शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची एक्केचाळीसावी बैठक संपन्न

 शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची एक्केचाळीसावी बैठक संपन्न

मूल : दीपक देशपांडे.

 कृषी  महाविद्यालय मूल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची एक्केचाळीसवी बैठक दिनांक २१ एप्रिल, २०२६ बुधवार रोजी सायंकाळी ६.०० वाजता मौजा मोरवाही ता. मूल जि. चंद्रपूर  येथे  महाविद्यालयाचे *सहयोगी अधिष्ठाता, डॉ. व्ही. जी. अतकरे* यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या प्रसंगी मोरवाही येथील शेतकरी बांधव तसेच कृषि महाविद्यालय, मूल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यतेने *खरीप पिकांसाठी पूर्वनियोजन व व्यवस्थापन* या विषयावर चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी डॉ. व्ही. जी. अतकरे, सहयोगी अधिष्ठाता कृषि महाविद्यालय, मूल यांनी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना खरीप पिकांचे वेळेवर व योग्य नियोजन करून शेतीसाठी आवश्यक पिकांची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार जमिनीची पूर्वतयारी, बियाण्यांची बिजप्रक्रीया व आवश्यक कृषि निविष्टांची तयारी करून ठेवणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी संबधित विविध विषयावर साधक-बाधक चर्चा करण्यात आली. तसेच महाविद्यालयात विक्रीस उपलब्ध असलेले गांडूळखत व गांडूळखत अर्कपाणी यांचा वापर करून पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होते. याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले.

  डॉ. रमाकांत गजभिये, प्राध्यापक, उद्यानविद्या यांनी शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीसोबतच फणस, शेवगा व सीताफळ यांसारख्या बहुपयोगी फळ झाडांची लागवड करावी, या झाडांपासून दीर्घकाळ नियमित उत्पन्न मिळू शकते. फणसाच्या फळांना तसेच शेवगाच्या शेंगा, पाने व बियांना बाजारात चांगली मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसोबत अतिरिक्त आर्थिक स्त्रोत निर्माण होऊन इतर खर्च भागवण्यास मदत होऊ शकते. विशेष म्हणजे अतिशय कमी खर्चात व व्यवस्थापनात सुद्धा या फळ झाडांची लागवड केली जाऊ शकते. याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. विशाखा डोंगरे, मृदविज्ञान विषयतज्ञ यांनी माती परीक्षण व खतांचा योग्य प्रमाणात वापर याविषयी माहिती दिली तसेच मातीपारीक्षणामुळे सध्यास्थितीत जमिनीत असलेल्या अन्द्रव्याची उपलब्धता समजते व त्यानुसार रासायनिक व सेंद्रिय खतांचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. उन्हाळ्यामध्ये जमिनीला नांगरणी केल्यास जमिनीचा वरचा थर भूसभूसित होऊन पाऊसाळ्यात पडणारे पाणी जमिनीत खोलवर झिरपण्यास मदत होते व जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. डॉ. गीतांशु डिंकवार, वनस्पतीरोगशास्त्र विषयतज्ञ यांनी ३% मिठाच्या द्रावणाची व ट्रायकोडर्मा यांची बीजप्रक्रिया करावी त्यासोबत धानावर येणाऱ्या रोग व किडीचे व्यवस्थापन कसे करावे यावर चर्चा केली. कृषिविद्या विषयतज्ञ श्री. देवानंद कुसुंबे  यांनी बोरू लागवड तंत्रज्ञान विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. अमरदीप डेरे, कृषिअभियांत्रिकी विषयतज्ञ यांनी शेतीमधील यंत्र पद्धती व महत्व याबद्दल मार्गदर्शन  केले.    

सदर कार्यक्रमास एकुण २६ शेतकरी व ६ शास्त्रज्ञ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार डॉ. गीतांशु डिंकवार यांनी मानले.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


                                                                                                                                                                   

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.