खलबत्ता:-विनोद देशमुख ,पैशांचा पाऊस, भाषावादाचं वारं लोकशाही बिचारी सहतेय् सारं.

खलबत्ता:-विनोद देशमुख.

पैशांचा पाऊस, भाषावादाचं वारं

लोकशाही बिचारी सहतेय् सारं.

यावेळची महानगर पालिका निवडणूक पूर्णत: पैशावर आणि भाषावादावर गेलेली आहे.‌ आतापर्यंतच्या निवडणुकीत दिसला नाही इतका अतोनात पैसा यावेळी वेगवेगळ्या रूपात दिसत आहे. खर्चाची कमाल मर्यादा कितीतरी पटींनी ओलांडून उमेदवार आणि त्यांचे पक्ष-गट यांनी नोटा उधळल्या आहेत.‌ महाराष्ट्रातील २९ महानगर पालिकांमधील एकूण २८६९नगरसेवकपदांसाठी मैदानात असलेल्या १५९३१ उमेदवारांपैकी फार थोडे असे असतील ज्यांनी खूप पैसे खर्च केले नसतील, गेल्या निवडणुकीत असलेली खर्चाची कमाल मर्यादा ४ लाखांवरून यंदा १५ लाख रुपये करण्यात आली. या रकमेत विजयासाठी निवडणूक लढणं केवळ अशक्य आहे. साहजिकच विजयोत्सुक उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीनं पैसा खर्च करतात. मोठ्या पक्षांचे आणि अपक्ष किंवा बंडखोर असलेले 'वजनदार' उमेदवार तर या मर्यादेपेक्षा अनेक पटींनी खर्च करताना मतदारांना दिसतात. पण या प्रकाराला आळा घालण्याचे प्रयत्न कोणत्याच स्तरावर (प्रशासकीय किंवा पक्षीय स्तरावर) होताना कधी दिसत नाही. ही आपली लोकशाही.

एकूण, आपल्याकडील निवडणुकांमध्ये पैशाचं प्रस्थ भयंकर माजलं आहे. नमुना म्हणून एक उदाहरण पाहा. गेल्याच महिन्यात झालेल्या निवडणुकीत एका क वर्ग नगर पालिकेत नगराध्यक्षपदाच्या एका उमेदवारानं स्वत:सह ३ नगरसेवकांसाठी खर्च केला ५ ते ७ कोटी. (झाले डोळे पांढरे.) इतकं करूनही चौघेही पराभूत झाले, हा भाग वेगळा. पण, एवढे पैसे येतात कुठून आणि सर्वात खालच्या पायरीवरील स्थानिक स्वराज्य संस्थेत शिरकाव करण्यासाठी ते खर्च का केले जातात, याचं उत्तर कोण देणार.

अशाच आणखी एका नगर पालिकेत एका मतदारानं कमालच केली आणि मतविक्रीत स्वत:चे हात धुऊन घेतले या पठ्ठ्यानं अध्यक्षीय उमेदवाराकडून ५ मतांसाठी १० हजार रुपये, नगरसेवक पदासाठी एकाकडून ५ हजार आणि दुसऱ्याकडून ३ हजार असे १८ हजार रुपये उकळले आणि नंतर तो दारूच्या नशेत बढाई मारत गावभर फिरला म्हणे, हे नगर पालिकेत घडलं असेल, तर महानगर पालिकेत 'महा'च घडणार, हे उघड आहे. मुंबईत तर विचारायलाच नको. -आणि, हे वाटलेले पैसे वसूल होतात, याची हमी असल्यामुळेच उमेदवार सढळहस्ते खर्च करतात, हेही उघड आहे.‌ भ्रष्टाचारी उमेदवार आणि मत विकणारे मतदार यांनी निवडणूक/लोकशाही अशी सडवून टाकली असल्याचं हे दुर्दैवी चित्र दिवसेंदिवस अधिकच विद्रूप होत चाललं आहे. (शिवाय, दारूवाटप, गुंडगिरी, जात आहेच.) ही धोक्याची घंटा आहे. कारण, निवडणूक ही आता केवळ स्पर्धा न राहता युद्ध बनलं आहे. साम, दाम, दंड, भेद वापरून जिंकायचं एक युद्ध.

त्यात यावर्षी मराठी विरुद्ध अमराठी या भाषावादाची भर पडली. नव्हे, मुंबईवरील आपला ताबा कायम ठेवण्यासाठी ठाकरे ब्रदर्स ब्रँडनं ती तशी करण्याचा ठरवून प्रयत्न केला आहे. याचा कमीअधिक परिणाम राज्यभरातील 29 ही मनपा क्षेत्रांवर स्वाभाविकपणेच होणार आहे. दक्षिण आणि ईशान्य भारतातातील काही राज्यं हिंदीला विरोध करण्यासाठी जो भाषिकवाद जोपासतात, तोच हा मराठीवाद आहे. मुंबईतील प्रचाराच्या रणधुमाळीत तो एवढा पुढं गेला की, मुंबईचा महापौर हिंदू मराठी होणार की मुस्लिम मराठी होणार, अशा धार्मिक वादाचीही त्याला जोड मिळाली. एकीकडे आर्थिक लाभ आणि दुसरीकडे भावनिक साद यात आपली लोकशाही चिरडली जात आहे, याची कोणालाच ना खंत, ना खेद.

ही स्थिती लक्षात घेऊन महानगरांमधील सुज्ञ मतदारांनी सारासार विचार करून, आमिषं- दबाव झुगारून, स्वेच्छेनं मतदान केलं तरच लोकशाहीला काही अर्थ राहील. अन्यथा, स्वातंत्र्याचं शतक गाठेपर्यंत काय होईल, सांगता येत नाही.

+✍️ विनोद देशमुख ✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.