खलबत्ता:-विनोद देशमुख.एकाचं नेतृत्व, दुसऱ्याचं वक्तृत्व‌.

खलबत्ता:-विनोद देशमुख.

एकाचं नेतृत्व, दुसऱ्याचं वक्तृत्व‌.

वेगवेगळ्या पक्षांचे समर्थक असलेले तीन ज्येष्ठ मित्र सकाळी बगिच्यात उन्ह खात बसले असताना महानगर पालिका निवडणुकीवर गप्पा मारत होते. त्यांची ही रंगतदार चर्चा...

अंबादास सरोदे (भाजपा-शिवसेना युती) : मित्रांनो, उद्धव-राज या बंधूनी ठाकरे ब्रॅण्ड आणून मराठी अस्मितेचा जो मुद्दा छेडला आहे, तो मुंबईत फार चालेल असं वाटत नाही.

चंद्रशेखर महाडिक (उबाठा शिवसेना) : का बरं, का नाही चालणार ? मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. भाजपा-शिंदेसेना-अजितदादा या त्रिकोणी सरकारच्या राजवटीत मुंबईत अमराठी धनवंतांची चलती असल्यानं मराठीजन धास्तावले आहेत. ते नक्की ठाकरे ब्रॅण्ड उचलून धरतील.

सरोदे : म्हणजे, मुंबईतील सर्वच्या सर्व ३५-४० टक्के मराठी लोक ठाकरेंना साथ देतील, असं म्हणता तुम्ही, अहो चंदूजी, संघ-भाजपा आणि शिवसेना यांचा मराठी मतदार किमान ३०-४० टक्के वाटा युतीच्या झोळीत टाकणार, हे तुम्ही लिहून घ्या. याचं कारण स्वत: ठाकरे बंधूच आहेत. कसं, ते समजून घेण्यासाठी पुढील उदाहरण पाहा-

परवाचाच प्रसंग. कांदिवली पूर्वच्या समतानगर भागातील उबाठा शिवसेना शाखेत एकच लगबग. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येणार. एकदाचा लवाजमा आला. शाखाप्रमुख असलेल्या शिवसैनिकानं माईक हाती घेतला आणि सुरुवात केली- "इतक्या वर्षानंतर उद्धव ठाकरे साहेब आज पहिल्यांदाच आपल्या शाखेत आले आहेत..."

काय समजलं ? पक्षप्रमुख पहिल्यांदा आल्याबद्दल शाखाप्रमुख आनंद व्यक्त करीत आहे. शिवसेनेत शाखा ही काय चीज आहे, हे ज्यांना माहीत आहे, त्यांना या "पहिल्यांदा येण्याचा" अर्थ नीट कळू शकतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सक्षमपणे कार्यरत असेस्तोवर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कामात फारसे लक्ष देत नसत. २००२ मध्ये मात्र त्यांनी मुंबई महानगर पालिका निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून दिला. हे पाहून बाळासाहेबांनी २००३ मध्ये महाबळेश्वर अधिवेशनात त्यांना पक्षाचं कार्यकारी प्रमुख नेमलं. पुढे २०१३ मध्ये बाळासाहेबांच्या निधनानंतर ते शिवसेनेचं पक्षप्रमुखपद सांभाळत आहेत. याचा अर्थ, गेली २२-२३ वर्षे ते पक्षाचे प्रमुख आहेत. आणि, समतानगरचा शाखाप्रमुख म्हणतो- उद्धवजी पहिल्यांदा आले ,महाडिक, अशानं पक्ष चालेल का ? या 'अतिउशिरा'चा शिवसैनिकांमध्ये आणि इतर मराठीजनांमध्ये काय संदेश जाईल, तुम्हीच सांगा.

महाडिक (उसळून) : तुम्ही संघवाले दुसऱ्याच्या खोड्या काढण्यात भलतेच वस्ताद पण, स्वत:च्या पक्षात काय चाललंय् त्याकडे मात्र कानाडोळा. तुमचे ते भाजपा प्रदेशाध्यक्ष रवीन्द्र चव्हाण काय बोलून गेले, कल्पना आहे का ?

सरोदे : काय बोलले बा ?

या संवादात मध्येच हस्तक्षेप करून वामनराव वानखेडे (काँग्रेस-वंचित) : काय बोलले ? स्व. विलासराव देशमुख यांचा अपमान केला त्या माणसानं. "आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसून जातील" असं ते लातूरच्या सभेत म्हणाले. कोण हे टिकोजीराव. हयात नसलेल्या नेत्याबद्दल असं बोलणं शोभतं का चव्हाणांना.

महाडिक : विलासरावांशी आमचे हजार मतभेद असले तरी एक गोष्ट मान्य केली पाहिजे की, विरोधकांशीही चांगले संबंध असलेले विलासराव हे एक उमदे नेते होते. दिवंगत मुख्यमंत्र्यांना आजच्या राजकारणात ओढताना चव्हाणांनी पातळी सोडली. हा अहंकार महागात पडेल तुम्हाला.

सरोदे : मित्रांनो, चव्हाणांचं ते विधान माझ्यासारख्या अनेकांना आवडलेलं नाही. स्व. प्रमोद महाजन, स्व. गोपीनाथ मुंडे या आमच्या नेत्यांशी सुद्धा घनिष्ठ संबंध जोपासणारे विलासराव अनोखे नेते होते. चव्हाण असो की आणखी कोणी, बोलताना सभ्यतेचं‌ पथ्य सर्वांनीच पाळलं पाहिजे. पण सध्याचं राजकारण इतकं गचाळ झालं आहे की काही बोलायची सोय नाही, यात सर्वपक्षीय नेत्यांचं सारखंच 'योगदान' आहे, हे आणखी दुर्दैवाचं.

चर्चा अशी रंगात आलेली असतानाच वानखेडेंचा मोबाईल वाजला अन् मग तीनही मित्र आपापल्या घराच्या दिशेनं चालू लागले...

+✍️ विनोद देशमुख ✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.