खलबत्ता -विनोद देशमुख,फक्त मतलबाच्या वेळीच आम्हाला आठवतं मराठी.

खलबत्ता:-विनोद देशमुख.

फक्त मतलबाच्या वेळीच

आम्हाला आठवतं मराठी.

--पाटील सर आज थोडं उशिराच शाळेत पोहोचले. त्यांना आधी आपल्या नेहमीच्या चार-पाच विद्यार्थ्यांच्या टोळक्याशी बोलायचं होतं. परंतु, वेळ नसल्यामुळे ते थेट वर्गात गेले. नंतर मध्यंतरात शाळेच्या मैदानावरील कोपऱ्यात घोळका जमवून ते मुलांशी बोलू लागले...

पाटील : मुलांनो, आपल्या गावच्या नगर परिषदेची निवडणूक झाली. आता जानेवारीत कोणती निवडणूक आहे, सांगा पाहू.

चारही मुलं ओरडली : मोठ्या शहरांमधील महानगर पालिकांची. आपलं चंद्रपूर, नागपूर, अमरावती आणि अकोला या चार ठिकाणी विदर्भात निवडणूक होत आहे, गुरुजी.

पाटील : यातील सर्वात मोठी महानगर पालिका कोणती आहे महाराष्ट्रात ?

चंद्या : मुंबई आहे गुरुजी. मुंबई फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशात आणि आशिया खंडात सर्वात मोठी महानगर पालिका आहे. आकारानं आणि उत्पन्नातही. त्यांच्याकडं २२७ नगरसेवक आहेत आणि उत्पन्न जवळजवळ एक लाख कोटी रुपये आहे म्हणतात.

पाटील : तुला बरीच माहिती दिसते...

चंद्या : पण गुरुजी, नंद्याला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. सांग बे नंद्या.

नंद्या : निवडणुकीचा विषय निघाला म्हणून सांगतो सर. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई मनपावर मागची २५ वर्षे शिवसेना-भाजपा युतीचं राज्य होतं. मोठा भाऊ शिवसेना (जुनी) असल्यानं महापौर त्यांचाच असायचा.

मध्येच बंड्या बोलला : २०२२ मध्ये शिवसेनेत महाफूट झाल्यापासून हा पक्ष क्षीण झाला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची (कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी-शप सह) महा विकास आघाडी सत्तेवर येऊ शकली नाही. परवाच्या नगरपालिका निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. म्हणून आता महानगर पालिकेसाठी शिवसेनेनं मराठी कार्ड खेळलं आहे.

चंद्या : मराठी कार्ड म्हणजे ?

नंद्या : मराठी कार्ड म्हणजे मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कृती यांची बाजू घेऊन निवडणूक लढवायची.‌ त्यासाठी, दोन दशकांपूर्वी शिवसेना फोडणारे राज ठाकरे यांच्या मनसेशी उबाठा शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी 'प्रीतिसंगम' युती केली. (विरोधक या युतीला 'भीतिसंगम' म्हणजे भीतिपोटी केलेली युती म्हणतात.) पण यात, महा विकास आघाडीतील घटकपक्ष कॉंग्रेस दुरावला. त्यामुळं मुंबईत आता तिरंगी लढती होतील.

बंड्या : त्या होतील तशा होतील रे. पण मला आश्चर्य वाटतं ते उबाठा शिवसेनेच्या बेगडी मराठीप्रेमाचं. मोठी पदं असली की त्यांना मायमराठी का आठवत नाही, हा माझा प्रश्न आहे. त्यांच्या आजवरच्या राज्यसभा सदस्यांची यादी डोळ्यांखालून घाला. चंद्रिका केनिया, प्रीतीश नंदी, संजय निरुपम, प्रियांका चतुर्वेदी हे आजी-माजी खासदार कोणत्या अर्थानं मराठी आहेत सांगा ? आणि ते जर मराठी असतील तर इतर पक्षांमधील अमराठी नेत्यांना कोणत्या नाकानं हे नावं ठेवतात, हेच मला समजत नाही. ही चक्क ढोंगबाजी आहे आणि खऱ्या मराठी माणसांनी हा दोगलेपणा ओळखला पाहिजे. यांच्यापेक्षा इतर भाषकांनाही आपलं म्हणणारे पक्ष खरे लोकशाहीवादी आणि राष्ट्रीय विचाराचे आहेत.

पाटील गुरुजी : तुला खूपच माहिती दिसते राजकारणाची, बंड्या. होते का लेका पुढच्या वेळी नगरसेवक. आपल्याकडे राजकारणात असाच खोटारडेपणा वाढला आहे. आम्ही धरू ते घोडं, तेच तुम्ही धरलं तर मात्र गाढव. आमचा तो बाब्या, तुमचं ते कारटं. आमची ती मराठी, तुमची मात्र हिंदी, गुजराती वगैरे. या भ्रामक मराठीप्रेमाला मुंबईकर मराठीजन भुलतात का, ते आपण येथून ९०० कि. मी. दुरून पाहायचं.

+✍️ विनोद देशमुख ✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.