विदर्भातील काशी यात्रा आणि उखडलेल्या रस्त्याची गाथा.
विदर्भातील काशी यात्रा आणि उखडलेल्या रस्त्याची गाथा.

आणि..,उखडलेले रस्ते दुरुस्तीची वाट बघतायत....
मूल , दीपक देशपांडे.
महाशिवरात्री निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षीही विदर्भातील काशी म्हणून चिरपरिचित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथील भगवान शिव शंकराच्या जत्रेसाठी विदर्भासह राज्यातील तसेच देश-विदेशातील हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात. प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मार्कंडा येथील शिव मंदिरात महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात जत्रा भरत असून या धार्मिक सोहळ्याला विशेष महत्त्व आहे.
मात्र, या महत्त्वाच्या जत्रेच्या पार्श्वभूमीवर मूल–चामोर्शी ते मार्कंडा या मुख्य मार्गाची स्थिती मागील कित्येक वर्षांपासून अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे. परिणामी वाहनचालक व भाविकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारामुळे अपघाताचा धोका अधिक वाढला असून कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाशिवरात्रीच्या जत्रेसाठी हजारो भाविक व वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होणार असल्याने या खराब रस्त्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे जत्रेच्या आयोजनावर गालबोट लागण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
या गंभीर समस्येकडे प्रशासन, संबंधित विभागाचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांनी तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी भाविक, नागरिक तसेच विविध सामाजिक संस्था व संघटनांकडून कित्येक दिवसांपासून करण्यात येत आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहेहेही पटवून दिले जात असताना या बाबिकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आता शासन प्रशासनावर केला जात आहे.
महाशिवरात्रीसारख्या पवित्र पर्वासाठी येणाऱ्या भाविकांना सुरक्षित व सुरळीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत होती मात्र प्रशासकीय यंत्रणेला जनसुरक्षेची काळजीच नसल्याचे आता स्पष्ट झाले असून महाशिवरात्री उत्सव आता एक दिवसावर येऊन ठेपला असतानाही रस्ता वाहतुकीसाठी सुयोग्य स्थितीत करण्यात आलेला नसल्याने जनतेचा रोष वाढू लागला आहे , आणि शासन व शासनकर्ता यांचे विरोधात एक संतप्त लाट निर्माण झाली आहे,शासन प्रशासनाला याबाबत जाग कधी येणार?असा प्रश्न जनता विचारत आहे?
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment