खलबत्ता:-विनोद देशमुख,हमाम मे सब नंगे है.
खलबत्ता:-विनोद देशमुख.
हमाम मे सब नंगे है
-यावेळची महानगर पालिका निवडणूक आतापर्यंतच्या सर्वच निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. या निवडणुकीत आघाड्या, युत्या, गट विखुरले आहेत, कोणाचीही कोणाशीही हातमिळवणी झाली आहे आणि मुख्य म्हणजे आरोप-प्रत्यारोपांनी अतिशय खालची पातळी गाठली या तीनही मुद्यांवर कोणीही नाक उंच करून बोलण्याच्या स्थितीत नाही, इतका चिखल झालेला आहे. सर्वांचेच कपडे फाटले आहेत संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या आपल्या पूर्वजांना 'असा' महाराष्ट्र अपेक्षित होता का, याचा गंभीर विचार सर्वांनीच केला पाहिजे.
या गैरप्रकाराची खरी सुरुवात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातून झाली आणि त्याचं 'श्रेय' उद्धव ठाकरे आणि त्यांचे महागुरू शरद पवार यांनाच दिलं पाहिजे. आजच्या चिखलाचे खरे 'मानकरी' ते आहेत. त्या निकालानंतर भाजपा-राष्ट्रवादी युती (सकाळचा शपथविधी) किंवा जुनीच भाजपा-शिवसेना युती कायम राहिली असती तर गेल्या ६ वर्षात झाला एवढा चिखल झालाच नसता. या दोघांच्या महत्त्वाकांक्षेनं आणि हातातील खंजिरानं महाराष्ट्रातील लोकशाहीचा 'गेम' केला अनैतिकतेच्या त्या घाऊक बीजारोपणाची फळं आज सारेच राजकीय पक्ष भोगत आहेत, हे विदारक सत्य आहे.
तेव्हापासून राजकारणातील तत्त्वज्ञान, धोरण, साधनशुचिता, संयम, संबंध, भाषा, पैशाचं प्रस्थ हे सारंच बदललं आणि खाली खाली घसरत (फक्त पैसे वर ) गेलं, हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे. एका पक्षाचे प्रवक्ते असलेले मराठी संपादकच जेव्हा भरपत्रपरिषदेत घाणेरडी भाषा वापरू लागले, तेव्हा मायमराठीची, मराठी संस्कृतीची, अस्मितेची अब्रू वेशीवरच टांगली जाणार ना. मूळच्या राजकीय व्यक्तींना काय आणि कसा दोष देणार ? अनर्गल भाषेतील भांडणं, पैशाचा पाऊस, हिंसाचार, पळवापळवी, पक्षफोडी, दडपशाही, अहंकार, श्रीमंतीचं हिडीस प्रदर्शन या साऱ्यांना आलेला ऊत अजून कमी झालेला नाही; उलट वाढत चालला आहे. आणि, सुसंस्कृततेचा पोकळ दावा करणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे नासून देशात आपलं नाव खराब झालं आहे. लोकांना याचा वीट आला आहे. मुख्य म्हणजे, यासाठी आता सारेच कमीअधिक, प्रत्यक्षाप्रत्यक्ष जबाबदार आहेत.
एक पक्ष काहीतरी चुकीचं वाटणारं कृत्य करतो आणि विरोधक त्याच्यावर तुटून पडतात. त्यांनीही याआधी तसंच वर्तन केलेलं असताना हाच शहाजोगपणा सध्या सर्रास सुरू आहे. कोणीही धुतल्या तांदळाचा राहिलेला नाही. पण तरीही दुसऱ्यांना ज्ञानाचे डोज पाजताना मागे राहत नाही, हे आपलं दुर्दैव. नगर पालिका आणि महानगर पालिका यांच्या निवडणुकांमध्ये कोण कोणाचं कायम मित्र राहिलं, कोण विरोधकाशी चुंबाचुंबी केली नाही, कोण निकालानंतर दगाबाजी केली नाही, परंपरागत विरोधकांशी हातमिळवणी केली नाही, आपसातच एकमेकाशी लढले नाही, स्वत: आघाडी-युती धर्म काटेकोर पाळला असं एकही उदाहरण सापडत नाही. हाच राजकारण सडल्याचा भक्कम पुरावा आहे.
राजकारण आता स्वार्थी, मतलबाचं, मनमानीचं, पूर्णत: स्वयंकेंद्रित (व्यक्ती आणि पक्ष), जनतेला न मोजणारं, गुंडगिरी आणि पैशाचा माज दाखविणारं, कायदे-कानून न पाळणारं, नियम धाब्यावर बसविणारं 'धंद्या'चं क्षेत्र झालं आहे. "गंदा है, पर धंदा है" म्हणत सारेच त्यात सहभागी होत आहेत आणि महाराष्ट्राला बिहारच्या मार्गावर नेण्याचं 'पुण्यकर्म' करीत आहेत. कोण, कोणाला, काय आणि कसं म्हणणार, हाच आता दशलक्षमुद्रांकित प्रश्न (Million Dollar Question) उत्तराच्या प्रतीक्षेत आहे.
+++++✍️ विनोद देशमुख ✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment