माझंही मत... काँग्रेसचा डाऊन फॉल कधीचाच सुरू झालेला....!
माझंही मत...
काँग्रेसचा डाऊन फॉल कधीचाच सुरू झालेला....!
अजित पवारांच्या रिक्त झालेल्या जागेवर घेतल्या जाणाऱ्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सर्वांचेच अपेक्षा होती. मात्र काँग्रेसने तिथे आपले घोडे पुढे दामटले. त्यांनी सुनेत्रा पवारांच्या विरोधात आकाश मोरे नामक उमेदवार रिंगणात उतरवला. त्यामुळे संतप्त होऊन सुनेत्र पवारांचे पुत्र आणि राज्यसभा सदस्य पार्थ पवार यांनी आता काँग्रेसचा डाऊन फॉल सुरू होत असल्याची तीव्र प्रतिक्रिया दिली. परिणामी सर्वच काँग्रेसी नेते संतप्त झाले असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ, नाना पटोले यांनी त्यांना पार्थ पवार यांना कृतघ्न म्हटले आहे. तर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आकाश मोरे यांनी जर राज्य सरकारने अजित पवार यांच्या मृत्यू संदर्भात एफ आय आर नोंदवला तर मी उमेदवारी मागे घेईन अशी घोषणा केली आहे. पार्थ पवारांचे आजोबा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील कथित चाणक्य शरद पवार यांनी देखील अपरिपक्व वक्तव्य म्हटले आहे. सुप्रिया सुळे, रोहित पवार, संजय राऊत या सर्वांनीच पार्थ पवारांवर टीकेची झोड उठवली आहे.
मात्र माझ्या मते पार्थ पवार यांचे काही चुकलेले दिसत नाही. चुकले असलेच तर एकच की काँग्रेसचा डाऊन फॉल आता सुरू होणार असे नाही, तर यापूर्वीच खूप आधी सुरू झालेला आहे. आणि अशा चुका करत राहिले तर काँग्रेस महाराष्ट्रात तरी अजून अजून खड्ड्यात जाणार हे निश्चित आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळजवळ २५ वर्ष या देशावर काँग्रेसची अनिर्बंध सत्ता होती. नंतर हळूहळू काही राज्यांमध्ये काँग्रेसने सत्ता गमावली. मग केंद्रात सुद्धा कधी काँग्रेस तर कधी विरोधी पक्ष असे तळ्यात मळ्यात सुरू राहीले. मात्र २०२४ पासून केंद्रात काँग्रेसचे अस्तित्व अगदी नगण्य म्हणावे असे आहे. २०२४ ते २०२४ या कालखंडात त्यांचे खासदार इतके कमी होते की त्यांना विरोधी पक्षनेतेपद देखील मिळू शकले होते. आज देशात फार थोड्या राज्यांमध्ये त्यांची सत्ता राहिली आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास १९९५ ते १९९९ हा अपवाद वगळता २०१४ पर्यंत महाराष्ट्रात त्यांचीच सत्ता होती. अर्थात १९९१ मध्ये त्यांना स्पष्ट बहुमत मिळू शकले नव्हते. तर १९९९, २००४ आणि २००९ या तीनही वेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुबड्या घेऊन सत्तेत यावे लागले होते. २०२४ मध्ये तर त्यांना विधानसभेत फक्त जागा मिळवता आल्या आहेत. यापूर्वी १९७२ मध्ये काँग्रेसला २२४ जागा मिळाल्या होत्या. आता नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये त्यांची पुरती दाणादाण उडालेली आहे. ही आकडेवारी बघता काँग्रेसचा डाऊन फॉल कधीचाच सुरू झाला आहे असा निष्कर्ष काढता येतो.
दिवंगत अजित पवार हे महाराष्ट्राचे एक दिग्गज असे नेते होते. त्यांनी १९९१ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः विधिमंडळात आपले स्थान निर्माण केले होते. २८ जानेवारी २०२६ रोजी त्यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांनी धीरोदात्तपणे तीनच दिवसात स्वतःला सावरून पक्षाची सूत्रे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री पद हातात घेतले. आता दादांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा पवार उमेदवार म्हणून उभ्या आहेत. साधारणपणे अशा परिस्थितीत जर कुटुंबातील कोणी उभा राहणार असेल, तर सर्वच पक्षांनी समंजसपणा दाखवून त्यांना बिनविरोध निवडून आणणे हे उचित ठरते. यापूर्वी महाराष्ट्रात असे काही प्रसंग घडलेले आहेत.
यावेळी देखील सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून आणले जाईल अशी सर्वांचीच अपेक्षा होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सुरुवातीलाच सुनेत्रा पवार उभ्या राहणार असतील तर आम्ही त्यांना जुने सर्व काही विसरून पाठिंबा देऊ असे घोषित केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा महाविकास आघाडीचा घटक आहे. महाविकास आघाडीचे दुसरे घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने देखील सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. मात्र ऐनवेळी काँग्रेसने तिथे उमेदवार उभा करण्याचा हट्ट धरला. हे कुठेतरी खटकणारेच होते. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला देखील हे कुठेतरी खटकलेले जाणवते आहे. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हट्टा मुळे काँग्रेसने उमेदवार उतरवला. परिणामी आता निवडणूक होणार हे चित्र आज तरी दिसते आहे. उद्या कदाचित अर्ज माघारीच्या वेळी काँग्रेसने अर्ज मागे घेतला तर गोष्ट वेगळी. अन्यथा निवडणूक अटळ आहे.
या प्रकारामुळे संतप्त होऊन पार्थ पवार यांनी काँग्रेसचा डाऊन फॉल सुरू झाला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसला मिरच्या झोम्बणे सहजीक आहे. मात्र त्यांनी ही निवडणूक टाळली असते तर त्यात त्यांचा मोठेपणा दिसला असता, आणि जनसामान्य मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या बाजूने उभे राहिले असते.
इथे आणखी एका प्रसंगाची आठवण द्यावीशी वाटते. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महिनाभरातच भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले. त्यावेळी लगेचच झालेल्या पोटनिवडणुकीत जर मुंडे परिवारातून कोणी भाजपचा उमेदवार म्हणून उभा राहिला तर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात उमेदवार उभा करणार नाही अशी घोषणा शरद पवारांनी केली होती. त्यांनी आपला शब्द पाळला. मात्र काँग्रेसने तिथेही आपली अकड दाखवली होतीच. काँग्रेसने गोपीनाथजींची कन्या प्रीतम मुंडे यांच्या विरोधात उमेदवार दिला होता. मात्र त्याला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
आताही तेच होणार आहे. यामुळे आधीच जनमानसातून उतरलेली काँग्रेस अजूनच लोकांच्या मनातून उतरणार आहे. परिणामी काँग्रेसचा आधीच सुरू झालेला डाऊन फॉल आता अधिक गतीने होईल हाच निष्कर्ष काढता येईल असे माझे तरी मत आहे.
✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment