घ्या समजून राजेहो...,महाराष्ट्र भाजपातला तमाशा: एक चिंतन....

 घ्या समजून राजेहो

महाराष्ट्र भाजपातला तमाशा: एक चिंतन...

महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी अखेरची तारीख होती. त्या दोन दिवसात भारतीय जनता पक्षात गावोगावी जे काही घडले आणि मंगळवार नंतर देखील सुरूच आहे. त्या सर्व प्रकाराला तमाशा असेच नाव देणे योग्य ठरेल  पार्टी विथ अ डिफरन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पक्षात असे तमाशे व्हावे हा प्रकार दुर्दैवीच म्हणावा लागेल. त्यामुळे असे का घडते याचा शोध घेणे आणि त्यावर उपाययोजना केली जाणे ही आता भाजपासाठी आवश्यक बाब ठरणार आहे हे नक्की. 

मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख होती. भाजपने खूप आधीपासून सर्वच प्रभागांमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांनी विविध संस्थांकडून प्रत्येक प्रभागात सर्वेक्षण देखील करून घेतले होते. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी नावे जाहीर केली नव्हती. याला कारण असे दिले जात होते की आधीच नावे जाहीर केली, तर बंडखोरी होईल आणि ती सांभाळणे कठीण जाईल. त्यामुळे आदल्या रात्री आणि मंगळवारी सकाळी फक्त ज्यांना उमेदवारी द्यायची आहे, त्यांना कार्यालयात किंवा नेत्याच्या घरी बोलावून एबी फॉर्म दिले जाऊ लागले. ही बातमी कळताच सर्वच इच्छुकांनी कार्यालयात किंवा जिथून एबी फॉर्म म्हटले जात आहेत त्या नेत्यांच्या घरी गर्दी केली आणि मग त्यातून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. छत्रपती संभाजीनगर मध्ये पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांना अक्षरशः मागच्या दाराने पळून जावे लागले. नाशिकमध्ये तर ज्या गाडीत एबी फॉर्म ठेवले होते, त्या गाडीचाच कार्यकर्त्यांनी पाठलाग करत ते एका फार्म हाऊस पर्यंत पोहोचले. फार्म हाऊस मध्ये फॉर्म घेऊन पदाधिकारी बसले आहेत कळल्यावर त्या फार्म हाऊसच्या कंपाउंड वरून उड्या मारून कार्यकर्ते आत शिरले. संभाजीनगर मध्ये तिथे महिला कार्यकर्त्यांनी अक्षरशः गोंधळ घातला. एकीने तर अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. असाच थोड्याफार फरकाने प्रकार मुंबईत देखील झाला. पुण्यातही नाराजी नाट्य सुरूच होते. तिथे पूजा मोरे नामक बाहेरून पक्षात आलेल्या महिलेला आधी उमेदवारी दिली. तिने अर्ज दाखल केला आणि नंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केला म्हणून तिला अर्ज मागे घ्यायला लावला. नागपुरात असे तमाशे झाले नाहीत, तरी अनेकांनी भराभर राजीनामे द्यायला सुरुवात केली, तर अनेकांनी बंडखोरी देखील केली. 

दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी देखील हे तमाशे सुरूच होते. तिथे काही कार्यकर्त्यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. एका महिला कार्यकर्तेने एका नेत्याच्या मुस्काटात हाणली. हे सर्व टीव्हीवर दाखवण्यात आले. काही ठिकाणी उमेदवारी नाकारलेले उमेदवार चक्क कार्यालयातच उपोषणालाही बसले. काहींना तिथेच भूगोल देखील आली. एकूणच पार्टी विथ अ डिफरन्स म्हणणाऱ्या भाजपच्या अब्रूच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या गेल्या. हे बघून माझ्यासारखे अनेक भाजप समर्थक निश्चितच दुखावलेले आहेत. 

साधारणपणे उमेदवार एकच असतो. मात्र त्या जागेसाठी किमान १० जण इच्छुक असतात. अशावेळी सर्वांशी चर्चा करून सामंजस्याने एकाला उमेदवारी दिली तर तोडगा निघू शकतो. मात्र भाजपामध्ये जे काही घडले त्यात तक्रारी अशा येत होत्या की वर्षानुवर्षे पक्षासाठी जे झिजले त्यांना डावलून पक्षात नव्याने आलेल्या उप-यांना उमेदवारी दिली जात आहे, आणि निष्ठावंतांना डावलले गेले आहे. याचे चांगले उदाहरण म्हणजे नाशिकमध्ये नुकतेच शिवसेनेतून भाजपमध्ये डेरेदाखल झालेले सुधाकर बडगुजर यांना तर उमेदवारी दिलीच पण त्यांच्या परिवारातील अजून दोघांना उमेदवारी दिली. चार पक्ष फिरून आलेले राहुल नार्वेकर यांच्या परिवारातीलही तिघांना उमेदवारी दिली गेली. हा प्रकार फक्त मुंबई, पुणे आणि नाशिक मध्येच घडला असे नाही, तर बहुतेक सर्वच महानगरांमध्ये हा प्रकार घडल्याच्या बातम्या कानावर येत आहेत. त्या निमित्ताने पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळे आरोप देखील केले जात आहेत. निष्ठावंतांना डावलताना निवड समितीतील पदाधिकाऱ्यांनी पैसे घेऊन उमेदवारी दिली असा आरोप सरसकट केला जातो आहे. नागपुरात देखील अशा अनेक तक्रारी कानावर आल्या आहेत. 

साधारणपणे ज्या प्रभागात तुम्ही निवासी असता तिथलाच रहिवासी नगरसेवक म्हणून उभा राहत असतो. मात्र अनेक ठिकाणी सहा-सात किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्याच प्रभागातून उमेदवारी दिली गेली. नागपुरात लक्ष्मी नगर भागात असाच प्रकार घडला म्हणून जवळजवळ ४० पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे पक्षाचे राजीनामे दिले. एका महिलेला ती लग्नानंतर राहत असलेल्या परिसरापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर तिचे माहेर असलेल्या प्रभागातून उमेदवारी दिली गेली. गेल्या १० वर्षात तिचा त्या प्रभागाशी काहीही संपर्क नसल्याचे तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितले. मात्र निवड समितीतील सदस्यांची मेहरबानी झाल्याने हे घडले असाही आरोप केला गेला. इथे आर्थिक देवाणघेवाण झाल्याचीही तक्रार केली गेली. भाजपची उमेदवार म्हणून ती महिला निवडून येईलही. मात्र प्रभागात काही समस्या आल्या तर सात किलोमीटर वरून ती धावणार आहे का हा प्रश्न देखील स्थानिकांनी विचारला आहे. मात्र पक्षश्रेष्ठींना त्याचे काही सोयर सुतक नाही असे दिसून आले आहे. 

१९९९ नंतरच्या कालखंडात भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झाले. इतर पक्षातून मोठ्या प्रमाणात नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये डेरे दाखल झाले. त्यावेळी त्या नेत्याची निवडून येण्याची क्षमता आहे इतकेच बघितले जात होते  मात्र तसे करताना आपण जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करतो आहोत याचे भाजपच्या नेत्यांना कधीच भान नव्हते. त्यामुळेच दुसऱ्या पक्षातून आलेल्या प्रसाद लाड यांना आमदारकीचा प्रसाद देऊन त्यांचे लाड केले गेले. शिवसेनेतून आलेल्या प्रविण दरेकर यांनाही विधान परिषदेत चक्क विरोधी पक्षनेता देखील केले गेले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या चित्रा वाघांना ताबडतोब विधान परिषदेत नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त केले गेले. मात्र माधव भंडारी आणि केशव उपाध्ये हे वर्षानुवर्षापासूनचे निष्ठावंत तसेच दुर्लक्षित राहिले. नागपूर जिल्ह्यात काँग्रेसमधून आलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांचे वाढते प्रस्थ बघून तीन पिढ्यांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या छोटू भोयरला शेवटी पक्ष सोडून काँग्रेसचा आधार घ्यावा लागला. ही काही उदाहरणे झाली. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. एकूणच "घरची म्हणते देवा देवा, आणि शेजारणीला चोळी शिवा" असाच प्रकार सध्या भाजप नेते करत आहेत  यात दुर्दैवाची बाब अशी की भाजपची मातृसंस्था असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा देखील त्यांना आवरू शकलेला नाही. इथे संघ अधिकाऱ्यांना भाजप नेते ऐकत तरी नसावेत, किंवा मग संघ अधिकाऱ्यांनीच डोळ्यावर हात ठेवून दुर्लक्ष केले असावे असे म्हणता येऊ शकेल. 

या सर्व प्रकारात दहा निष्ठावंतांपैकी एकाला उमेदवारी दिली असती तर बाकीच्यांनी कदाचित सामंजस्याने घेतले देखील असते मात्र दहाही जणांना डावलून एखाद्या बाहेरून आलेल्या परक्याला डोक्यावर घेतले गेले त्यामुळे कार्यकर्ते जास्त दुखावले हा मुद्दा देखील नाकारता येत नाही.

भाजपच्या स्थापनेपासून किंवा मग अगदी सुरुवातीपासून जे भाजपशी जुळले आहेत तेच पक्षाशी अखेरपर्यंत निष्ठावंत राहू शकतात. दुसऱ्या पक्षात आपली सोय लागली नाही म्हणून जे भाजपात आले आहेत, ते दीर्घकाळ टिकतीलच याची खात्री नसते याचे अनुभव देखील भारतीय जनता पक्षाने घेतलेले आहे. काँग्रेसमध्ये जमले नाही त्यावेळी नाना पटोले भाजपमध्ये आले. तिथे काही काळ राहून ते परत काँग्रेसमध्ये डेरे दाखल झाले. तोच प्रकार अमरावतीच्या सुनील देशमुख यांचा देखील झाला. अजूनही अनेक जण असे आहेत जे ज्यांचा उल्लेख मी यापूर्वी भाजपमध्ये दुसऱ्या पक्षातून ऑन डेप्युटेशन आलेले नेते असा केला आहे. हे नेते काही काळासाठी आपला स्वार्थ साधून घेता यावा म्हणून भाजपमध्ये येतात. स्वार्थ संपला की परत निघून जातात. मात्र भाजपामध्ये अशाच नेत्यांना पायघड्या घातल्या जातात हे इथे दुर्दैवाने नमूद करावे लागते. त्यामुळेच मग अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. 

भाजपमध्ये ही अंतर्गत अस्वस्थता गेल्या काही वर्षांपासून सुरूच होती. मात्र यावेळी या अस्वस्थतेचा भडका उडालेला दिसतो आहे. त्यामुळेच असे तमाशे झाले आहेत. ठीक ठिकाणी नेत्यांचे फोटो फाडले. त्यांच्या गाडीला काळे फासले. त्यांच्या गाड्यांचा पाठलाग केला गेला. त्यांना घेराव घातला. त्यांच्या नावाने शिमगा केला. असे प्रकार भाजपमध्ये प्रथमच होत आहेत, आणि ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर होत असल्यामुळे त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. 

घरातली ही भांडणे चार भिंतीच्या आतच ठेवली जाणे गरजेचे होते, आणि भाजप नेतृत्वाला तसे करणे शक्य देखील होते. मात्र इथे "सबकुछ चलता है" या भावनेतून वरिष्ठांनी दुर्लक्ष केले आणि खालच्यांनी गोंधळ घातला. त्यामुळेच भाजपच्या इज्जतीचा असा तमाशा झाला, हे वास्तव नाकारता येत नाही. त्यातही निवडणुकीच्या तोंडावर असे प्रकार झाल्यामुळे त्याचा परिणाम मतदानावर देखील होऊ शकतो, हा धोका देखील लक्षात घेतला पाहिजे. 

त्यामुळे अजूनही भाजप नेतृत्वाने सर्वच संबंधितांना विश्वासात घेऊन हे चित्र कसे बदलता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. जर आधीच सर्वांना विश्वासात घेऊन नेतृत्वाने प्रभागश: चर्चा केली असती आणि सर्व सहमतीने निष्ठावतंंमधूनच एक निवडून उमेदवार ठरवले असते, तर इतका गोंधळ झाला नसता. मात्र पक्षाचे होत असलेले कार्पोरेटायझेशन इथे आडवे आले आणि मुलाखती सर्वेक्षणे असे प्रकार करत अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारी जाहीरच केली गेली नाही. त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि त्याचा भडका उडाला. हे  कार्पोरेटायझेशन टाळले असते तर असा भडका उडाला नसता हे निश्चित.


भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्या पक्षात असे तमाशे व्हावे हा प्रकार दुर्दैवीच म्हणावा लागेल. आज भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या समंजस प्रगल्भ नेत्याकडे आहे. फडणवीस हे जितके महत्त्वकांक्षी आहेत, तितकेच सर्वसमावेशक धोरण ठेवणारे आहेत. सर्वांना घेऊन चालून पक्ष विस्तार आणि राज्यकारभार करायचा हे त्यांचे धोरण राहिले आहे. त्यांच्या काळात असे प्रकार होतात, हे निश्चितच अशोभनीय म्हणावे लागेल. त्यांनी वेळीच या संदर्भात उपाययोजना कराव्या. सर्व घटकांना विश्वासात घेऊन भविष्यात असा गोंधळ होणार नाही याची काळजी घ्यावी. ते गरजेचे आहे. त्याचबरोबर भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही इथे लक्ष घालणे गरजेचे आहे. आजच वर्तमानपत्रात बातमी आहे की काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मते आता भाजपवर संघाचा कंट्रोल नाही तर अदानी आणि अंबानींचा आहे. हे चित्र बदलायचे असेल तर संघ अधिकाऱ्यांनी देखील इथे लक्ष घालणे गरजेचे आहे. आज सर्वांनीच लक्ष घालून परिस्थिती सुधारली तर भाजपची पार्टी विथ अ डिफरन्स ही ओळख कायम राहील. अन्यथा भाजपची काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही हा धोका सर्वांनीच लक्षात घ्यायला हवा. 

वाचकहो पटतेय का तुम्हाला हे.......? त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो...! 

✍️अविनाश पाठक , नागपूर.

   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

  1. प्रश्नांकीत आणि खंत करणारं पण, वास्तवपूर्ण विश्लेषण...!
    🤔
    ....अ.ब.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.