आयुष्यातले सांगाती ५० ,डॉ. प्रमोद कोलवाडकर.
आयुष्यातले सांगाती ५०

डॉ. प्रमोद कोलवाडकर.
डॉ. प्रमोद कोलवडकर यांना मी ओळखू लागलो ते मध्य भारतातील आघाडीचे क्ष किरणातज्ञ म्हणून. नागपुरात वर्धा रोडवर लोकमत भवन च्या बाजूला त्यांचे सुसज्ज असे एक्स-रे क्लिनिक होते. त्यालाच जोडून त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. मंगला कोलवाडकर यांचे मॅटरनिटी आणि नर्सिंग होम देखील होते. त्या रस्त्याने येता जाता त्यांच्या क्लिनिकची पाटी अनेकदा बघायचो, मात्र प्रत्यक्ष परिचय झाला तो १९८० मध्ये.
डॉ कोलवाडकर हे जसे क्ष किरण तज्ञ आहेत, तसेच चांगले बॅडमिंटन पटू देखील आहेत. १९८० मध्ये नागपुरात बॅडमिंटनच्या अखिल भारतीय टूर्नामेंट्स होणार होत्या. डॉ. कोलवाडकर आयोजकांपैकी एक होते. त्याच दरम्यान दूरदर्शन ने राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या वृत्तछाया चित्रकारांचे एक पॅनल तयार केले होते. या पॅनलमध्ये विदर्भातून निवडला गेलेला मी एकटाच छायाचित्रकार होतो. सहाजिकच माझ्या पत्रकार मित्रांनी हे वृत्त सर्व स्थानिक वृत्तपत्रांमध्ये कौतुकाने प्रकाशित केले. ते वाचून एक दिवस डॉ. कोलवाडकरांचा मला फोन आला. त्यांनी माझे अभिनंदन केले आणि मला त्यांच्या क्लिनिकमध्ये कॉफी प्यायला बोलावले.
ठरल्यानुसार मी त्यांच्या क्लिनिकमध्ये एका संध्याकाळी कॉफी प्यायला म्हणून गेलो. त्यांचे चेंबरमध्ये शिरताच त्यांचे व्यक्तिमत्व पाहूनच मी भारावलो एक प्रतीथयश क्ष किरणतज्ञ म्हटल्यावर त्यांचा चेंबर मध्ये बसतानाचा नीटनेटका पोशाख हा तर होताच, पण त्याचबरोबर त्यांच्या देखण्या चेहऱ्यावरचे त्यांचे कायम असलेले स्मितहास्य मला चांगलेच सुखावून गेले. तिथे सुमारे अर्धा तास आमच्या छान गप्पा झाल्या. त्या दरम्यान त्यांच्याकडे येणारे पेशंट्स होतेच. त्यातही ते माझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारत होते. त्यामुळे पहिल्याच भेटीत मी त्यांच्या प्रेमात पडलो होतो.
त्याचवेळी मग त्यांनी बॅडमिंटन टूर्नामेंट्स दूरदर्शनसाठी कव्हर करण्याबाबत देखील विषय माझ्याजवळ काढला. मी दूरदर्शनला तसा प्रस्तावही पाठवला आणि माझ्या आठवणीनुसार आम्ही त्याचे वृत्त संकलन देखील केले होते. त्यावेळी डॉ. कोलवाडकरांचा अधून मधून संपर्क येत राहिला होता.
मग हळूहळू कार्यक्रमानिमित्ताने आमच्या भेटीगाठी होऊ लागल्या. भेटलो की गप्पांची देवाण-घेवाण देखील होत होती. मात्र आमचे संबंध अधिक दृढ व्हायला १९८३ उजाडले.
१९८३ मध्ये माझे आणखी एक स्नेही डॉ. विनय वाईकर यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून उर्दू गजलांमध्ये येणाऱ्या शब्दांचा उर्दू हिंदी इंग्रजी मराठी असा शब्दकोश तयार केला होता. त्यांच्या या कामाबद्दल माहिती मिळाल्यावर मी त्यांचा मुंबई दूरदर्शनवर एक कार्यक्रमाही आयोजित केला होता. त्याच दरम्यान त्यांच्या याच शब्दकोशाचा प्रकाशन समारंभ नागपुरात पार पडला. कोलवाडकर आणि वाईकर फॅमिली चे कनिष्ठ संबंध होते. त्यामुळे मग माझा आणि कोलवाडकरांचा संबंध अधिकच दृढ झाला. नंतरच्या काळात वाईकरांकडे होणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्यक्रमांमध्ये मला निमंत्रण मिळू लागले. तिथे दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचे डॉ. प्रमोद कोलवाडकर देखील उपस्थित असायचे. त्याच्यासोबत मग डॉ. श्रीकांत चोरघडे, नरेश गद्रे, अशोक पटवर्धन असे अनेक मित्र तिथे गोळा होत असत, आणि मग सगळ्यांच्याच हास्यविनोद आणि गप्पा नेहमीच चालत असत. डॉ. विनय वाईकर, डॉ. श्रीकांत चोरघडे या मंडळींवर मी दूरदर्शनवर कार्यक्रम देखील आयोजित केले होते. ते बघून कोलवडकरांचा मला लगेचच फोन यायचा. एरवीदेखील आमचा संपर्क होतच होता. माझ्या आठवणींचा नुसार १९८७ किंवा ८८ मध्ये त्यांच्या थोरल्या मुलीचे लग्न झाले. तेव्हा देखील मला आवर्जून निमंत्रण होते. त्यावेळी मी तिथे गेलो देखील होतो.
१९९० नंतर काही कारणाने आमच्या भेटीसाठी जरा कमी झाल्या. मात्र कधीमधी फोनवर बोलणे झाले किंवा प्रत्यक्ष भेट झाली तर सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळायचा. १९९४ मध्ये माझी पत्नी अनुरुपाच्या कानाचा काही प्रॉब्लेम झाला होता. त्यावेळी डॉ. अविनाश बारलिंगेने तिच्या कानाचा एक्स-रे काढायला सांगितला होता. म्हणून मग आम्ही दोघेही कोलवाडकरांच्या एक्स-रे क्लिनिक मध्ये गेलो होतो. तिथे देखील त्यांचा नेहमीप्रमाणे दिलखुलास स्वभाव उफाळून येत होता. कानाचा एक्स-रे काढायचा तेव्हा अनुरूपाला गळ्यातले मंगळसूत्र काढायचे होते. मग थट्टेत डॉ. कोलवाडकर मला म्हणाले "चल तू आता मंगळसूत्र काय आणि मग पुन्हा एकदा घालून दे, म्हणजे लग्नातल्या प्रसंगाची तुम्हा दोघांनाही चांगली आठवण होईल. त्यांच्या या बोलण्यावर अनुरुपा मात्र चांगलीच लाजली होती.
असाच एकदा वडिलांचा कंबरेचा एक्स-रे काढायचा म्हणून मी कोलवाडकरांकडे गेलो होतो, तर एकदा आईच्या एक्स-रे साठी सुद्धा त्यांच्याकडे गेलो होतो. आईचा एक्स-रे काढला, तेव्हा ती बेड रिडनच होती आणि झोपून राहिल्याने हाडे ठिसूळ झाली होती, आणि बऱ्याच ठिकाणी क्रॅक्स गेल्या होत्या. आईला एक्स-रे टेबलवर घेताच डॉ. कोलवाडकर नेहमीप्रमाणे थट्टेत म्हणाले "काय काकू मुलगा सून त्रास बीज देत नाहीत ना, देत असेल तर सांगा, मी रागावतो अविनाशला." त्यावर आईने अविनाश आणि सुनबाई चांगली सेवा करतात, असे सांगताच डॉ. कोलवडकरांनी लगेचच तसे ते दोघेही छानच आहेत असे म्हणून दादही दिली होती.
आपल्या क्लिनिकमध्ये भेटायला आल्यावर प्रत्येकाला अगदी पेशंटला सुद्धा आवर्जून कॉफी पाजणे हा त्यांचा आवडता छंद होता. एकदा त्यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना मी हा किस्सा सांगितला, आणि असे डॉक्टर फार कमी मिळतात हे देखील नमूद केले होते. योगायोगाने दुसऱ्याच दिवशी डोळे तपासण्यासाठी मी डॉ. महात्मेंच्या क्लिनिकमध्ये गेलो होतो. तिथेही तिथल्या जनसंपर्क अधिकारी महिलेने मला कॉफी ऑफर केली. त्यावेळी मी आदल्या दिवशीच्या भाषणातली आठवणही मी आवर्जून सांगितली होती.
१९९९ मध्ये माझी पत्नी प्रेग्नेंट होती. उशिराने आलेली प्रेग्नेंसी असल्यामुळे आम्ही सर्वच काळजीत होतो. त्यावेळी वेगवेगळे डॉक्टर वेगवेगळी मते देत होते. परिणामी आम्ही चांगलेच कन्फ्युज्ड होतो. सहजच एका कार्यक्रमात डॉ. कोलवाडकर भेटले असताना मी विषय काढला. तर त्यांनी लगेचच मला उद्या सकाळी घरी ये मग बोलू म्हणून सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी गेलो असताना गायनॅकॉलॉजिस्ट असलेल्या त्यांच्या पत्नी मंगलावहिनींना बोलावले आणि माझ्या समस्येवर त्यांचे मत विचारले. त्यांनी मला सर्वकाही सविस्तर समजावून सांगितले आणि काहीही काळजी करू नकोस, देवाचं नाव घे आणि पुढे जा सर्व काही ठीकच होईल असा दिलासा दिला. डॉ. कोलवडकरांनी देखील तेच सांगितले. मग निश्चिंत होऊन मी पुढल्या तयारीला लागलो. योगायोगाने सर्वकाही ठीक होऊन आम्हाला सुदृढ अशी मुलगी झाली. मुलगी जेमतेम सहा महिन्याची असतानाच एका समारंभात कोलवाडकर पती-पत्नी भेटले. तेव्हा त्यांनी आवर्जून चौकशी केली आणि माझ्या मुलीला हातात घेत दोघेही म्हणाले "बघ आम्ही तुला त्यावेळी सांगत होतो, काळजी करू नकोस. खरं झालं की नाही आमचं." मी त्यावर काहीही उत्तर न देता फक्त हसलो होतो.
या दरम्यान डॉ. कोलवाडकर हे जसे रेडिओलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत होते तसेच इतर कामांमध्ये देखील व्यस्त राहत होते. रेडिओलॉजिस्टच्या अखिल भारतीय संघटनेचे ते काही काळ अध्यक्ष देखील झाले होते. त्या काळातही दोन तीनदा माझी त्यांची भेट झाली होती. याच दरम्यान मी मुद्रित माध्यमात पत्रकार म्हणून कार्यरत झालो होतो मी रामटेकच्या गडावरून या नावाने काही काळ नियतकालिक चालवले आणि मग वर्षातून एक दिवाळी अंक काढत होतो. डॉ. कोलवाडकर तो अंक कुठेही बघण्यात आला की आवर्जून फोन करायचे आणि कौतुकही करायचे. त्यावेळी देखील ते मध्य भारतातील आघाडीचे रेडिओलॉजिस्ट म्हणून ओळखले जात होते. त्या व्यस्त ते देखील माझ्यासारख्या मित्राची ते आठवण ठेवायचै.
२००६ च्या सुरुवातीच्या दिवसात तरुण भारतात एक वैद्यकीय कथा वाचण्यात आली. ती काहीशी वेगळी वाटली म्हणून लेखकाचे नाव पाहीले, तर ते डॉ. प्रमोद कोलवाडकर असे दिसले. मी लगेचच डॉक्टरांना फोन केला आणि तुम्ही लेखन कधीपासून करू लागलात असा प्रश्न विचारला. तेव्हा तुम्ही सर्व आजूबाजूला लेखक मित्र आहात म्हणून मी देखील लिहून बघतोय असे गमतीदार उत्तर त्यांनी दिले. मग मी त्यांना यंदाच्या दिवाळी अंकापासून तुम्ही तर आमच्या गडावरून साठी लिहा असा आग्रह धरला. त्यांनी तत्काळ होकारही दिला.
त्याच वेळी डॉ. कोलवाडकरांनी आणखी एक माहिती दिली "अविनाश मी आता साठी ओलांडली आहे. खूप वर्ष आम्ही दोघांनीही प्रॅक्टिस केली. त्यामुळे आता प्रॅक्टिस बंद करायची हा निर्णय घेऊन आम्ही दोघांनीही तो अमलात आणला आहे. म्हणूनच आता मी निवांत आहे, आणि इतकी वर्षाचे लेखनाची मनात जपलेली आवड आता मी पूर्ण करतो आहे." साधारणपणे नोकरीत माणूस साठाव्या वर्षी निवृत्त होतो. मात्र व्यवसायातला माणूस अगदी हातपाय थकेपर्यंत निवृत्त होत नाही. इथे मात्र दोघेही कोलवाडकर पती-पत्नी ते अगदी फिट असताना निवृत्त होऊन उर्वरित आयुष्य एन्जॉय करण्याचा निर्णय घेतला होता. असा निर्णय घ्यायलाही एक धाडस लागते. ते त्यांनी दाखवले होते.
अशी निवृत्ती घेण्यामागे आणखी देखील एक कारण असल्याचे नंतर त्यांनी कधीतरी सांगितले. ते कारण म्हणजे वैद्यकीय व्यवसायात सुरू झालेली कट प्रॅक्टिस. एखाद्या डॉक्टरने पेशंटला एक्स-रे साठी कोलवाडकारांकडे रेफर केले, की त्याला कोलवाडकरांकडून कमिशनची अपेक्षा असायची. इतर एक्स-रे क्लिनिकवाले तसे कमिशन द्यायचे. अशी प्रॅक्टिस करणे कोलवाडकरांच्या तत्त्वात बसत नव्हते. त्यामुळेही त्यांनी प्रॅक्टिस बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
२००६ च्या दिवाळी अंकासाठी मी लेखकांना पत्र पाठवणे सुरू केले. त्यात डॉक्टर कोलवाडकरांना देखील पत्र पाठवले. त्यात माझ्या पद्धतीनुसार लेखकांना आम्ही मानधन देऊच पण तुमची काही विशेष अपेक्षा असल्यास तसे कळवा असे लिहिले होते. लगेचच कोलवाडकरांचे उत्तर आले. अविनाश तुझ्यासारख्या मित्राकडून मानधन घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, मी तुला दरवर्षी दिवाळी अंकासाठी कथा देणार, असे त्यांनी सांगितले आणि त्यावर्षी त्यांनी आवर्जून कथा देखील पाठवली.
२००६ ची दिवाळी अगदी तोंडावर आली असताना माझ्या आईचे निधन झाले. त्यामुळे दिवाळी अंक निघायला बराच उशीर झाला. मात्र डॉ. कोलवाडकर यांची काहीही तक्रार नव्हती. अंक प्रसिद्ध झाल्यावर त्यांचा फोन आला आणि मला दिवाळी अंकाच्या ५० प्रति हव्या आहेत, मी माणूस पाठवतो. तू पन्नास प्रति पाठव आणि त्याचे पैसे किती होतील ते सांग, म्हणजे मी पैसे देखील पाठवतो, असे त्यांनी सांगितले. साधारणपणे एकदम प्रति उचलल्या तर प्रकाशक विकत घेणाऱ्याला काही सवलत देत असतात. तसे सवलतीची रक्कम कापून मी त्यांना पैसे कळवले. मात्र त्यांनी पन्नास प्रतींचे कोणतीही सवलत न घेता पूर्ण पैसे पाठवले होते. तेव्हापासून दरवर्षी ते माझ्याकडून ५० अंक तरी विकत घ्यायचेच आणि मित्रमंडळींमध्ये अंक विनामूल्य वाटत असत.
२००६ चा उशिरा निघालेला हा दिवाळी अंक लगेचच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार घेऊन गेला. हे वृत्त स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास डॉ कोलवाडकरांचा फोन आला आणि थोड्या वेळात मी तुझ्याकडे चहा प्यायला येतो आहे असे त्यांनी सांगितले. ते दररोज सकाळी बॅडमिंटन खेळायला जायचे. त्या दिवशी बॅडमिंटन खेळूनच ते माझ्या घरी पोहोचले. येताना एक पुष्पगुच्छ मिठाईचा एक बॉक्स आणि एक सेंट ची बॉटल घेऊन ते आले होते. इतक्या अडचणीतूनही तू दिवाळी अंक काढला आणि त्याने पुरस्कार घेतला म्हणून तुझे कौतुक करायला मी आलो आहे, असे सांगून त्यांनी पुष्पगुच्छ आणि मिठाई माझ्या हातात दिली. मग थोडा वेळ बसून चहासोबत आमच्या गप्पाही रंगल्या होत्या. त्यानंतर जेव्हा जेव्हा माझ्या दिवाळी अंकाला पुरस्कार मिळाले तेव्हा तेव्हा डॉ. कोलवाडकर आवर्जून घरी येऊन अभिनंदन करून जात असत.
घरी भेटायला आल्यावर किंवा काही निमित्ताने बोलावल्यावर देखील कधी मिठाई कधी सुखामेवा तर सोबत काही एखादी सेटची बॉटल अशी भेटवस्तू आणणे हा देखील त्यांचा एक आवडीचा छंद आहे. कधीही ते घरी आले की असे काहीतरी घेऊन येत असतात. त्यांना नाही म्हटले तरी ते कधी ऐकत नाहीत.
२००७ च्या दिवाळी अंकात देखील डॉ कोलवाडकरांची वैद्यकीय कथा आली होती. त्यावर्षी अंक वेळेत निघाला. मग दिवाळीच्या आदल्या दिवशी माझ्या घरीच एका छोटेखानी समारंभात ख्यातनाम मराठी कादंबरीकार आशाताई बगे यांचे हस्ते दिवाळी अंकाचे आम्ही प्रकाशन केले होते. त्यावेळी विंगकमांडर अशोक मोटे, प्रख्यात साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, चित्रकार भाऊ दांदडे असे काही निवडक मित्र उपस्थित होते. यावेळी देखील कोलवाडकरांनी आधीच मला पन्नास प्रति हव्यात म्हणून कळवले होते. आणि ५० प्रतींचे पैसे देखील घरी पाठवून दिले होते. मग त्या दिवशी या कौटुंबिक समारंभात आशाताईंच्याच हस्ते डॉ. कोलवाडकरांना आम्ही ५० पुस्तकांचा अंकांचा गठ्ठा सुपूर्त केला होता.
याच दरम्यान डॉ. द.भि. कुळकर्णी मागे लागले म्हणून मी माझा पहिला लेखसंग्रह प्रकाशित केला. त्याचे प्रकाशन विख्यात मराठी साहित्यिक गिरीजा कीर, प्राचार्य राम शेवाळकर, नितीन गडकरी अशा मान्यवरांच्या उपस्थितीत झाले होते. त्या पाठोपाठ आणखीन दोन पुस्तके आणि दिवाळी अंक असे प्रकाशित झाले. त्यावेळी विख्यात मराठी साहित्यिक ह.मो. मराठे आणि खासदार प्रकाश जावडेकर हे उपस्थित राहिले होते. दोन्ही वेळी डॉ. कोलवाडकर आवर्जून कार्यक्रमाला आले. आल्यासारखे पुस्तकांच्या प्रती देखील सोबत घेऊन गेले अशा प्रती विकत घेऊन त्या इतर मित्रांमध्ये वितरित करणे हा त्यांचा आवडीचा छंद आहे. अजूनही तो ते जपत असतात. याशिवाय माझ्या दिवाळी अंकासाठी ते आपले संपर्क वापरून काही जाहिराती देखील जमवून देत असत. त्यांचे चिरंजीव डॉ. नंदू कोलवाडकर हे ऑरेंज सिटी हॉस्पिटलला तज्ञ म्हणून त्यावेळी कार्यरत होते. त्यामुळे दरवर्षी ऑरेंज सिटी ची जाहिरात आम्हाला आवर्जून मिळायची.
दिवाळी अंकाचे प्रकाशन ही अशी तारेवरची कसरतच असते. त्यात माझ्याजवळ पुरेसे मनुष्यबळ देखील नसायचे. जी माणसं कामाला मिळायची ती देखील मन लावून काम करायचीच असे नाही. मात्र महिना पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना पैसा हवा असायचा. दिवाळी अंक काढायचा म्हणजे जाहिराती मिळवाव्या लागायच्या. ते देखील एक दिव्यच असायचे. अनेकदा जाहिराती मिळायच्या, पण नंतर त्याचे पैसे वसूल व्हायचे नाहीत. तोही डोक्याला एक त्रास असायचा. त्याचा परिणाम माझ्या प्रकृतीवर देखील होऊ लागला होता. त्यामुळे २०१० सालचा दिवाळी अंक मी प्रकाशित केला आणि यानंतर दिवाळी अंकांचे प्रकाशन करायचे नाही असा निर्णय घेतला. हा जवळच्या मित्रमंडळींना कळवून देखील दिला. त्यानंतर दोन दिवसांनीच डॉ. कोलवाडकरांचा मला फोन आला. त्यांनी मला प्रश्न विचारला "अविनाश तू हा दर्जेदार अंक प्रकाशित करतोस. त्याला दरवर्षी किती खर्च येतो?" त्याला त्यावेळी मी उत्तर दिले. "मला हजार कॉपीज काढायच्या तर सुमारे दीड लाख रुपये खर्च येतो." त्यावर डॉ. कोलवाडकर म्हणाले मी तुला माझ्याकडून दरवर्षी दहा हजार रुपये देईल आणि तुला असे दहा हजार रुपये देणारे अजूनही काही मित्र शोधून काढीन. काही तू देखील शोध. असे मिळून दरवर्षी आपण दीड लाख जमवायचे आणि दरवर्षी तू दिवाळी अंक काढायचा. तू आम्हाला पैसे परत करायचे नाहीत, तर तू फक्त आम्हाला त्या किमतीच्या प्रती द्यायच्या आणि त्या अंकात जाहिरातींसाठी तू जो पैसा जमावशील तो तुझा असेल. हे सर्व मी तुला मॅनेज करून देतो, पण तू दिवाळी अंक बंद करू नकोस, कारण तू अतिशय देखणा दिवाळी अंक काढतोस. तो बंद व्हायला नको." मात्र या सर्व प्रकारात भविष्यात काय अडचणी येऊ शकतात हे मी त्यांना समजावून सांगितले. मात्र तरीही त्यांचा आग्रह कायम होता. तू अविनाश तू अंक बंद करू नकोस असेच ते शेवटपर्यंत सांगत होते. मात्र मी त्यांचे ऐकले नाही. अजूनही आठवण झाली की ते पुन्हा तू दिवाळी अंक सुरु करतोस का म्हणून आग्रह धरत असतात.
डॉ. कोलवाडकर जसे माझ्या दिवाळी अंकात वैद्यकीय कथा देत होते. तसेच इतर विविध दिवाळी अंकांमध्ये सुद्धा ते कथा पाठवत होते. त्यामुळे त्यांच्या दरवर्षी कथा छापून येत होत्या. मग मी त्यांच्या मागे लागलो आणि त्यांना पहिला कथासंग्रह प्रकाशित करायला आग्रह धरला. त्यानुसार त्यांनी माझ्या आग्रहाला मान देत पहिला वैद्यकीय कथासंग्रह प्रकाशित केला. तो कथासंग्रह चांगलाच गाजला. एव्हाना त्यांच्या वर्षाला बारा ते पंधरा कथा प्रकाशित होऊ लागल्या होत्या. मग मी त्यांना सुचवले की दरवर्षी एक कथासंग्रह प्रकाशित करा. त्यांनी ते मनावर घेतले आणि आता जवळजवळ वर्षाला एक असे त्यांचे वैद्यकीय कथासंग्रह प्रकाशित होत असतात. दरवर्षी मकरंद कुळकर्णीचे साहित्य प्रसार केंद्र त्यांची पुस्तके प्रकाशित करत असते. पुस्तक तयार झाले की एखाद्या रविवारी ते हॉटेल सेंटर पॉइंटला पुस्तक प्रकाशन समारंभ आयोजित करतात. त्यावेळी मोजकीच २५-३० मंडळी तिथे उपस्थित असतात. त्या मंडळींमध्ये मी देखील एक असतो. अतिशय देखणा आणि सुटसुटीत असा हा समारंभ ते दरवर्षी एकदा आयोजित करत असतात. त्याशिवाय इतरही छोटे मोठे समारंभ ते नेहमीच आयोजित करतात. मला आठवते आमचे कॉमन मित्र दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक सुधीर पाठक हे १ सप्टेंबर २०१० रोजी साठ वर्षाचे झाले. त्याच दिवशी ते तरुण भारतातून निवृत्त देखील झाले होते. कोणवाडकारांनी हा मुहूर्त साधला आणि माझ्या आठवणीनुसार ३सप्टेंबरला रात्री मोजक्याच मंडळींना सेंटर पॉईंटला बोलावले आणि तिथे सुधीरचा साठावा वाढदिवस कोलवाडकरांनी स्वतः साजरा केला होता.
त्यांच्या प्रत्येक पुस्तक प्रकाशन समारंभाला मी राहायलाच हवे असा त्यांचा आजही आग्रह असतो. मला आठवते डिसेंबर २०१८ मध्ये माझा स्कूटर एक्सीडेंट झाला होता. मी जवळजवळ महिनाभर घरीच होतो. माझा पाय प्लास्टर मध्ये होता. जानेवारी २०१९ मध्ये कोलवाडकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन ठरले होते. त्यावेळी आठ दिवस आधी डॉ. कोलवाडकर घरी आले आणि तुला कार्यक्रमाला यायचेच आहे असे त्यांनी ठणकावून सांगितले. तुझा ऑर्थोपेडिशन कोण आहे? मी त्याच्याशी बोलतो असे सांगून त्यांनी लगेचच डॉ. राजन यांना फोन केला, आणि मी कार्यक्रमाला अविनाश ला घेऊन जाणार असे सांगितले. कोलवाडकर सरांसारखा सीनियर डॉक्टर जेव्हा म्हणतो आहे तेव्हा मी नाही कसा म्हणणार असे उत्तर डॉक्टर राजन यांनी दिले. मग पुस्तक प्रकाशनाच्या वेळी डॉक्टरांनी घरी गाडी पाठवली आणि मला ड्रायव्हर पुस्तक प्रकाशन समारंभाला घेऊन आला. तिथे उतरल्यावर देखील त्याने मला व्हीलचेअर वरून हॉलमध्ये नेले होते. मला पाहून डॉ. कोलवाडकर चांगलेच आनंदले होते.
तसाच प्रकार गेल्यावर्षी देखील झाला. मी आधी चिकन गुनिया आणि मग मायस्थेनीया ग्रेवीस यामुळे गंभीर आजारी झालो होतो. जवळजवळ सहा महिने आडवाच होतो. डिसेंबर २०२४ मध्ये मी कसाबसा वॉकर घेऊन चालायला लागलो होतो. तेव्हा देखील आठवडाभर आधी डॉक्टर घरी आले आणि मी तुझ्याकडे गाडी पाठवतो आहे, तुला यायचे आहे, असे सांगून गेले. ठरल्याप्रमाणे त्यांनी गाडी पाठवली आणि ते मला प्रकाशन समारंभाला घेऊन गेले. माझ्याशिवाय तुझ्याशिवाय मी प्रकाशन करणार नाही हाच त्यांचा दरवर्षी आग्रह असतो. त्यांच्या प्रेमळ आग्रहाला मला देखील नाही म्हणता येत नाही. असे करत करत गेल्या डिसेंबरमध्ये त्यांचा तेरावा कथासंग्रह प्रकाशित झाला. त्या दिवशी आता लवकरच हा आकडा २५ वर न्या अशा शुभेच्छा सर्वांनीच त्यांना दिल्या होत्या.
त्यांची पुस्तके प्रकाशित व्हायला सुरुवात झाल्यावर मी त्यांना नवलेखकांसाठी होत असलेल्या विविध स्पर्धांची देखील माहिती दिली. मग तिथे ते दरवर्षी पुस्तके पाठवू लागलेत. सुदैवाने त्यांना काही पुस्तकांना चांगले पुरस्कार देखील मिळाले आहेत. त्याचे श्रेय ते बरेचदा मला देतात. अर्थात तिथे मी फक्त निमित्तमात्र ठरलेला असतो. लेखन डॉ. कोलवाडकारांचेच असते हे विशेष.
मित्रमंडळींची काळजी करणे आणि काळजी घेणे हा कोलवाडकरांचा आवडता छंद आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. विंग कमांडर अशोक मोटे हे आम्हा दोघांचेही कॉमन मित्र, मोटेंनी अनेक युद्ध कथा लिहिल्या. मात्र त्यांचे पुस्तक कधीच निघाले नव्हते. २०१९ मध्ये अचानक मोटे खूप आजारी झाल्याची बातमी कळली. ते कोणालाही भेटत नव्हते. हे कळल्यावर डॉ. कोलवाडकर त्यांच्या घरी गेले. एक डॉक्टर या नात्याने त्यांची सर्व प्रिस्क्रीप्शन्स ची कागदपत्रे पाहिली आणि मार्गदर्शन देखील केले. याच आजारात मोटेंचे निधन झाले. त्यावेळी सुधीर पाठक, विनोद लोकरे सारख्या कॉमन मित्रांना हाताशी घेऊन त्यांनी मोटेंच्या असंख्य कथांपैकी काही निवडक कथांचा संग्रह प्रकाशित करायचं ठरवले आणि मग मोटेंच्या पहिल्या स्मृतीदिनाला एका समारंभात या कथासंग्रहाचे प्रकाशन देखील डॉ् कोलवाडकरांनी घडवून आणले होते.
आता डॉ. कोलवाडकरांनी वयाची ८५ वर्षे पूर्ण केली आहेत. आता त्यांची दृष्टी कमजोर झाली आहे. तरीही लेखनाचा उत्साह कायम आहे त्यांनी एक कॉम्प्युटर ऑपरेटर पकडला आहे. त्याला आपले लेखन देतात आणि ते दुरुस्त करून टाईप करण्याचे काम करून घेतात. मध्यंतरी त्यांचा अपघात झाला होता. त्यामुळे आता हिंडण्या फिरण्यावरही मर्यादा आल्या आहेत. तरीही त्यांचे काम सुरूच आहे.
डॉ. कोलवाडकरांचे आवडीचे काम म्हणजे मित्रमंडळींना बोलावून कॉफी घेत त्यांच्यासोबत गप्पा मारणे, त्यांचे आधी जिथे एक्स-रे क्लिनिक होते, तिथे आता त्यांचे चिरंजीव डॉ. नंदू कोलवाडकर यांचे क्लिनिक आहे. मात्र प्रॅक्टिस करत नसले तरी तेथे डॉक्टरांनी आपले एक चेंबर ठेवले आहे. तिथे दुपारी एक ते तीनच्या दरम्यान ते हमखास बसतात. मग तिथे मित्रमंडळींना बोलावून कॉफीपान आणि गप्पा होत असतात.
गेल्या अनेक दिवसांपासून ते मला कॉफी घ्यायला ये म्हणून बोलवत आहेत. मात्र आता मला वाहन चालवायला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे मी फारसा बाहेर जात नाही. दोन दिवसापूर्वीच आमचे फोनवर बोलणे झाले तेव्हा डॉ. कोलवडकर म्हणाले आता एखाद दिवस वेळ ठरवून मी तुझ्याकडे गाडी पाठवतो आणि तुला इथे घेऊन यायला सांगतो, मग आपली कॉफी क्लब मधली बैठक आणि गप्पा जमवू या. त्याला मी देखील होकार दिला आहे, आणि लवकरच डॉ. कोलवाडकर तो योग आणतील याची मला खात्री आहे.
असे हे डॉ. प्रमोद कोलवाडकर आता लवकरच ८६ वर्षाचे होतील. मात्र त्यांच्यात उत्साह तरुणाचा आहे. ते मध्य भारतातील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट, एक सिद्ध हस्तलेखक, आणि सामाजिकदृष्ट्या एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, मात्र तरीही माझ्यासारख्या एका साध्या पत्रकाराची त्यांनी मैत्री जपली आहे हेच त्यांचे विशेष आहे.
✍️अविनाश पाठक , नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment