खलबत्ता:-विनोद देशमुख.जन्मगाव आरक्षणाच्या मागणीचं 'राज' काय?

खलबत्ता:-विनोद देशमुख.

जन्मगाव आरक्षणाच्या   मागणीचं 'राज' काय?

-ठाकरे बंधू ब्रॅंडनं मुंबईसाठी एक नवीनच मुद्दा लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीचा संयुक्त मुलाखतकारांशी 'सामना' नुकताच झाला. त्यातून मराठीसारखाच आणखी एक भावनिक मुद्दा पुढे आला आहे. तो म्हणजे, नेत्यांचा जन्म कुठं झाला. 

कोणी म्हणेल, हा काय मुद्दा झाला ? परंतु, राज ठाकरे यांनी तोच पुढे रेटला आहे. हो. नेत्याच्या जन्मगावाचं 'महत्त्व' राज ठाकरेंनी एका प्रश्नाच्या उत्तरातून अधोरेखित केलं. ते म्हणाले- "मुंबईच्या नेमक्या समस्या, अडचणी समजण्यासाठी मुंबईतच जन्म घ्यावा लागतो. बाहेरच्या लोकांना (फडणवीस नागपूरचे) ते समजू शकत नाही."

हा नवाच मुद्दा आहे. काय तर म्हणे, मुंबईचं भलं करू पाहणाऱ्याचा जन्म मुंबईतच व्हायला हवा. मुंबईतील रहदारीच्या चौफेर विकासाचे ५५ उड्डाणपूल ३० वर्षांपूर्वीच बांधणारे नितीन गडकरी मुंबईकर आहेत का ? नंतर मुंबईविकासाचा धडाका लावणारे देवेन्द्र फडणवीस, एकनाथ शिंदे हेही मुंबईकर नाहीत. उलट, मुंबईत जन्मलेल्या ठाकरे बंधू ब्रॅंडनं मुंबईत काय दिवे लावले, हा खरा प्रश्न आहे, मुंबई महानगर पालिकेत सलग २५ वर्षे सत्ता असताना तुम्ही काय केलं ? कोणत्या मूलभूत समस्या सोडवल्या" असा पलटवार फडणवीसांनी केला आहे, त्याला द्या आता उत्तर.

जन्माचाच निकष लावला तर बहुतांश मुख्यमंत्री, मंत्री, प्रशासकीय अधिकारी हे मुंबईच्या समस्यांवर नीट विचार करू शकणार नाहीत अन्  त्यामुळे नीट विकास करू शकणार नाहीत, असा सरळसरळ अर्थ या विधानाचा निघतो. हाच नियम जिल्हा, विभाग, राज्य आणि देश यांना लावायचं ठरवलं तर कितीतरी नेते आणि इतर क्षेत्रातईलही मान्यवर यांना 'निकालात"च काढावं लागेल, पालकमंत्री त्याच जिल्ह्यात जन्मलेला नेमावा लागेल. प्रमुख अधिकाऱ्यांच्या नेमणुकाही याच पद्धतीनं कराव्या लागतील. त्यांची यादी ही भलीमोठी होईल. 

त्यापेक्षा आपण, एक प्रातिनिधिक प्रकरण मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचंच घेऊ आणि त्यांची मुंबईशी असलेली जवळिक "केस पेपर" म्हणून तपासून पाहू या. फडणवीस आज ५५ वर्षांचे आहेत आणि त्यातील अर्ध्याहून अधिक काळ, म्हणजे गेली २८-२९ वर्षे सलग त्यांचा मुंबईशी निकटचा संबंध आहे. १९९७ ते १९९९ नागपूरचे महापौर, १९९९ ते २०१४ सलग १५ वर्षे आमदार, २०१४ ते २०१९ मुख्यमंत्री, २०१९ ते २०२२ विरोधी पक्षनेता, २०२२ ते २०२४ उपमुख्यमंत्री आणि २०२४ पासून आजपर्यंत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री असलेले फडणवीस सतत मुंबईला ये-जा करतात, राहतात, मुंबईत कार्यक्रम घेतात, लोकांशी संवाद साधतात. मुंबईत न जन्मताही ते या गोष्टी सातत्यानं करीत आहेत. एक संवेदनशील नेता या नात्यानं फक्त मुंबईतील समस्यांचाच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्राचाच त्यांचा दांडगा अभ्यास आहे. त्यांनी मुंबई विकासाच्या अनेक योजनाही हाती घेतल्या आहेत. असं असताना जन्मस्थानाचं नवंच खूळ काढणं, हा फक्त भावनिक मुद्दा ठरतो. 

एखाद्या पक्षाच्या नेत्यानं इतका संकुचित विचार करावा, हे महाराष्ट्राचं अन् मराठी माणसांचंही दुर्दैवच. "आमची मुंबई, मराठी मुंबई" या घोषणेला आता "आमच्यासाठीच आरक्षित मुंबई" अशी दुसरी ओळ जोडून विस्तार तर केला जात नाही ना जात, लिंग या आधारावर घटनेद्वारे मिळणाऱ्या आरक्षणाप्रमाणेच आता जन्मस्थळाचंही आरक्षण द्यावं, अशी नवी मागणी ठाकरे ब्रॅण्ड कडून केली जात असल्याचा निष्कर्ष कोणी काढला, तर काय उत्तर आहे.

मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा वगैरे पदावर बसलेली माणसं ही 'बसवलेली' आहेत आणि मालकाच्या आदेशानुसार काम करतात, अशीही टीका राज ठाकरेंनी केली. यात नवं काय आहे ? सर्व राजकीय पक्षांमध्ये असंच असतं. (घराणेशाहीवादी पक्ष सोडून बरं. कारण तेथे अशी संधी स्वत: पक्षप्रमुखच घेतो) पक्षाचा नेता पदासाठी इच्छुक नसेल तर दुसरा कोणताही माणूस त्यानं नेमलेलाच असतो आणि त्याला पक्षश्रेष्ठीच्या मर्जीनुसारच वागावं लागतं. मनोहर जोशी, नारायण राणे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री 'बसवलेलेच' नव्हते का ? मुंबई महानगर पालिकेच्या २५ वर्षांच्या सत्तेत शिवसेनेचे महापौर कोणते 'बसलेले' होते ? काहीतरीच बोलायचं.

पायाखालची वाळू घसरताना दिसली की माणूस काहीही बोलू लागतो, कशाचेही समर्थन करतो, कोणताही युक्तिवाद करतो आणि आपलं म्हणणं दुसऱ्याच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करतो, याचे हे दोन 'ब्रॅण्डेड' नमुनेच नाही का.

+++++✍️ विनोद देशमुख ✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.