खलबत्ता -विनोद देशमुख.राज ठाकरे मुद्देसूद, उद्धव ठाकरे उठसूठ

खलबत्ता:-विनोद देशमुख.

राज ठाकरे मुद्देसूद,

उद्धव ठाकरे उठसूठ.

६० वर्षांपूर्वी शिवसेनेची स्थापना झाली त्या, मुंबईच्या दादरमधील शिवतीर्थावर  ठाकरे ब्रॅण्डच्या पहिल्या सभेचा निष्कर्ष काढायचा झाल्यास म्हणावं लागेल- मराठी म्हणजे फक्त मुंबई आणि मुंबई म्हणजे फक्त ठाकरे. तोंडी लावायला पवार, एवढाच काय तो महाराष्ट्राचा संबंध; उर्वरित महाराष्ट्राच्या मराठीपणाचा उल्लेखही नाही. आणि ठाकरे-पवार एकीतून घराणेशाहीचा उदोउदो करण्याचा प्रयत्न. राज ठाकरेंच्या अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण, मुद्देसूद मांडणीपुढे मोठ्या भावाचं तेच नेहमीचं फक्त भाजपाविरोधी, पातळीहीन टोमणे मारणारं भाषण फिक्कं पडलं, असं अनेकांचं मत झालं आहे.

उद्धव ठाकरे फडणवीस आणि अजितदादा या दोन लोकनियुक्त सर्वोच्च पदाधिकाऱ्यांबद्दल कोणत्या भाषेत बोलले ते ऐका. 

एक- "फडणवीस हिंदू आहेत का, हे तपासलं पाहिजे. (इशारा लक्षात घ्या.) म्हणजे, जन्माचा दाखला वगैरे (सारवासारव...)" 

दोन- "पूर्वी अजितदादांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या फडणवीसांनी पुरावे देऊन अजितदादांना लाथ मारून मंत्रिमंडळातून हाकलावं." 

मराठी माणसं, त्यांची भाषा, संस्कृती, अभिमान या साऱ्यांचा वसा घेतलेल्यांची मराठी इतकी दर्जाहीन, तेही राज्याच्या प्रमुख-उपप्रमुखांबद्दल ? परभाषी लोक काय संदेश घेतील यातून ? आणि, परभाषियांची आम्हाला गरज नाही, असं म्हणण्याचीही सोय नाही. कारण, आज मुंबईच्या लोकसंख्येत ६० टक्के परभाषी आहेत. म्हणून तर आदित्य ठाकरे याच सभेत म्हणाले- "जे अन्यभाषिक लोक मुंबईत वर्षानुवर्षे राहत आहेत, त्यांना आम्ही मुंबईकरच मानतो. (म्हणजे पुन्हा मुंबईकरच. महाराष्ट्रवासी नाही किंवा मराठी नाही.) म्हणजे सारा खटाटोप मुंबई हातात ठेवण्यासाठीच सुरू आहे, हेच दिसतं. याचं मुख्य कारण, मुंबई ही रोज सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे. ती महाराष्ट्राची राजधानी आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे, बॉलिवूड, आंतरराष्ट्रीय शहर आहे वगैरे गोष्टी कमी महत्त्वाच्या.

राज ठाकरे यांनी मात्र एक मुद्दा पकडून तो पटवून देण्याचा प्रयत्न केला, हे त्यांच्या विरोधकांनाही मान्य करावं लागेल. गौतम अदानी या उद्योगपतींचे साम्राज्य मोदींच्या ११ वर्षांच्या कारकीर्दीत अनेक पटींनी कसे वाढले आणि देशात अनेक उद्योगपती असताना फक्त अदानींचेच का वाढले, हे प्रश्न त्यांनी तपशीलवार माहितीसह उपस्थित केले आणि त्याआधारे आरोप केला की, "मुंबई महाराष्ट्रातून तोडून गुजरातमध्ये पळवून नेण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू झाले आहेत." हा आरोप कोणाला पटो न पटो, मांडणी दमदार होती. पण पुन्हा तेच. गेली २० वर्षे राज ठाकरे चांगले भाषण देत आहेत. मतं मात्र मिळत नाहीत, यावेळी ब्रॅण्डच्या भागीदारीत तरी त्यांचं काही 'जमतं' का, ते बघायचं.

ठाकरे-पवार या डबल ब्रॅण्डच्या संयुक्त "घराणेशाही सभे"त एक आक्रीतही घडलं. शिवसेनाप्रमुखांचे मित्र आणि बारामतीतून पवार ब्रॅण्ड चालविणारे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे नेते जयंत पाटील व्यासपीठावर उपस्थित होते आणि त्यांचं भाषणही झालं. ते महत्त्वाचं नाही. त्यांच्या नंतर झालेल्या भाषणात राज ठाकरे सतत अदानींविरुद्ध बोलत होते आणि हे सारं जयंत पाटलांना निमूटपणे ऐकून घ्यावं लागलं. आपले आका पवारसाहेबांनी गेल्याच महिन्यात अदानींना बारामतीत बोलावलं, त्यांचा सन्मान केला आणि स्वत:सह सर्व वक्त्यांना अदानींवर स्तुतिसुमनं उधळायला लावली... हे क्षण जयंतरावांच्या डोळ्यांपुढे तरळून गेले असतील, बिचारे अगतिक, बाळासाहेबांच्याच भाषेत सांगायचं तर- डबल ढोलकी.

+++++✍️ विनोद देशमुख ✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.