श्रद्धांजली ✍️विनोद देशमुख , अजितदादांना वाटत होती मित्राच्या लग्नाची काळजी.

 श्रद्धांजली ✍️विनोद देशमुख.

अजितदादांना वाटत होती,मित्राच्या लग्नाची काळजी.

राजकारण हे स्पर्धेचं क्षेत्र आहे, शत्रुत्वाचं नाही, असं मानणारे आणि विरोधकांशीही मैत्र जपणारे अनेक नेते महाराष्ट्रात झाले. बाळासाहेब ठाकरे-शरद पवार, शरदराव-प्रमोद महाजन, प्रमोदजी-विलासराव देशमुख, विलासराव-गोपीनाथ मुंडे, शरद पवार-नितीन गडकरी ही त्याची काही उदाहरणं. अशीच एक महत्त्वाची जोडी होती देवेन्द्र फडणवीस-अजित पवार. दादांच्या अपघाती निधनानं ही जोडी आता विस्कटली. पण, देवेन्द्र आमदार झाल्यापासूनच त्या दोघांमध्ये चांगली मैत्री होती, हे अनेकांनी पाहिलं-अनुभवलं आहे.

विधानसभेत किंवा बाहेर एकमेकांवर त्वेषानं तुटून पडणारे विरोधक खाजगी आयुष्यात मित्र राहू शकतात, हे आजकाल सामान्य राजकीय कार्यकर्त्यांच्या फारसं पचनी पडताना दिसत नाही. कारण, राजकारणाचा दर्जा आता 'स्पर्धा' वरून 'शत्रुत्वा' पर्यंत आणि 'संवादा' वरून 'शिवीगाळी' पर्यंत खाली घसरलेला आहे. या स्थितीतही काही नेते सर्वपक्षीय मैत्रभाव जपून आपल्या अनुयायांना योग्य तो संदेश देत असतात, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे.

असंच घट्ट मैत्र देवेन्द्र-दादा यांच्यात होतं. आमदार म्हणून देवेन्द्र दादाला ज्युनियर होते. ते पहिल्यांदा आमदार झाले १९९९ मध्ये, तर दादा तेव्हा ८ वर्षांचे अनुभवी आमदार (अल्पकाळ खासदार) आणि ४ वर्षांचा अनुभव घेतलेले राज्यमंत्री होते. दादा वयानंही ११ वर्षांनी ज्येष्ठ होते. तरीही या दोघांची मैत्री जमली. कारण, दोघांच्याही आवडीचा असलेला विषय होता अर्थकारण ! 

बहुतांश आमदार अर्थसंकल्पात रस घेत नाहीत, हे लक्षात येताच देवेन्द्र यांनी "अर्थसंकल्प कसा पाहावा-वाचावा" हे सोप्या भाषेत आमदारांना समजावणारी पुस्तिकाच काढली. एका तरुण आमदाराच्या पहिल्याच कारकीर्दीतील या उपक्रमानं तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासह सारेच नेते प्रभावित झाले. दुसरीकडे दादाही नंतर अर्थ, नियोजन या खात्यांचं मंत्रिपद सांभाळू लागले. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सर्वाधिक ११ वेळा मांडण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे. 'अर्थ' हाच या दोघांमधील मैत्रीचा मुख्य दुवा ठरला अन् ‌ त्यांची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत गेली, असं यावरून म्हणता येईल.

ही मैत्री व्यक्तिगत पातळीवर तर चांगलीच बहरली होती. २०१९ मध्ये अत्यल्पकाळ आणि २०२३ पासून मृत्यूपर्यंत, असं दोनदा देवेन्द्रच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्रिपद दादांनी स्वीकारणं, दबंग काकाला आव्हान देत स्वत:चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपासोबत महायुतीत आणणं यासारख्या अकल्पित वाटणाऱ्या घटना या मैत्रीचाच परिपाक होत्या. "देवेन्द्र, आता लवकर लग्न करून टाका" असा सल्ला भर विधानसभेत देण्यापर्यंत दादांनी ही मैत्री पुढे नेली; ती देखील मैत्रीच्या अगदी प्रारंभीच्या काळातच.

२००४ चं नागपूर हिवाळी अधिवेशन असावं. दादा तेव्हा जलसंपदा मंत्री होते. विधानसभेत विरोधी पक्षाचे प्रमुख वक्ते अर्थातच देवेन्द्र होते. त्यांचं घणाघाती भाषण झालं. चर्चेला उत्तर देण्यासाठी अजितदादा उभे राहिले. मूळ विषय सोडून दादांनी रूळ कधी बदलले, कळलंच नाही. बोलता बोलता ते देवेन्द्र यांच्या लग्नावर आले. त्यांच्याकडे पाहून गमतीनं म्हणाले- "तुम्ही आता‌ लग्न करा. विदर्भात मुली मिळत नाहीत काय? तसं असेल तर सांगा. आम्ही आमच्या भागातील मुलगी शोधून देतो. पण लग्न कराच !!" संपूर्ण सभागृहात हास्याचे फवारे उडाले. दोन्ही बाजूंचे आमदार देवेन्द्रांकडे पाहून हातवारे करू लागले.

अन् काय योगायोग पाहा.‌ पुढच्याच वर्षी (२००५) देवेन्द्र विवाहबद्ध झाले, नागपूरच्या अमृता रानडे यांच्याशी. परवा अजितदादांना श्रद्धांजली वाहताना हा प्रसंग देवेन्द्र यांच्या डोळ्यांपुढे नक्कीच तरळला असणार. विरोधी पक्षातील नेत्याशीही अशी जिवाभावाची मैत्री जपणारे अजितदादा विलक्षणच म्हणावे लागतील. असा उमदा, मिश्किल अन् धडाकेबाज नेता विमान अपघातात जावा, हे महाराष्ट्राचं दुर्दैवच. ओम् शांति:🌹💐

✍️ विनोद देशमुख ✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.