आठवलं ते सांगितलं... आठवणी आशाताई भोसलेंच्या...
आठवलं ते सांगितलं ...
आठवणी आशाताई भोसलेंच्या...
काल दुपारी एकच्या सुमारास टीव्ही ऑन केला आणि बातम्या लावल्या पहिलीच बातमी आशा भोसले यांच्या निधनाची होती. परवा त्यांना हृदयविकाराच्या धक्क्यामुळे ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले असल्याची बातमी होतीच. आज त्या गेल्याची बातमी आली.
आशाताई या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका म्हणून विख्यात होत्या. पद्मविभूषण सारख्या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात देखील आले होते. त्यामुळे एरवी सामान्य माणसाला त्यांच्यापर्यंत पोहोचणे कठीण होते. मात्र पत्रकारितेत असल्यामुळे चार-पाच वेळा त्यांच्या भेटीचा योग आला. दरवेळेच्या त्या आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत.
मला आठवते १९९४ मध्ये अटलबहादुर सिंह नागपूरचे महापौर असताना त्यांनी सर्व मंगेशकर भावंडांना नागपुरात आमंत्रित केले होते. त्यांचा महापालिकेत जाहीर सत्कार देखील करण्यात आला होता. त्यावेळी त्यांचा मुक्काम काही काळ नागपूरच्या तत्कालीन नगरसेविका आणि प्रख्यात समाजसेविका कुंदाताई विजयकर यांच्याकडे होता कुंदाताईंनी आम्हा काही मोजक्याच पत्रकारांना त्यांच्या घरी निमंत्रित केले होते. तेव्हा एक अर्धा तास लतादीदी आशाताई उषाताई या सर्वांच्या भेटी झाल्या होत्या. लता दीदी आणि उषाताई या मोजक्याच बोलल्या. पण आशाताईंनी मात्र अगदी मनमोकळ्या गप्पा सर्वांशी मारल्या होत्या. त्यांचे ते मनमोकळे हास्य आजही मला आठवते.
महापालिकेत झालेल्या जाहीर सत्कारात महापौर सरदार अटलबहादुरसिंह यांनी जोरदार शेरोशायरी केली. त्याला प्रतिसाद देत आशाताई म्हणाल्या "यह सरदार का काम तो बडा जोरदार है, इसे बार बार मिलनेमेही मजा आयेगा." त्यांच्या या बोलण्याला उपस्थितांनी जबरदस्त दाद दिली होती.
त्यानंतर १९९७ मध्ये सपत्निक कोल्हापूरला गेलो होतो. आम्ही पोहोचलो त्याच रात्री लतादीदींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही महालक्ष्मी मंदिरात अभिषेकासाठी म्हणून गेलो होतो. आम्ही अभिषेकासाठी तयार झालो. मी पितांबर नेसून गाभाऱ्याकडे गेलो. अचानक एकदम सुरक्षारक्षकांच्या शिट्या वाजू लागल्या आणि गर्दी बाजूला हटवली गेली. दोन-तीन फोटोग्राफर कॅमेरा सावरत उलटे धावत होते. काय होते आहे हे बघितले, तर समोर लता दीदी आणि त्या पाठोपाठ आशाताई उषाताई या सर्वच येत होत्या. लतादीदींना महाराष्ट्र भूषण मिळाला म्हणून त्या दिवशी आमच्या सोबत त्या देखील महालक्ष्मीला अभिषेक करणार होत्या. लतादीदी गाभाऱ्यात आल्या आणि माझ्याकडे बघून स्मितहास्य केले. त्या पाठोपाठ आशाताई देखील आल्या. त्यांनी देखील स्मितहास्य केले. त्यांना मी नागपुरात भेटलो असल्याची आठवण दिली. त्या लगेचच एकदम "अरे वा खूप दिवसांनी आपण भेटलो आहोत" असे म्हणून पुन्हा मोकळ्या हसल्या. तितक्यात देवळातल्या दादर्णे गुरुजींनी आवाज दिला म्हणून आम्ही अभिषेकासाठी गेलो. दरम्यान लताताईंनी लतादीदींनी संकल्प सोडला आणि वर्णी देऊन त्या आणि आशाताई सर्वच निघून गेले. मी मात्र पूर्ण अभिषेक करायला थांबलो होतो.
त्यानंतर लगेचच महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा नागपूरातच आयोजित करण्यात आला होता. त्याला देखील सर्वच मंगेशकर कुटुंबीय आवर्जून आले होते. तेव्हाही कार्यक्रम संपल्यावर आशाताईंची भेट झाली होती. मात्र ती ओझरतीच होती.
२००० साली महाराष्ट्र सरकारने पेडर रोड परिसरात एक फ्लाय ओव्हर उभारण्याचा निर्णय घेतला होता. तो तिथे झाला असता तर त्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या फ्लॅट धारकांना चांगलाच त्रास झाला असता. फ्लाय ओवरच्या बाजूलाच कृष्णकुंज हे लतादीदींचे निवासस्थान होते. त्यामुळे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्र्यांना भेटायला त्या परिसरातील नागरिकांसह लतादीदी, आशाताई, किरण शांताराम असे अनेक दिग्गज आले होते. मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर लतादीदींनी काही काळ अध्यक्षांच्या गॅलरी गॅलरीत बसून विधानसभेचे कामकाज पाहिले. मग ही सर्वच मंडळी पत्रकार कक्षात आली, आणि तिथे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी विधिमंडळाचे अधिवेशन कव्हर करायला मी देखील मुंबईत राहत असे. ही खाशी मंडळी प्रेस रूममध्ये येणार कळल्यावर आम्ही सर्वांनीच तिथे गर्दी केली होती. लतादीदी आणि आशाताईंनी कोणत्या प्रश्नासाठी त्या इथे आल्या आहेत ती माहिती दिली. त्यानंतर आम्हा पत्रकारांचे प्रश्न सुरू झाले. माझ्या सवयीनुसार मी एक दोन खोचक प्रश्न विचारले. त्याला लतादीदींनी आणि किरण शांताराम यांनी उत्तरही दिली. पत्र परिषद संपवून निघताना आशाताई मला बोलल्या "तुम्ही चांगलेच खोचक प्रश्न विचारत आहात" त्यावर माझ्यासह सर्वच पत्रकार चांगलेच हसले होते.
माझ्या आठवणीनुसार बहुदा २००८ किंवा ०९ मध्ये आशा भोसले यांचा नागपूरच्या यशवंत स्टेडियम वर जाहीर कार्यक्रम झाला होता. आदल्या दिवशी नागपुरात येऊन त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली होती. हॉटेल सेंटर पॉईंट मध्ये झालेल्या या भेटीच्या वेळी मी होतोच. त्यादिवशी पत्रकारांशी बोलताना आशाताई चांगल्याच खुलल्या होत्या. मात्र त्याच दरम्यान सुरेश भटांची आठवण झाली तेव्हा त्या अगदी भावूक झाल्या होत्या. पत्र परिषदेनंतर पत्रकारांसोबत बसून त्यांनी स्नेहभोजन देखील घेतले होते.
दुसऱ्या दिवशी यशवंत स्टेडियमवर झालेल्या जाहीर कार्यक्रमात देखील मी उपस्थित होतो. या कार्यक्रमाला विधान परिषदेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते नितीन गडकरी, खासदार दत्ता मेघे, आमदार सतीश चतुर्वेदी असे सर्वच राजकीय दिग्गज उपस्थित होते. निवेदन करणारे सुधीर गाडगीळ यांनी या सर्वांचा उल्लेख केला. त्या काळात मुंबईत ५६ फुल उभारणारे म्हणून नितीन गडकरींचे नाव झाले होते. आशा भोसले गाण्यापूर्वी बोलायला लागल्या, तेव्हा त्या म्हणाल्या, "गडकरी साहेब आले आहेत असं सांगितलं, त्यांचं स्वागत, आणि हो मुंबईत माझ्या घरासमोर सुद्धा एखादा पूल बांधून द्या हो, गडकरी साहेब" त्यांच्या या टिप्पणीवर नागपूरकरांनी जोरदार टाळ्या वाजवून दाद दिली होती. कार्यक्रम संपल्यावर देखील मी सुधीर गाडगीळसोबत त्यांना भेटून आलो होतो.
ती माझ्या आयुष्यातली शेवटची भेट ठरली. त्यानंतर त्यांच्याशी भेटण्याची संधी कधीच मिळाली नाही, आणि आज त्या गेल्याची बातमी आली. मात्र त्यांच्या ज्या काही मोजक्याच भेटी झाल्या त्यातल्या आठवणी आजही तितक्याच ताज्या आहेत...
आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.
✍️अविनाश पाठक , नागपूर.✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment