कर्मवीर महाविद्यालय,मूल येथे जागतिक मराठी भाषा गौरव दिन व पदवी वितरण कार्यक्रम संपन्न.
कर्मवीर महाविद्यालय,मूल येथे जागतिक मराठी भाषा गौरव दिन व पदवी वितरण कार्यक्रम संपन्न.
दीपक देशपांडे
शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्धारा संचालित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालयात मूल येथे मराठी भाषा गौरव दिन व कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती साजरी करण्यात आली . या प्रसंगी पदवी वितरण सोहळा संपन्न झाला.. त्या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य डॉ.अनिता वाळके यांनी मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीचा आत्मा असल्याचे सांगितले. “भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपल्या विचारांची, परंपरेची अस्मितेची ओळख आहे .माणसाची जडणघडण करणारी शक्ती तिच्यात आहे . मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे ,” म्हणूनच मराठी भाषा अभिजात आहे असे सांगत त्या पुढे म्हणाल्या की, कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित एक प्रभावी कवी, नाटककार, कथाकार आणि कादंबरीकार होते. त्यांच्या लेखनातून सामाजिक अन्यायाविरुद्धचा विद्रोह, मानवी स्वातंत्र्याची ओढ, अस्पृश्यते बद्दलची चिड,नवी सौंदर्यदृष्टी, करुणा आणि राष्ट्रप्रेम प्रकर्षाने दिसते.मराठी ही मायबोली असली तरीही आजच्या जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजीसारख्या जागतिक भाषांचे महत्त्व नाकारता येत नाही; परंतु मातृभाषेतील पायाभूत शिक्षण विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच मराठी भाषेचा अभिमान बाळगूनच विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर स्पर्धा करावी, असे त्यांनी आवाहन केले. पदवी वितरण प्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, पदवी ही केवळ प्रमाणपत्र नसून ती जबाबदारीची जाणीव आहे. समाजाच्या प्रगतीत आपले योगदान देणे, नैतिक मूल्ये जपणे आणि सतत ज्ञानार्जन करणे हीच खरी पदवीची प्रतिष्ठा आहे.असा मौलिक संदेश आपल्या अध्यक्षीय भाषणातून केला.
कर्मवीर महाविद्यालय मूल येथे दि.२७ फेब्रुवारी ला मराठी भाषा गौरव दिन व पदवी वितरण कार्यक्रम घेण्यात आला होता त्या निमित्ताने विचार पिठावर कार्यक्रमांचे उद्घाटक म्हणून लाभलेले राष्ट्रपती महात्मा गांधी महाविद्यालय सावली चे प्राचार्य डॉ.चंद्रमौनी, कार्यक्रम अध्यक्ष प्राचार्या डॉ अनिता वाळके, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले डॉ.कोरतलवार, मराठी विभागप्रमुख व डॉ.इंदुरकर जिवशास्त्र विभाग प्रमुख,ज्ञानेश महाविद्यालय, नवरगाव तसेच प्रा.बनकर सर पर्यवेक्षक व महाविद्यालयीन प्राध्यापक वृंद उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी भाषा संवर्धनाचा संकल्प व्यक्त करत दीपप्रज्वलन व मराठी साहित्यातील वंदनीय ग्रंथाचे पुजन करण्यात आले. व प्रा. भुषण वैद्य यांनी प्रास्ताविकेतून मराठी भाषा गौरव दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विशद करीत कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या साहित्याचा आढावा घेतला .तसेच मराठी ही केवळ भाषा नसून ती संस्कृती, विचार , शौर्य आणि चैतन्य निर्माण करणारी अस्मितेची भाषा आहे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. तसेच पदवी वितरण हा विद्यार्थ्यांच्या परिश्रमांचा सन्मान असल्याचे सांगत त्यांनी सर्व पदवीधरांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक प्राचार्य डॉ.चंद्रमौनी यांनी मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेचा आढावा घेतला. संत तुकाराम, ज्ञानेश्वरांपासून ते आधुनिक साहित्यिकांपर्यंत मराठी साहित्याने समाजाला दिशा दिली आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटले की, शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून व्यक्तिमत्त्व विकासासाठी आहे. विद्यार्थ्यांनी समाजातील प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहावे आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनात सक्रिय भूमिका घ्यावी.तसेच ते पुढे म्हणाले की,मराठी भाषा गौरव दिन साजरा करणे म्हणजे आपल्या सांस्कृतिक मुळांची जपणूक करणे होय, भाषेचे संवर्धन हे प्रत्येक सुशिक्षित नागरिकाचे कर्तव्य आहे, असे महत्वपुर्ण मार्गदर्शन केले.
तसेच प्रमुख अतिथी डॉ. कोरतलवार यांनी कुसुमाग्रज यांच्या साहित्यातील मानवतावादी दृष्टिकोन यावर दृष्टीक्षेप टाकून ’ कणा’ या कवितेचे रसग्रहण केले व बहिणाबाई चौधरी यांच्या अजरामर काव्याची महती विशद करित विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करुन सातत्य, परिश्रम आणि सकारात्मक दृष्टीकोन यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी प्राचीन ते आधुनिक साहित्य हे मानवी मुल्य जोपासणारे असुन दिशादर्शकाचे काम करते. यश संपादनासाठी विद्यार्थात सातत्यपूर्ण परिश्रमाची गरज आहे , यासाठी अपयश आले तरी खचून न जाता त्यातून शिकण्याची वृत्ती ठेवावी. तंत्रज्ञानाच्या युगात कौशल्यविकास आणि सतत अद्ययावत राहणे अत्यावश्यक आहे.मराठी भाषेच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन या क्षेत्रातही मराठी भाषेत लेखन व संवाद वाढवणे गरजेचे आहे. ज्ञानाची मुळे मातृभाषेत रुजली तरच ती अधिक बळकट होतात, असे परखड मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.लोमेश देशमुख यांनी तर आभार प्रा.समीर आलुरवार यांनी केले. मराठी साहित्य प्रेमीनी भाषेचा अभिमान, शिक्षणाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी अंगिकारुन जिवनाची पुढील वाटचाल करावी तसेच पदवीधर विद्यार्थ्यांसाठी हा समारंभ केवळ सन्मानाचा क्षण नसून पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बहुसंख्येने विद्यार्थी व प्राध्यापक वृंद उपस्थित होते महाविद्यालयातील सर्व कर्मचारी वर्गानी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment