कृषि महाविद्यालय, मूल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
कृषि महाविद्यालय, मूल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
दीपक देशपांडे
१९ फेब्रुवारी २०२६: कृषि महाविद्यालय, मूल येथे स्वराज्य आणि मानवी मूल्यांचे रक्षक, शौर्य व पराक्रमाचे प्रतिक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आकर्षक किल्ल्यांच्या प्रतिकृतींच्या निरीक्षणाने झाली. शिवकालीन दुर्गसंस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या प्रतिकृतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर विद्यार्थिनींनी सादर केलेल्या पारंपरिक लेझीम नृत्याने कार्यक्रमात उत्साहाची रंगत भरली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास औपचारिक प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. आम्रपाली आखरे, संशोधन उपसंचालक (बियाणे), डॉ. पं.दे.कृ.वि. अकोला तसेच प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. वर्षा टापरे, संचालक, मध्यवर्ती संशोधन केंद्र, अकोला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी भूषविले. यावेळी विचारपीठावर डॉ. आर. पी. गजभिये प्राध्यापक (उद्यानविद्या), श्री. एस. एम. धोटे (सहाय्यक विभाग अधिकारी) तसेच डॉ. गितांशु डिंकवार (सहाय्यक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र व सहाय्यक विद्यार्थी कल्याण अधिकारी) उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीस डॉ. गितांशु डिंकवार यांनी उपस्थित प्रमुख वक्ते व पाहुणे यांचे सविस्तर परिचय उपस्थिताना करून दिले. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. आर. पी. गजभिये यांनी सादर केली. त्यांनी शिवजयंती साजरी करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचा अंगीकार करावा, असे आवाहन केले. या प्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून चैतन्य कापगते (आठवा सत्र), नेहा भोयर (सहावा सत्र) आणि भावना चरपे (द्वितीय सत्र) यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी शिवरायांच्या शौर्य, दूरदृष्टी व स्वराज्य स्थापनेच्या कार्याचा गौरव करत प्रेरणादायी विचार मांडले.
प्रमुख वक्त्या डॉ. आम्रपाली आखरे यांनी आपल्या प्रभावी भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचा ऊहापोह केला. भाटवाडीचे युद्ध, पुरंदरचा तह, अफजल खानाचा वध, पन्हाळ्याला वेढा तसेच आग्र्यावरून सुटका यांसारख्या ऐतिहासिक घटनांचा संदर्भ देत त्यांनी शिवरायांच्या पराक्रम, धैर्य आणि रणनीतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यांनी त्यांच्या भाषणाच्या शेवटी संस्कार, संस्कृती आणि स्वराज्य टिकवायच असेल तर इतिहास वाचवा लागेल त्यातून या थोर महात्म्यांनी केलेल्या कर्तुत्वाचे जाणीव होणे आवश्यक आहे असे नमूद केले. प्रमुख पाहुण्या डॉ. वर्षा टापरे यांनीही आपल्या थोडक्यात मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, शिस्त आणि नेतृत्वगुण आत्मसात करण्याचे आवाहन केले. प्रत्येक विद्यार्थी हा शिवबा व विद्यार्थिनी जिजाऊ यांचे गुण अंगीकारून जीवनाच्या प्रवासात त्यांनी स्वतः कर्तव्याशील होण्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी शिवरायांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्टता साधावी, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या शेवटी मृद विज्ञान विभागाचे सहाय्यक प्राध्यापक श्री. नागेश नवघरे यांनी आभार प्रदर्शन केले.
शिवजयंती निमित्त्याने विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून जयंती सोहळ्याला वेगळीच उंची दिली. समूह नृत्य, पारंपरिक गोंधळ, जोशपूर्ण पोवाडा आणि ऐतिहासिक सादरीकरणे यांमुळे वातावरण भारावून गेले. विशेष आकर्षण म्हणून विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रभावी नाटिका सादर केली. या नाटिकेत संभाजी महाराजांचे शौर्य, धर्मनिष्ठा व स्वराज्यासाठी दिलेले बलिदान प्रभावीपणे उभे करण्यात आले. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे कौतुक केले. संपूर्ण महाविद्यालयीन परिसरात शिवमय वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. सदर कार्यक्रमास सर्व प्राध्यापकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment