणाच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल. परिणामी, सध्या स्वच्छ आणि विकसित शहर तसेच तांदळाची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेले मूल शहर प्रदूषित शहर म्हणून , आणि श्वसनाच्या आजाराचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
तसेच, दररोज सुमारे ७००ते ८०० अवजड (हायवा) वाहनांची वाहतूक होणार असल्याने अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. सुरजागड परिसरातून होणाऱ्या लोहखनिज वाहतुकीदरम्यान बारीक धूळ आणि रासायनिक घटक हवेत व जमिनीवर पसरून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊ शकते. त्यामुळे परिसर लालसर होण्याची आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
प्रस्तावित मालधक्क्याच्या लगतच कर्मवीर महाविद्यालयाचे सार्वजनिक मैदान आहे. येथे दररोज नागरिक व्यायामासाठी तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात. या परिसरात मालधक्का उभारल्यास अशा उपक्रमांवर परिणाम होऊन नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल.
याशिवाय, बल्लारपूर पब्लिक स्कूल,कर्मवीर महाविद्यालय तसेच पंचायत राज प्रशिक्षण केंद्र या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था मालधक्क्याच्या परिसरात असल्याने त्यांच्यावरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. नवनिर्माण सुरू असलेल्या शासकीय रुग्णालयाचीही इमारत याच परिसरात असून या मालधक्क्यामुळे उपचारासाठी दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णांवर ही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
प्रस्तावित मालधक्का हा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनलगत असून, या परिसरात वाघ, अस्वल, बिबट यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर आहे. हा भाग वन्यजीवांच्या स्थलांतर मार्गाचा (कॉरिडॉर) भाग असल्याने मालधक्का उभारल्यास वन्यजीवांचे नुकसान होण्याची तसेच मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
मूल शहराची स्वच्छ व सुंदर शहर , तांदूळ बाजारपेठ अशी ओळख कायम राहावी यासाठी मूल शहरातून सुरजागड येथील लोहखनिज वाहतुकीसाठी प्रस्तावित रेल्वे मालधक्का तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी ठाम मागणी मूल शहर बचाव संघर्ष समितीने केली आहे. अन्यथा, विविध स्वरूपात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीने दिला आहे.
या पत्रकार परिषदेला समितीचे विशिष्ट पद नसलेले पदाधिकारी, ज्यामधे ॲड .प्रणव वैरागडे ,अनिल मोगरे,जिवन कोंतमवार,संजय पडोळे, प्रशांत समर्थ, दिनेश गोयल,विजय सिद्धावार, ॲड.अश्विन पोलिकर, व अन्य सदस्य नगरसेवक , तसेच मोठ्या संख्येने नानाविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment