खलबत्ता:-विनोद देशमुख.राडेबाजी अन् कॉंग्रेसीकरण भाजपासह सर्वांना लागण.
खलबत्ता:-विनोद देशमुख.
राडेबाजी अन् कॉंग्रेसीकरण
भाजपासह सर्वांना लागण.
-------------चंद्या, बंड्या, पम्या, रम्या वगैरे मंडळी शाळेत शिरत असतानाच दुसऱ्या रस्त्यानं सामाजिक शास्त्राचे गुरुजी कळमकर आले. या पोरांना पाहून त्यांनी विचारलं- "मुलांनो, नगर पालिकांपाठोपाठ आता महानगर पालिकांच्या आणि नंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का रे ?"
पोट्टे एकास्वरात ओरडले- "हो गुरुजी." अन् लगेच रम्या सांगू लागला- "आपल्या चंद्रपुरात हाय न गुरुजी निवडनूक. काय धिंगाना सुरू हाय तेथं बीजेपीच्या एका नेत्यानं (चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष कासनगोट्टुवार) म्हने पक्षाच्या उमेदवार यादीतून एकदोन नाही, तर चांगले 14 उमेदवार बदलले. म्हंजे राज्याच्या नेत्याइनं ठरवलेली नावं कापून टाकली आन् आपल्या मर्जीतले उमेदवार घुसवले म्हंतात. हे त हद्दच झाली म्हनाची. मंग का, बीजेपीवाले भिडले ड्यामेज कंट्रोल का का म्हनते ते कराले. कासनगट्टुवारले त्याइनं काढून टाकलं पक्षातून. लयंच तिकडमबाजी झाली चंद्रपूरले."
कळमकर : अरे पोरांनो, यंदाची ही निवडणूक खासच म्हटली पाहिजे. एकजात साऱ्या पक्षांमध्ये, गटांमध्ये सावळागोंधळ आहे. बंडखोरी, बाहेरून आलेल्यांना आणि गुंडांना तिकिटं, नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी वगैरे मुद्यांवरून सर्वत्र असंतोषाचा उद्रेक झालेला दिसत आहे. नेत्यांच्या नावानं शिमगा, फलक फाडणं, उपोषणं, रडारडी, पाठलाग, मारामारी, एवढंच काय आत्मदहनाचा प्रयत्न करण्यापर्यंत कार्यकर्त्यांची मजल गेली आहे, जागा शंभरात अन् इच्छुक हजारोंमध्ये यामुळे हे घडत असल्याचं जाणवतं..
बंड्या : पण सर, या साऱ्यात बीजेपी सर्वात पुढे दिसते. रम्यानं सांगितलं ना आत्ता. फायनल झालेले उमेदवार परस्पर बदलले, म्हणजे हद्दच झाली म्हणायची. पक्षाची शिस्तबिस्त काही राहिलीच नाही. अन् हे बीजेपीत घडलं, याचं आमच्या नव्या पिढीला जास्त वाईट वाटतं. या पक्षातही राडेबाजी होईल, असं वाटलं नव्हतं. मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून एक आशा वाटायला लागली आहे. पण कसचं काय...
गुरुजी : आजकालचं राजकारण असंच झालं आहे मुलांनो. सब घोडे बारा टक्के, आम्ही तरुण असताना, ३०-४० वर्षांपूर्वी कॉंग्रेस पक्षाची अशीच स्थिती होती. त्यांना लोकांचा खूप पाठिंबा मिळायचा. उमेदवार सहज निवडून येत. या 'बनचुकेपणा'तून संघटनेत काही दोष निर्माण झाले. ते दुरुस्त करण्याकडे नेत्यांनी लक्ष न दिल्यामुळे आज त्या पक्षाची काय अवस्था झाली आहे, आपण पाहतच आहोत. एक फरक जरूर आहे. काँग्रेसमध्ये आधीपासूनच समर्थकांची भाऊगर्दी होती. भाजपात मात्र अनेक ठिकाणी बाहेरून आलेल्यांचा, म्हणजे इतर पक्षांच्या नेत्यांचा भरणा अधिक दिसत आहे. भाजपाचे विरोधक यालाच 'इनकमिंग' आणि "वॉशिंग मशीन" म्हणताहेत.
तेवढ्यात हुशार चंद्या मधेच बोलला- "बीजेपीची आता काँग्रेस झाली आहे, असं लोकांना वाटलं तर त्यात त्यांचा काय दोष ? नागपूरच्या एका माजी महापौर बाईंचंच उदाहरण पाहा. तिच्या पतीला पक्षाचं तिकीट मिळालं नाही. पतीनं बंडखोरी केली. बाई एकदम निष्ठावान. पतीची बंडखोरी सहन न होऊन त्यांनी एकदम घरच सोडलं अन् माहेर गाठलं. आता म्हणे त्या नवऱ्याविरुद्ध पक्षाचा प्रचार करणार आहे. कुठल्या टोकाला गेलं सर राजकारण ? एखाद्या कुटुंबात अशी उलथापालथ बीजेपीसारख्या पक्षामुळे व्हावी, याचं आम्हाला दु:ख वाटतं."
कळमकर : अरे चंद्या, कुटुंबातील संघर्ष एकवेळ समजू शकतो. तो प्रत्येकाच्या वेगळ्या स्वभावामुळे होऊ शकतो. पण पक्षाच्या धोरणातही गडबडी व्हाव्या ? विद्यमान आमदार-खासदारांच्या नातेवाईकांना नव्यानं (म्हणजे जुने नगरसेवक सोडून) तिकीट द्यायचं नाही, असं ठरलं असताना, काही ठिकाणी हा नियम राबला नाही, असं लक्षात आलं आहे. याला काय म्हणायचं ? पक्षात गर्दी असताना काँग्रेस पक्ष जसा वागायचा, तशीच जर भाजपाही वागली तर फरक काय राहिला ? घराणेशाहीचा बोलबाला तर सर्वत्र दिसत आहे.
"राजकारणातील मंडळी कमीअधिक प्रमाणात एकसारखीच वागणार असतील, तर आमच्या पिढीनं चांगल्या लोकशाहीसाठी पाहायचं कोणाच्या तोंडाकडे, असा झोल महानगर पालिका निवडणुकीनं करून ठेवला गुरुजी" असं म्हणत चारही पोट्टे वर्गाकडे निघाले. चालता चालता मास्तर बोलू लागले- पूर्वी राडा घालणं हा फक्त शिवसेनेचा एकाधिकार होता. आता सर्वच पक्षांनी आणि अपक्षांनीही हा नुस्खा वापरून राडेबाजीला राजकारणात प्रतिष्ठित केलं आहे. आता फक्त देवच भलं करू शकतो आपल्या लोकशाहीचं.
+✍️ विनोद देशमुख ✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment