खलबत्ता:-विनोद देशमुख.अदानीभाऊ, हे वागणं बरं नव्हं.
खलबत्ता:-विनोद देशमुख.
अदानीभाऊ, हे वागणं बरं नव्हं.
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात फक्त गौतम अदानी नावाचे एकच उद्योगपती अनेक पटींनी श्रीमंत झाले, हा राज ठाकरे यांचा आरोप खोडून काढताना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी, इतरही अनेक उद्योगपतींनी केलेल्या आर्थिक प्रगतीची टक्केवारीसह माहिती दिली. शिवाय, भाजपेतर राजकीय पक्षांच्या सरकारांनाही त्यांनी किती किती हजार कोटी रुपयांचे उद्योग दिले आणि वेगवेगळ्या पक्षांचे नेते (राज ठाकरेंसह) त्यांना कसे भेटतात याचं सचित्र सादरीकरणही केलं. ठाकरे ब्रॅण्डनं ज्या शिवतीर्थावर आरोप केले, तिथंच देवाभाऊंनी हे उत्तर दिलं.
पण, यानं विरोधकांची तोंडं बंद होतील, असं कोणीही समजू नये. कारण, खरा मुद्दा तो नाहीच आहे. खरा मुद्दा वाट्याचा आहे, मोदींच्या पक्षाच्या राज्यांना लाखो कोटींचे उद्योग अन् आमच्या राज्य सरकारांची काही हजार कोटी रुपयांवर बोळवण, ही विरोधकांची 'स्वाभाविक' पोटदुखी आहे. अर्धशतकापेक्षा जास्त काळ देशावर राज्य करताना काँग्रेसनं यापेक्षा वेगळा फॉर्मुला वापरला होता का, हा प्रश्न यातून सहजच पुढे येतो आणि त्याचं उत्तरही सर्वांना ठावूक आहे. राजसत्तेत असंच होतं असतं राजेहो, "तळं राखतो, तो जास्त पाणी पित असतो" हाच सार्वत्रिक अनुभव आहे. पूर्वी तुम्ही तेच करत होते. आता ते उलटं झालं तर आरडाओरड करता. हाच काय तो भूमिका-बदल.
नाराज गटातील दुसऱ्या प्रकारचे वाटेकरी मात्र वेगळे आहेत. "अदानी आम्हाला विचारत नाही, मोजत नाही, गिनत नाही" हे खरं दु:ख आहे. सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेणं, हे कोणत्याही उद्योगपतीचं धोरण राहणारच. तेव्हाच त्याचा व्यवसाय सुरळीत चालू शकतो. म्हणूनच "मोदीका आदमी" असलेले अदानी दुसऱ्या टोकावरील ममतादीदीलाही सहजतेनंच भेटतात ना.
अरे, कोणत्या जगात राहता तुम्हीलोक ! उद्योग आले तर त्यात खोट काढता. त्यात राजकारण पाहता. एकदम मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या कल्पनेपर्यंत जाता. आले नाही तरी ओरडता. निर्णय घेणाऱ्यांनी वागावं तरी कसं ? अन् उद्योगपतींनाही समतोल साधता आला पाहिजे. सत्तारूढ-विरोधक यांच्यात केव्हाही स्थानबदल होऊ शकतो. असे अदलाबदल याआधी झाले आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सर्व उद्योगपती वागले तर बऱ्याच तक्रारी, आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा कमी होऊन राजकीय वातावरण बरंच स्वच्छ होऊ शकतं बघा. मनपा निवडणुकीच्या अनुभवानंतर तरी अदानी तसं वागतील, अशी आशा करू या.
++✍️ विनोद देशमुख ✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment