खलबत्ता:-बंगालच्या निवडणुकीत 'माछेर झोल'चा झोल.
खलबत्ता:-विनोद देशमुख.
बंगालच्या निवडणुकीत
'माछेर झोल'चा झोल
--------------------- माणूस आणि प्राणी यांच्यात नैसर्गिक नातं आहेच. पण, आपल्याकडील निवडणुकांमध्ये आणि एकूणच राजकारणात सुद्धा हे नातं टिकून आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांना जी चिन्हं दिली जातात, त्यांच्या अधिकृत यादीत २८ प्राणी आहेत. राजकीय पक्षांसाठी १५ प्राणीचिन्हं राखीव आहेत, तर अपक्ष उमेदवारांसाठीच्या चिन्हयादीतही १३ प्राणी आहेत. ते ते उमेदवार त्या त्या प्राण्यांच्या नावानं मतं मागताना आपण पाहतो. पूर्वी बैलजोडी, गायवासरू आपण पाहिले आहेत. हत्ती अजूनही आहे.
प्राण्यांचं नाव घेऊन मजेशीर आणि प्रभावी प्रचारघोषणाही प्रतिभावंत लोक तयार करतात. जसं- "गाय वासरू नका विसरू". १९६२ च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघात ३ प्रमुख उमेदवारांचे चिन्ह होते- धनुष्यबाण, बैलजोडी आणि हत्ती. धनुष्यबाणवाले अपक्ष उमेदवार राजे लाल श्याम शाहच्या पाठीराख्यांपैकी कोणातरी कल्पक कार्यकर्त्यानं घोषणा काढली- "छोडो तीर छोडो बाण, हत्ती-बैल दाणादाण". ती इतकी प्रभावी ठरली की, लाल श्याम शाह 'बाहेरचे' उमेदवार असूनही विजयी झाले.
पण यावर्षी वेगळाच प्रकार घडला. निवडणूक चिन्ह नसलेले मासेच प्रचारात आले, ते मतपत्रिकेवर नाहीत, पण प्रचारात आहेत. ममता बॅनर्जींच्या बंगाल राज्य विधानसभा निवडणुकीत हे मासे सध्या चांगलेच गाजत आहेत. भाजपाचं आक्रमण थोपवून धरण्यासाठी ममताच्या तृणमूल काँग्रेसनं एक घोषणा दिली- "बीजेपी एले, मायेर आमिष भोग होबे तो ?" (म्हणजे, भाजपाचं सरकार आलं तर तुम्ही कालिमातेला मास्यांचा भोग चढवू शकाल का ?) प्रश्न भावनिक आणि मारक्याचा आहे. पण भाजपानंही उत्तराची घोषणा तयार केली- "खेये माछ रातदिन, बीजेपीको व्होट दिन." (मासे रात्रंदिवस बिनधास्त खा अन् भाजपाला मत द्या.) या दोन्ही घोषणांची फलकं जागोजागी झळकत आहेत. मासे कोणाला पावतात, ते ४ मे रोजी निकालातच दिसेल.
तसाही मासे हा प्राणी बंगालचा जीव की प्राण आहे. बंगाली डिशचा तो अविभाज्य घटक आहे. दिवसभरात एकदाही मासे खाल्ले नाही तर बंगाल्यांना झोप येत नाही एवढं बंगाली जीवनात मास्यांना महत्त्व आहे. त्यातही माछेर झोल (म्हणजे मास्यांच्या भाजीचा रस्सा) सर्वांनाच अतिप्रिय असतो. या झोलनंच यावेळच्या निवडणुकीत 'झोल' केला आहे, असं म्हणता येईल.
जिथं ममतादीदी तिथं झोल, हे बंगालच्या राजकारणाचं गेली अनेक वर्षे समीकरण बनलं आहे. २०११ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत त्यांनी "मां, माटी, मानूष" अशी घोषणा दिली होती. त्यावेळी सत्ताधारी डाव्यांनी ममतादीदीच्या पायातील निळ्या स्लिपर्सवर विनाकारण टीका केली अन् त्याच स्लिपरवरून ही निवडणूक डाव्यांविरुद्ध घसरली त्यांची ३४ वर्षांची सत्ता एका क्षणात जमीनदोस्त झाली. तेव्हाचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्यावर स्वत:च्याच माजी मुख्य सचिवांकडून पराभूत होण्याची नामुष्की ओढवली. गेली १५ वर्षे डावे सत्तेबाहेर आहेत आणि विरोधी पक्ष म्हणून निष्प्रभ आहेत. काँग्रेसचीही दयनीय अवस्था आहे.
पहिल्यांदा उत्साहानं मुख्यमंत्री झालेल्या ममतादीदी डाव्यांपेक्षा काही वेगळं वागतील, अशी बंगाली समाजाची अपेक्षा होती. पण हळूहळू त्यांचीही गाडी घसरू लागली. डाव्या पक्षांमध्ये राहून गुंडगिरी करणारे, दहशत माजविणारे लोक तृणमूल कॉंग्रेसमध्ये येऊन आपली पोळी भाजू लागले. बांगलादेशी घुसखोरांचीही त्यात भर पडली. त्यामुळे पूर्वीचे डावे अन् सध्याची तृणमूल यात काही फरकच राहिला नाही. भाजपानं हे सर्व चव्हाट्यावर आणल्यानं ममतादीदी भडकलेल्या आहेत. मुख्यमंत्री असताना उपोषण काय, प्रशासनाचा गैरवापर काय, केन्द्र सरकारशी सतत पंगा घेणं काय, संवैधानिक पदांचा आणि संस्थांचा वेळोवेळी अवमान काय, सारे फंडे वापरून त्यांनी बंगालमध्ये गोंधळ माजविलेला आहे.
एकेकाळी त्यांचेच सहकारी राहिलेले आणि भाजपाचे विरोधी पक्षनेता सुवेन्दु अधिकारी यांची मोठी डोकेदुखी ममतादीदीला आहे. कारण, गेल्यावेळी (२०२१) नंदीग्राम मतदारसंघात ममतादीदीला हरविणाऱ्या अधिकारी यांनी यावेळी थेट त्यांच्याच भवानीपूर मतदारसंघात येऊन त्यांना आव्हान दिलं आहे. बंगाल विधानसभेची ही सर्वाधिक प्रतिष्ठेची लढत आहे. मुख्यमंत्री विरुद्ध विरोधी पक्षनेता असा सामना भारतीय लोकशाहीच्या इतिहासात प्रथमच होत असावा. १९५२ पासून गेल्या ७४ वर्षांमध्ये अशी निवडणूक झाल्याचं ऐकिवात किंवा वाचण्यात नाही. त्यामुळे भवानीपुरात काय होईल, ममतादीदी तरून जातील, चौथ्यांदा मुख्यमंत्री होतील का याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.
++++++✍️ विनोद देशमुख ✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment