सार्वजनिक स्वच्छतेचे अग्रदूत संत गाडगे बाबा यांची १५० वी जयंती. त्यानिमित्त... देवकीनंदन गोपाला...

 सार्वजनिक स्वच्छतेचे अग्रदूत संत गाडगे बाबा यांची १५० वी जयंती,पार पडली त्यानिमित्त...

देवकीनंदन गोपाला...

विनोद देशमुख

महाराष्ट्राच्या थोर संतपरंपरेने समाजसुधारणांना मोठी चालना दिली आहे. प्रत्येक संताने वेगळे योगदान आपल्या परीने, आपल्या पद्धतीने दिले. संत ज्ञानेश्वरांनी जीवनाचे तत्त्वज्ञान काव्यातून सांगितले, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देशाची गुलामगिरी घालविण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले. राष्ट्रसंतांचे समकालीन, त्याच विभागातील (वऱ्हाड) संत गाडगे बाबा यांनी तर थेट कर्मयोग प्रात्यक्षिकासह शिकविला. अंधश्रद्धांवर आसूड ओढण्यासाठी त्यांनी कीर्तनाचा वापर केला, तर स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी स्वत: हातात झाडू  घेऊन गावेच्या गावे झाडत लोकांपुढे उदाहरण ठेवले. 

"आधी केले, मग सांगितले" अशी ही गाडगे बाबांची शिकवण जनमानसाला खूप भावली आणि खेडोपाडचे लोक स्वच्छतेचा मंत्र शिकले. माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. आबा पाटील यांनी तर गाडगे बाबांचे नावच ग्राम स्वच्छता अभियानाला देऊन राज्यातील हजारो गावे स्वच्छ करविली आणि या कर्मयोगी संताला अनोखी श्रद्धांजली वाहिली. सामान्य घरात जन्मून आणि शिक्षणाचा गंध नसतानाही गाडगेबाबा असामान्य कार्य करून गेले आणि सुशिक्षितपणाचा खरा अर्थ सांगून गेले. हे सारेच विलक्षण आहे. 

अमरावती जिल्ह्याच्या शेंडगाव (अंजनगावसुर्जी तालुका) या खेड्यात गाडगे बाबांचा जन्म धोबी कुटुंबात झाला. त्यांचे नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर. त्यांना लहानपणापासूनच स्वच्छतेचे वेड आणि अंधश्रद्धांची चीड. पुढे त्यांनी अख्खा महाराष्ट्रच धुऊन काढला ! जागोजागी शिवलेले कपडे, डोक्यावर उलटे ठेवलेले भिक्षेचे वाडगे, एका हातात खराटा अन् दुसऱ्या हातात गाडगे अशा अवतारात ते गावोगावी फिरायचे आणि स्वच्छतेचा सक्रिय संदेश द्यायचे. अंधश्रद्धांना विरोध, साधी राहणी, सामाजिक समता यांचा प्रचार ते कीर्तनातून करायचे. त्यामुळे डेबूजीला लोक गाडगे महाराज/बाबा म्हणायचे. तेच नाव पडले. आर. आर. आबांच्या योजनेची दखल संयुक्त राष्ट्र संघटनेने घेतल्यामुळे गाडगे बाबांचे नाव जगभर झाले. हे त्यांनी घातलेल्या पायाचे फार मोठे यश आहे. अमरावती विद्यापीठाला त्यांचे नाव दिल्याने तर गाडगे बाबांचे अतिशय उचित, चिरंतन स्मारक तयार झाले आहे.

गाडगे बाबा म्हणजे मूर्तिमंत साधेपणा, गावरान भाषा, अंधश्रद्धांवर आसूड, सामाजिक समतेचा आणि शिक्षणाचा आग्रह, लोकसेवेसाठी सतत धडपड करणारे क्रियाशील संत. प्रत्येक गोष्ट त्यांनी स्वत: आचरणात आणून मगच जनतेला सांगितली. प्राण्यांचा बळी देण्याच्या प्रथेला ते कडाडून विरोध करीत असत. जातींच्या नावाने उच्चनीच भावाची वागणूक त्यांना कधीच मान्य झाली नाही. 

परमेश्वरावर श्रद्धा असूनही देवाचा बाजार भरवण्यावर त्यांनी सडकून टीका केली. प्रामुख्याने गावखेड्यातील बहुजनांसाठी हे सारे समाजप्रबोधन कीर्तनाच्या माध्यमातून ते करीत असत. "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला..." ही त्यांच्या कीर्तनाची, आजच्या भाषेत, सिग्नेचर ट्यून होती ! म्हणूनच, अकोल्याचे प्राचार्य डॅडी देशमुख यांनी गाडगे बाबांवर काढलेल्या पहिल्या चित्रपटाचे नाव सार्थपणे "देवकीनंदन गोपाला" असेच ठेवले. त्यांची कीर्तने भक्तिभावापेक्षा प्रबोधनाला महत्त्व देणारी असत आणि त्यांना ऐकण्यासाठी तोबा गर्दी होत असे. गाडगे बाबा विविध विषयांवर कीर्तनातून सांगायचे...

*बळीप्रथा चुकीचीच. जो बकरा तुम्ही पोटच्या पोरासारखा जपता, त्यालेच मारून, मीठमसाला लावून खाता ? मानसं नाही तुम्ही, रानडुकरं आहात !

*मानसाच्या जाती दोनच- बाई अन् बुवा. तिसरी जातच नाही. मानसामानसात भेद करू नका.

*गोरगरिबांना हरघडी मदत करा. जमेल ते खाऊ घाला. त्यांच्या पोराबाळांना शिकण्यास मदत करा. बायकांच्या दवापाण्याची व्यवस्था करा.

*विद्या हे सर्वात मोठं धन आहे. कसंही करून मुलाबाळांना शिकवा. बाबासाहेब आंंबेडकर पाहा, शिकून किती विद्वान झाले. (गाडगे बाबा आणि बाबासाहेब यांचे घनिष्ठ संबंध होते. ते वारंवार एकमेकांना भेटून सल्लामसलत करीत असत.) शाळेसारखे दुसरे थोर मंदिर नाही.

*दारूवर इलाज करायचा असेल तर, पोरांनो तुम्ही पोलिसात भरती व्हा. बाप जरी सापडला तरी असा बडवा की, त्याच्या बापानं पाहिलं नसेल !

*माणसाचे खरे देव आईबाप आहेत. त्यांची सेवा करा. गाईमुळे शेतकरी अन् शेतकऱ्यांमुळे जग सुखी राहते. म्हणून गोपालन, पशुपालन निष्ठेने करा. सर्वच प्राण्यांवर प्रेम करा.

*पगार पुरत नाही, असे रडगाणे गाऊ नका. पगार सरत नाही, असे म्हणा. काटकसरीने जगून भविष्यासाठी, अडीअडचणीसाठी शिल्लक टाकण्याची सवय लावा.

स्वत: एक अक्षरही न शिकलेले गाडगे बाबा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रासाठी किती मौल्यवान मार्गदर्शन करून गेले बघा. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जन्मून विसाव्या शतकाचा पूर्वार्ध त्यांच्या कर्मयोगपूर्ण प्रबोधनाने गाजला. आज शतक लोटले तरी ते विचार तेवढेच ताजे आणि गरजेचे आहेत, हे लक्षात ठेवून आपण वागलो, तरच गाडगे बाबांनी आयुष्यभर केलेली धडपड सार्थकी लागू शकेल !

✍️ विनोद देशमुख ✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.