खलबत्ता:-विनोद देशमुख ,लाडक्या बहिणींच्या धर्तीवर "पुण्याचे लाडके प्रवासी".
खलबत्ता:-विनोद देशमुख.
लाडक्या बहिणींच्या धर्तीवर
"पुण्याचे लाडके प्रवासी"
पुणे-पिंपरी चिंचवड या जुळ्या महानगर पालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी गेल्या जन्मात (आणि चालू जन्मातही) कोणतं 'पुण्य' केलं माहीत नाही. पण, पुण्य केलं हे नक्की. म्हणून तर त्यांच्या नशिबात मेट्रो आणि शहर बस यातून फुकट प्रवास करण्याची देशातील पहिली संधी येऊ घातली आहे.
हो. दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीनं तसं स्पष्ट आश्वासन पुणेकरांना दिलं आहे. या युतीचे नेते अजितदादा पवार आणि सुप्रिया सुळे या बहीणभावांनी युतीचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना ही 'सुखद' घोषणा केली. पुण्यात वारंवार होणारी वाहतूक कोंडी, वाया जाणारा वेळ, विनाकारण जळणारं पेट्रोल-डिझेल आणि त्यातून होणारं प्रदूषण या सर्व समस्यांवर हा एकत्रित 'विलाज' अजितदादांनी काढला आहे. तो लागू पडतो का, हे त्यांची सत्ता आली आणि योजना लागू झाली तरच आपल्याला कळेल. त्यासाठी आधी १६ जानेवारीपर्यंत (निवडणूक निकाल) अन् नंतर योजना मंजूर होऊन लागू होईपर्यंत थांबावं लागणार आहे. पुणेकरांमध्ये एवढा धीर आहे का, याचीही परीक्षा यानिमित्तानं होऊन जाईल, ते वेगळंच.
भाजपा-शिवसेना महायुतीच्या "लाडकी बहीण" योजनेवरूनच अजितदादांना ही "फुकट प्रवास" योजना सुचली, हे उघड आहे. "लाडक्या बहिणींचा आम्हाला (बहिणीकडे पाहत- म्हणजे आम्हाला एकट्याला बरं.) लाभ झाला, असंही दादांनी ओघात सांगून टाकलं. काही पाश्चिमात्य देशांमध्ये अशी मोफत प्रवास सेवा कार्यरत असल्याचंही दादांनी नावानिशीवार सांगितलं. त्या देशांमधील लोकसंख्या आपल्याएवढ्या घनतेची (म्हणजे भाऊगर्दी.) आहे का आणि पुणे-पिंपरी चिंचवड महानगर प्रदेशाएवढ्या भागात दररोज असे लाखो प्रवासी त्यांना हाताळावे लागतात का, हे आता शोधावं लागेल.
अनेक वर्ष महाराष्ट्राचं अर्थमंत्रिपद सांभाळल्यामुळं दादा आकडेवारी सादर करण्यात तरबेज आहेत. रोज किती प्रवासी स्वत:चं वाहन वापरतात, ते कसे वाहतूक कोंडीत सापडतात आणि प्रत्येकाचं सरासरी किती पैशांचं किती पेट्रोल-डिझेल विनाकारण जळतं याचा हिशेब मांडत दादांनी जणू अर्थसंकल्पच सादर केला१५ लाख वाहनांचं दररोज २२.५० कोटी रुपयांचं इंधन वाया जातं, शिवाय खराब रस्त्यांमुळं होणारं नुकसान, वाया जाणारे मानवी तास मिळून रोज सुमारे ३० कोटी, महिन्याला ९०० कोटी आणि वर्षाला १०,८०० कोटी रुपये बुडतात. त्याऐवजी दरमहा मेट्रोसाठी ५ कोटी आणि बससेवेला २० कोटी असे वर्षाला ३०० कोटी रुपये देऊन या सेवा जनतेला मोफत उपलब्ध करून देणं जास्त परवडणारं आहे, असं गणित दादांनी मांडलं. ही "लाडके पुणेकर प्रवासी" योजनाच झाली की नाही. त्यासाठी शुभेच्छा. आता यात "पुणे स्टाईल" खोड्या काढत नका बसू मित्रांनो. तुम्हाला लाडका भाऊ (आणि बहीणही) लाभणार आहे, असा विचार करा अन् म्हणा- दादा तेरा वादा.
+✍️ विनोद देशमुख ✍️
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment