खलबत्ता:-विनोद देशमुख.मराठीचा अभिमान म्हणजे इतर भाषकांचा राग/द्वेष?

 खलबत्ता:-विनोद देशमुख.

मराठीचा अभिमान म्हणजे

इतर भाषकांचा राग/द्वेष?

"ये क्या चल रहा है महाराष्ट्रमें ?" हा माझा 'खलबत्ता' अनेक अतिरेकी मराठीप्रेमींंना मथळ्यामुळे झोंबला. मराठी मथळा द्यायला काय गेलं होतं, असा तिरकस प्रश्न एका "मराठी मुंबई" वाद्यानं मला विचारला. पत्रकारितेतील मथळ्यांबद्दलचं त्याचं अज्ञान पाहून मी हसलो अन् त्यालाच प्रतिप्रश्न केला- "मराठीप्रेम/अभिमान सिद्ध करण्यासाठी इतर भाषांचा आणि त्या भाषकांचा रागच केला पाहिजे का ?" त्याचं उत्तर- "मुंबई आमची, मराठी माणसांची आहे. तिच्यावर डोळा ठेवणाऱ्या इतर भाषकांच्या, विशेषकरून हिंदी आणि गुजराती लोकांच्या हातात मुंबई जाऊ नये, हे आमचं ध्येय आहे. म्हणून आम्ही मुंबईकरांना या परभाषकांपासून वेळोवेळी सावध करीत असतो. निवडणूक काळात हे काम आम्ही जास्त जोमानं करतो. म्हणूनच यावेळच्या महानगर पालिका निवडणुकीतही तीच आमची टैगलाइन आहे."

"आपली मुंबई, मराठी मुंबई" असं तुम्ही म्हणता. मुंबईच्या लोकसंख्येत किती मराठीभाषक आज आहेत, याची तुम्हाला कल्पना आहे का", असं विचारलं असता सैनिक म्हणाला की, मुंबई महाराष्ट्राची राजधानी असल्यामुळे मराठीच राहिली पाहिजे. स्वातंत्र्यानंतरच्या प्रांतरचनेत मुंबईला गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न झाला होता. गेल्या अकरा वर्षात नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आणि अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. ते मुंबई गुजरातमध्ये पळवून नेतील किंवा केंद्रशासित प्रदेश बनवून मुंबईला आपल्यापासून हिसकावून घेतील अशी भीती मराठी माणसांना वाटते. (हे कसं शक्य होईल,हे ते सांगत नाहीत) म्हणूनच पुन्हा एकदा मराठी मुंबईचा गजर ठाकरे बंधू एक होऊन करीत आहेत.

या महाभागाला कोणी सांगावं की, आज मुंबईत जास्तीत जास्त ३५-३६ टक्के म्हणजे फक्त एकतृतीयांश नागरिक/मतदार मराठी राहिले आहेत. (मुंबईची लोकसंख्या सव्वादोन कोटी, मतदार एक कोटीपेक्षा थोडे जास्त, हिंदीभाषक 20 टक्क्यांवर, गुजराती १५-२०टक्के, मुस्लिम सुमारे २० टक्के) अशा स्थितीत मराठीभाषकांना वेगळं पाडून त्यांच्या भरोशावर या महानगराची सत्ता मिळवणं शक्य आहे का ? मराठीच्या नावाखाली सर्व मराठीजन आपल्यालाच मतदान करतील या अहंकारातून हे सांगितलं जात आहे. पण, वस्तुस्थिती काय आहे ? गेली २५ वर्षे महापौरपद शिवसेनेला (जुन्या) मराठीमुळे, स्वबळावर मिळालं होतं का ? बहुभाषक भाजपाची सोबत त्यांना होतीच ना. गेल्यावेळी तर सेना ८४ अन् भाजपा ८२ अशी बरोबरीची स्थिती होती, हे बदलतं गणित लक्षात घेणार की नाही ?

उबाठा शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन जो ठाकरे बंधूंचा मराठी ब्रॅण्ड बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो शंभर टक्के चालेल, हा दावा आपण खरा मानला तरी मग भाजपा, शिंदे यांची शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी आदींना एकही मराठी मत मिळणार नाही, असं धरून चालावं लागेल (गावठी भाषेत सांगायचं तर, इतर लोक गोट्या खेळतात का) असं प्रत्यक्षात घडणं शक्य आहे का ? उलट, मराठीच्या हट्टाग्रहामुळे इतर भाषक दुरावतील आणि सामाजिक वीणही विस्कटेल. देशाच्या आर्थिक राजधानीसाठी हे योग्य होणार नाही. आणि, उर्वरित  ६४-६५ टक्क्यांमधील इतर भाषक आपापली टक्केवारी घेऊन विरुद्ध बाजूला एकवटले तर काय होईल, याचाही विचार केला पाहिजे. 

इतरांवर धर्मवादाचा, जातीयवादाचा आरोप करताना आपण स्वत:ही भाषावादाचं कार्ड खेळत आहोत, हे ठाकरे बंधू मान्य करतील का ? सलग २५ वर्षे सत्तेत राहूनही जर ते आजही मराठीपणाच्याच नावावर मतं मागणार असतील तर मग मुंबई महानगराच्या झालेल्या-केलेल्या-न झालेल्या विकासाच्या मुद्यांचं आणि एक लाख कोटीच्या बजेटचं काय ? की, बजेट हाच खरा मुद्दा आहे, मुंबई हे आशिया खंडातील सर्वात मोठं महानगर आहे, हे लक्षात घेऊनच तेथील निवडणूक सर्वांनीच गंभीरपणे लढली पाहिजे. दुर्दैवानं तसं होताना दिसत नाही.

+✍️ विनोद देशमुख ✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.